Bookstruck

शिळासप्तमीची कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गांव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना. जळदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या.

"राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल." हें राजानं ऐकलं. घरीं आला. मनीं विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाहीं. पण ही गोष्ट घडते कशी? सून कबूल होईल कशी? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरीं पाठवावं, मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली, सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊं माखूं घातलं, जेवूं घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यांत नेऊन ठेविला. जळदेवता प्रसन्न झाल्या, तळ्याला महापूर पाणी आलं.

पुढं राजाची सून माहेराहून येऊं लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनीं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली; वशाची आठवण झाली. तो वसा काय? तळ्याच्या पाळीं जावं, त्याची पूजा करावी. काकडीचं पान घ्यावं. वर दहींभात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी, आणि वाण भावाला द्यावं. एक मुटकुळं तळ्यांत टाकावं, आणि जळदेवतांची प्रार्थना करावी.

"जय देवी आई माते, आमच्या वंशीं कोणी पाण्यांत बुडाले असतील ते आम्हांस परत मिळोत." याप्रमाणं तळ्यांत उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर, बळी दिलेला मुलगा पाय ओढूं लागला. पाय कोण ओढतां म्हणून पाहूं लागली, तों तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं त्याला कडेवर घेतलं. आश्चर्य करूं लागली. सासरईं येऊं लागली. राजाला कळलं. सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले.

तिला विचारलं, “अग अग मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला?” “मी शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यांत वाण दिलं, जळदेवतांची प्रार्थना केली. मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं.” राजाला फार आनंद झाला. तिच्यावर अधिक ममता करूं लागला.

जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हां आम्हां होवोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणांचे द्वारीं सुफळ संपूर्ण.

« PreviousChapter List