Bookstruck

कुटुंबाचा आधार 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''आई, तिकडे कर्जतपर्यंत मी नाही जाणार. आगगाडीतील ते चहावाले मला मारतात, येऊ नको विकायला म्हणतात. ते दुस-या मुलांना येऊ देतात. मलाच हाकलतात?'' दौलत म्हणाला.

''रोज नाही मारणार, रोज नाही हाकलणार. परंतु कर्जतपर्यंत गेलास म्हणजे अधिक खपतील वडया. अपमान सोसायला हवा बाळ. तू तर या कुटुंबाचा आधार. आज तुझे बाबाही अंथरूणावर आहेत. त्यांच्या पायाला जखम झाली. पाय सुजला. तू दिवसभर खपशील तरच सर्वांना घास मिळेल.''

''आई, खाटीमिठी खाटीमिठी करताना घसा दुखतो. किती ग ओरडायचे?''

''काय करायचे बाळ? हे तुझे शिकण्याचे वय. परंतु संकटे आली. कराचीहून जिवानिशी आलो हीच देवाची कृपा. आपण महाराष्ट्रीय माणसे. नाहीत वशिले, नाहीत आपल्यात शेटसावकार. येथें या छावणीत थोडा रहायला आधार मिळाला हीच देवाची कृपा. हेही दिवस जातील. तुझी लहान भावंडे शिकतील. जा बाळ उशीर होईल. सकाळची एक्सप्रेस येईल. कर्जतला मेल पुण्याची येईल. तिने परत ये. खपेल माल. गोड बोल. तूं नको भांडण करू.''

आणि दौलत तो चपटा वाटोळा डबा घेऊन निघाला. रोज सकाळी तो तीनचार रत्तल लिमलेट घेई. माल विकून पैसे मालकाला नेऊन देई. त्यातील ५० टक्के त्याला कमिशन मिळे. रोज रुपया दीड रुपया तो मिळवी. दिवसभर खपे, ओरडे. दहा बारा वर्षांचा दौलत. लहान दोन तीन भावंडे. सर्वांचा आज तो आधार होता. आईने पाठीवरून हात फिरविला आणि तो गेला. कल्याणला गाडी आली. तिच्यात तो चढला. ''पार्लेवाला खाटीमिटी, आण्याला आठ, हे आण्याला आठ.'' तो बाळ ओरडत होता. ओरडताना तोंड जरा वाकडे होई. रोज रोज ओरडायचे.

''आई वडी घे.'' एका मुलाने हट्ट घेतला.

''एवढयात रे कसला खाऊ?'' आई म्हणाली.
दौलत तेथे उभा होता, त्याने त्या मुलाला एक वडी दिली. त्या आईला काय वाटले कोणास ठाऊक? तिने दोन आण्याच्या वडया घेतल्या. लहान दौलतची ती वृत्ती पाहून आणखीही काही जणांनी वडया घेतल्या. आणि तो पहा एक गृहस्थ. मोठा चिक्कू दिसत आहे.

''काय रे पोरा. अच्छा है का माल?''

''अच्छा है. लेवो जी. कितनेका?''
''दे चार आण्याच्या.''
दौलतने 32 वडया मोजून दिल्या. तो गृहस्थ पुन्हा मोजू लागला.

« PreviousChapter ListNext »