Bookstruck

गोपद्मांची कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी.

स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पाडवसभा इत्यादि पांची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तों तुंबोर्‍याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मेर्‍या फुटल्या. असें झाल्यावर सभेचा हुकूम झाला. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्‍याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा.” असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनांत भ्याले.

माझी बहीण सुभद्रा हिनं कांहीं वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं कांहीं वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं तिला वसा सांगितला. ” सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्मं देवाच्या द्वारी काढावीत, तितकींच ब्राह्मणाचे द्वारीं, पिंपळाचे पारीं, तळ्याचे पाळीं व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणं पाच वर्ष करावं. उद्यापनाचे वेळीं कुवारणीस जेवायला बोलवावी.

पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसर्‍या वर्षी चुडा भरावा, तिसर्‍या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उंसाची मोळी द्यावी, पांचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेंत कळलं. सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पहातात, तों तिनं वसा वसला आहे.

पुढं येतां येतां गांवाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हां तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोर्‍याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेर्‍या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

« PreviousChapter ListNext »