Bookstruck

अद्भूत खानावळवाला 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''आज या गावात कसली आहे सभा? कोणाची पुण्यतिथि?''
एका नवशिक्याने एकाला विचारले.
''रामा खानावळवाल्याची.''
''खानावळवाल्याची पुण्यतिथि? उद्या एखाद्या हॉटेलवाल्याचीहि कराल?''
''मग त्यात काय बिघडले? प्रत्येक क्षेत्रातील साधुसंत आज देशाला हवे आहेत. हॉटेलवाला जर आदर्श हॉटेल चालवील, सेवेच्या भावनेने चालवील तर तोहि का सत्पुरुष नाही?''
''रामा खानावळवाला का संत होता, साधु होता?''

''तुम्हांला आश्चर्यसे वाटते? आपल्याकडे साधुसंत निरनिराळी कामे का करीत नसत? सेना न्हावी डोई करण्याचे काम करी, सावता माळी भाजीपाला करी, गोराकुंभार मडकी भाजी, जनाबाई दळी, कबीर विणी. आपापली कामे करून सारे मुक्त झाले.''

''तुमच्या रामा खानावळवाल्याची सांगा तरी हकीगत.''
''रामा आईबापांचा एकुलता एक मुलगा. मागे ती मानमोडीची साथ आली होती ना?''
''म्हणजे एंन्फलूएंझा ना? १९१८ साल. अहो हिंदुस्थानात ६० लाख माणसे मेली. त्या साथीत मुंबईला रोजचा मरणाचा आकडा हजार हजार लागायचा.''

''३० वर्षे झाली त्या गोष्टीला. रामाचे आईबाप त्या साथीत देवाघरी गेले. रामा निराधार झाला. आईबाप मेले तेव्हा तो इंग्रजी शाळेत शिकत होता. परंतु आता कसे व्हायचे शिक्षण? आणि फार बुध्दीमानही नव्हता. त्याला कोणी सांगितले की, 'रामा या गावात चांगलीशी खानावळ नाही. तू घाल खानावळ.' काही विद्यार्थ्यांनीहि त्याच्या खानावळीत जायचे कबूल केले. काही शिक्षकांनी व त्याच्या वडिलांच्या काही मित्रांनी त्याला थोडे भांडवल दिले. रामाने सामान आणले. भांडी घेतली, पाट घेतले. पहिल्याने त्याला पाच गि-हाईके मिळाली. रामाच स्वयंपाक करी, रामाच वाढी. स्वच्छ पाट मांडलेले, स्वच्छ ताटे आणि पाणी पिण्याची भांडी आरशासारखी असत. रामा सारे शास्त्रीय पध्दतीने करायचा. लिंबाची फोड असायची. कच्ची कोबी, टोमॅटो, काकडी, बीट यांची कोशींबीर असायची. ताक असायचे छान. त्याच्या खानावळीत आहारासंबंधी तक्ते लावलेले असायचे. आणि तेथे वृत्तपत्रे असत. लहानसे ग्रंथालयहि होते. निवडक पुस्तके त्यात होती. येणारी पुस्तकेहि चाळीत बसत. शाळेतील परगावचे विद्यार्थी हे रामाचे मुख्य गि-हाईक. त्याची शक्ती मर्यादीत होती. त्याने मेंबर फार वाढविले नाहीत. सर्वांची काळजी कशी घेता येईल? शाळेला सुटी लागली व मुले घरी जाऊ लागली की रामा रडू लागायचा. तो त्यांना पोचवायला जायचा. म्हणायचा, आता माझे देव केव्हा यायचे परत? मुलांना घरचे अन्नहि आवडायचे नाही. सुटींत घरी आईला मुलगा म्हणायचा, 'रामाच्या हातचे जेवणात आई काही विशेष आहे खरे.' केव्हा जाऊ व रामाचे हातचे खाऊ असे मुलांना व्हायचे. एकदा एक चमत्कार झाला. एक व्यापारी आला होता. त्याला कोणी सांगितले की रामाच्या खानावळीत जा. व्यापारी रामाच्या खानावळीत आला. फारसे पाहुणेरावळे खानावळीत येत नसत. परंतु रामा म्हणाला, ''सर्वांची जेवणे होऊन गेली. परंतु तुम्हाला माहित नसावे. आलात. बसा. दूरदेशचे दिसता. बसा हं. ताजे जेवण पटकन करतो.'' ते शेटजी तेथे वाचीत बसले रामाने सुरेख स्वैपांक केला. त्याचे गडी कामे आटपून पडले होते. रामाने त्यांना उठवले नाही. परंतु आवाजाने ते उठले.

« PreviousChapter ListNext »