Bookstruck

शनिवारची मारुतीची कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती. एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात असत. भिक्षा मागून आणीत असत. सून घरांत बसून स्वयंपाक करून ठेवीत असे. सासूसासर्‍यांना वाढीत असे. उरलंसुरलं आपण खात असे.

असं होतां होतां श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. “बाई बाई,मला न्हाऊं घाल, माखूं घाल.” ”बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं!” “माझ्यापुरतं घागरींत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. जेवूं घाल.” घाघरींत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाउं घालून जेवूं घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं. असें चार शनिवार झाले. चवथ्या शानिवारीं त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळीं घरभर फेंकून अदृश्य झाला.

इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झालीं. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकींनी घर भरलं. सासूसासरे देवाहून आलीं, तो घर कांहीं ओळखेना. हा वाडा कुणाचा? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. “मामंजी, सासूबाई, इकडे या”. “ अग तूं कोणाच्या घरांत राहिली आहेस?” तिनं सर्वं हकीकत सांगितलीं. शनिवारीं एक मुलगा आला. “ बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल.” “बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं?” माझ्यापूरतं घागरींत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल, जेवूं घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथ्या शानिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेंकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारांत उभी राहिलें.” असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरांत गेलीं.

त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो.

तात्पर्य: मनुष्य अगदीं गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा. त्या परोपकाराचें फळ त्याला मिळतेच.

« PreviousChapter ListNext »