Bookstruck

नवी दृष्टी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निवडणुकीचे अर्ज दिले गेले. दौलतीने मागे घेतले नाही. आनंदरावाने नाही. बाहेरची दडपणे होती. गरिबांचा पक्ष, श्रीमंतांचा पक्ष असे प्रकार होते. गरिबांच्या पक्षाचे पुढारी येऊन दौलतीस म्हणाले, ''हा तत्त्वाचा प्रश्न आहे. व्यक्तिगत मैत्रीचा नाही. गरिबांची बाजू घेऊन तुम्ही उभे राहिले पाहिजे. गरिबांविषयी आनंदरावांना आस्था असेल तर त्यांनी खाली बसावे. त्यांनी आमच्या पक्षाच्या वतीने उभे रहावे. आम्ही त्याला तयार आहोत.''

''परंतु त्याला ते तयार नाहीत'' एकजण म्हणाला.

आणि निवडणूक जवळ आली. प्रचार सुरू झाला. दोघांचे प्रचारक वाटेल ते बोलू लागले. एकदा निवडणूक म्हटली की मर्यादा रहात नही. दारू, तमाशे, पैसे सर्व गोष्टी सुरू झाल्या.

आणि दौलती विजयी झाला. आनंदराव पडले. दौलतीची मिरवणूक काढण्यात आली. आनंदरावांच्या वाडयाजवळ आली. दौलतराव उतरून आनंदरावांना भेटायला गेला.

''मी म्हणजे तुम्हीच समजा'' म्हणाला.
''मग मला का नाही उभे राहू दिले?''

''तुम्ही या पक्षाच्यावतीने उभे राहिला असता तर मी कशाला उभा राहिलो असतो? परंतु तुम्ही धनिकशाहीचे प्रतिनिधी व्हायचे ठरवलेत. जाऊ दे. आपण मैत्री नाही विसरता कामा.''

दौलतीची मिरवणूक पुन्हा सुरू झाली. परंतु एक सू करीत दगड आला. दौलतीला लागला. मारामारच व्हायची. दौलतीचा मुलगा रवि, याने मारामार टाळली.

''रवि, तू आज मोठे काम केलेस'' दौलती घरी म्हणाला.

''ही सेवादलाची शिकवण'' तो म्हणाला.

जयंता तिकडे छात्रालयात होता. बाप निवडणुकीत पडला म्हणून तो घरी गेला नव्हता. रवि पुन्हा छात्रालयात आला. परंतु जयंता त्याच्याजवळ बोलेना. रवि दोनतीनदा त्याच्या खोलीत गेला. परंतु तो येताच जयंता उठून जाई. एकदा तर म्हणाला, ''तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचा पाणउतारा केला. मी हे कसे सहन करू? येत जाऊ नकोस माझ्याकडे.'' आणि रवि जातनासा झाला.

« PreviousChapter ListNext »