Bookstruck

अखेरची मूर्ति 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कृष्णाला खरा सूड मुरुगनचा नव्हता घ्यायचा. त्याचा बाबाजींवर खरा राग होता. त्याच्या मनातला ईर्षाग्नि बाबाजींनी मुरुगनचे कौतुक करून आणि कृष्णाला नावे ठेऊन जागवला होता. घरी जाऊन त्याने बाबाजींच्या सा-या बोलण्याची परतफेड केली. मुरुगनला शिव्या देऊन घेतल्या. त्याच्या प्रेमातला भागीदार मुरुगन आता त्याच्या मार्गातून दूर झाला.

तो म्हातारा चांभार. गरीब बिचारा. स्तिमित होऊन नुसता पहात राहीला. परंतु कृष्ण गेल्यावर तो मुलाला झोपडीत घेऊन आला.

कृष्णाने पंचायत केली. प्रायश्चित करून शुध्द झाला. परंतु त्याच्या मनात एकच गोष्ट डाचत होती. मुरुगन त्याच्या धंद्यामधला इतके दिवस दुवा होता. आता तो त्याचा दुष्मन झाला होता. त्याचे व्यापारी मन म्हणे, ''बाबाजींची कला तो शिकून गेला आहे. त्याचा उपयोग तो नक्की करील. जर उपयोग त्याने केला तर माझा धंदा कसा चालणार?'' मुरुगन गेल्यापासून स्वत: बाबाजींनी एकही खेळणे केले नव्हते. सदा ते खिन्न असत. ह्या धक्क्याचा त्यांच्या प्रकृतिवरही परिणाम झाला होता. कसेही करून मुरुगन हा धंदा करणार नाही एवढे पाहणे जरूर होते. एकतर मुरुगनची बोटे तोडली पाहिजेत किंवा हा धंदा करणार नाही असे आश्वासन तरी त्याच्यापासून घेतले पाहिजे.

मुरुगन थोडयाच दिवसांत आपल्या बापाचा चांभारीचा धंदा शिकला. त्याही कलेत तो निपुण झाला. परंतु बाबाजींनी दिलेली कला त्याला स्वस्थ बसू देईना. तो अगदी पोटापुरती चांभारी करी. इतर वेळ माती घेऊन खेळणी, मूर्ती बनवी. त्या मातींच्या मूर्ती बनविताना तो आजुबाजूची सारी सृष्टी जणू विसरून जात असे. त्याच्या त्या सुंदर मूर्ती, ती खेळणी पाहून त्याचा बाप म्हणे, ''ही तर विक. चांगले पैसे मिळतील तुला.''

''नाही. बाबाजींना दाखवल्याशिवाय कशी विकू ही मी? मला त्यांनी प्रेमाने ही कला दिली. ही खेळणी पाहून बाबाजींना किती आनंद होईल!'' पण मुरुगनची ही खेळणी बाबाजींपर्यंत कशी पोचणार? कोण घेऊन जाऊन ती बाबाजींना दाखवून आणणार? बिचारा मुरुगन. त्याच्या कलाप्रेमालाही जातीयवादाने जणू ग्रासले. आपल्या ओळखीच्या एका चांभाराला घेऊन कृष्ण मुरुगनकडे आला एक दिवस. मुरुगनने प्रेमाने स्वागत केले. म्हणाला, ''किसनदादा या. बाबाजींची तब्येत ठीक आहे ना आता?''

पण कृष्ण प्रेमाने नव्हता आला तेथे. असल्या कुशल प्रश्नांची जरूरी त्याला नव्हती. म्हणाला, ''मोठा बाबाजींची काळजी करणारा आला आहे? काढ किती खेळणी आतापर्यंत तू बनविली आहेस ती सारी. याच्यापुढे जी खेळणी काही बनवशील ती सारी मला देत जा. घे शपथ.''

कृष्णाच्या या वागण्याने मुरुगनला अति दु:ख झाले. त्याला त्याच्या कलेतून पैसा नको होता. बाबाजींच्या प्रेमाचा, आशिर्वादाचा तो भुकेला होता. कृष्णाच्या वर्तनाने त्याच्या डोळयांत अश्रू आले. म्हणाला, ''किसनदादा, देवा शपथ सांगतो की जी काही खेळणी तयार करीन ती सारी सारी तुलाच देईन.''

« PreviousChapter ListNext »