राधा
💙💛
राधा
💛💙
सकाळची साधारण नऊ वाजताची वेळ, राधा आरशासमोर उभं राहून केस विंचरत असते, तेवढ्यात मागुन मोहन सुंदर सुवासिक मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेऊन येतो आणि तिथेच थबकतो. राधाला नटुन-थटुन तयार होताना तिच्या होणाऱ्या कोरीव शरीराच्या हालचाली, तिचं ते मोहक सौंदर्य तिच्या नकळत अनुभवण्याचा मोह मोहनला आवरला नाही. जेव्हा राधा तयार होऊन आवरत असताना मोहन तिच्यासमोर उभा राहतो आणि आपल्या हातातील तिच्यासाठी आणलेला गजरा तिच्या केसात माळण्यासाठी थोडा पुढे सरकतो तेवढ्यात राधा त्याचा हात झटकून देते, त्याबरोबर मोहनच्या हातातील गजरा जमिनीवर पडतो. क्षणभर त्याला वाईट वाटते पण कदाचित चुकुन हात लागुन गजरा पडला असेल असं समजुन तो गजरा पुन्हा उचलून तिच्या केसात माळायला जातो तोच राधा ओरडते
राधा : (ओरडुन) तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? मला स्पर्शपण नाही करायचा सांगुन ठेवते तुला.
मोहन : (आश्र्चर्यचकित होऊन) काय?
राधा : हो, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नसुध्दा करु नकोस. आपल्या दोघांमध्ये अंतर राहु दे.
मोहन : अगं पण का?
राधा : कारण तु मला नाही आवडत.
मोहन : नाही आवडत तर मग लग्न तरी का केलंस?
राधा : अरे मला वाटलं होतं मुलं खुप स्मार्ट असतात. मी तुला टाळायची, तुझा फोन नाही उचलायची, तुझ्याशी बोलायची नाही तेव्हाच तुला कळायला पाहिजे होते की मी तुला पसंद नाही करत ते. तु मला नेहमीच गृहीत धरून चालत आलास ही तुझी चुक आहे.
मोहन : माझी? माझी कसली चुक होती? तु तर सगळ्या नातेवाईकांसमोर या लग्नाला संमती दिलेलीस. विवाह ठरल्यापासुन ते पार पडेपर्यंत जवळपास आठ महिन्यांचा अवधी होता. तेवढा वेळ पुरेसा होता तुझ्याकडे पुन्हा विचार करायला. द्यायचा होतास लग्नाला नकार. का नाही दिलास?
राधा :मी कशी देणार होती नकार, मी मुलगी आहे. पण तु का नाही नाकारलेस हे नातं?
मोहन : अरे…. मी का नाकारणार होतो. आणि मी म्हणतो मी का नकार द्यायला पाहिजे होता. मला तर आपलं लग्न मोडावं असं कधीच वाटत नव्हतं. उलट मी तर खुप खुश होतो तुमच्यासारख्या सुशिक्षीत कुटुंबीयांसोबत आमचे नातेसंबंध जुळतायत म्हणुन. पण लग्न ठरल्यापासुन तुझं वागणं बघता मला थोडा संशय आलेलाच की तुला हे लग्न मान्य नाही आहे. तसं मी तुला साखरपुड्याच्या पाच दिवस अगोदर विचारले होते आणि तुला हे पण सांगितलेलं की जर तुझ्या मनाविरुध्द हे लग्न होत असेल तर सांग, मी सगळा रोष माझ्यावर घेऊन हे लग्न मोडतो. त्यावेळी तोंड मिटुन गप्प का बसलेलीस , का नाही सांगितलंस की मला नाही करायचं लग्न. आणि आज लग्न होऊन दोन दिवस झाल्यावर सांगतेस की मला साधा स्पर्शही नाही करायचा. काहीच कसं वाटत नाही तुला.
राधा : तेव्हा खुप उशीर झालेला.
मोहन : आणि आता? तुझ्यामते आता योग्य वेळ आहे का? तसंही मी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो नव्हतो किंवा तुझं दुसऱ्या कोणाशी तुझ्या मनाविरुध्द लग्न ठरलेलं असताना मी येवुन तुला पळवुन तर आणली नव्हती ना. मला एक सांग तु काय आंधळी होतीस का की तु शेण खातेय आणि मी तुला थांबवावं. तुला असं का वाटलं की मी हे लग्न मोडावं? पुर्वीच्या काळी मुला-मुलींची संमती नसताना लग्न व्हायचीच ना? चांगली ढिगभर पोरं होऊन संसार फुलायचेच ना? मग? आणि असं काय वाईट आहे माझ्यात की मी तुला आवडत नाही?
राधा : तुला नवरा म्हणुन स्विकारण्यासाठी मला तुझ्याबद्दल त्या भावना (feelings) कधीच नव्हत्या आणि आजही त्या भावना निर्माण होत नाही. मी तरी काय करू?
मोहन : काय??? ( काही क्षण नि:शब्द) मग पुढे काय?
राधा. : मला थोडा वेळ दे. थोडे दिवस आपण एकत्र राहुन बघु नाहीतर मग होऊ वेगळे.
मोहन : काय बोलतेस तु. अगं हे सगळं बोलताना माझ्या आई-बाबांचा तरी विचार कर.
राधा : हो. मला तुझ्या कुटुंबाबद्दल काहीच हरकत नाही. तुझे आई-बाबा ताईकडुन परत आल्यावर आपण सोबत राहु, पटलं तर ठिक नाहीतर मग निर्णय घेऊ.
मोहन : वा!!!! किती सोप्पं आहे ना. तुला वाटलं म्हणून लग्न केले, तुला वाटतंय म्हणून काही दिवस एकत्र राहायच आणि आता तुला नाही पटलं तर वेगळं व्हायचं. अगदी सहजपणे बोलून गेलीस. फारच छान!!! ह्या सगळ्यात मी कुठे आहे? हे सगळं बोलताना तु थोडातरी माझा, माझ्या घरच्यांचा विचार केलास का, माझं सोड पण तुझ्या आई-पप्पांचा चेहराही डोळ्यासमोर नाही आला तुझ्या? निदान विवाहप्रसंगी आपल्याला आशिर्वाद देण्यासाठी जमलेल्या त्या हजारो लोकांचा तरी विचार करायचास.
राधा : तु मला पुढे काय करायचे विचारले म्हणुन मी वेगळं होऊ असं बोलले. मलाही आपल्या दोघांच्या कुटुंबीयांची काळजी आहे.
मोहन : मग तु असं कसं बोलु शकतेस? तुला माहित आहे माझे बाबा आमच्या तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत आणि जर का गावी कळालं की आपण वेगळे राहतोय तर त्यांना गावात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. आज जे ग्रामस्थ आदर, सन्मान देतायत तेच उद्या नाही नाही त्या तऱ्हेने बोलतील.
राधा : अरे पण मी कुठे म्हणतेय की लगेच वेगळे होऊ म्हणुन. पण आपण फक्त नावापुरते नवरा-बायको म्हणून आयुष्यभर एका घरात राहायच का? लोकांना दाखविण्यासाठी का आपण लग्न केले, समाज काही म्हणेल म्हणुन आपण आपल्या भावनांना दाबुन टाकायचं. जर आता माझ्या मनात तुझ्यासाठी काही भावना तयारच होत नाही तर मी तरी काय करु. जबरदस्तीने मी एखाद्या नात्यात बांधून नाही राहु शकत.
मोहन : अगं पण तु आपलं नातं स्विकारलसच नाही तर तुझ्या मनात भावना कशा निर्माण होतील. सगळ्या गोष्टी प्रथम दर्शनी आवडतीलच अशा नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवलास, पुरेसा वेळ घेतल्यास नक्कीच सर्व नाती हवीहवीशी वाटतील.
राधा : मान्य आहे मला…….. ठिक आहे मी प्रयत्न करेन पण मला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही चालणार.
मोहन : ok.. माझ्याकडुन कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा चुकीचं वर्तन घडणार नाही याची मी पुर्ण खबरदारी घेईन. पण तुझ्याकडून एक वचन हवंय मला की या सर्व गोष्टीं आपल्या आई-बाबांना कळु देऊ नकोस. कारण ते नाही सहन करु शकणार हे सगळं. Please...
राधा : हो… मी नक्कीच प्रयत्न करेन आपल्यातील हा अनोखा करार गुपीत ठेवण्याचा. तु सुध्दा मी सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेव म्हणजे झालं.
त्यांनंतर राधा मोहनच्या आई-बाबांशी खुप छान प्रकारे जुळवुन घेण्याचा प्रयत्न करत असते. पण मोहनशी गुपीत करारानुसार अंतर ठेवून राहत असते आणि मोहनपण. मधल्या काळात महत्त्वाची कामे खोळंबली असल्याचं निमित्त करून मोहनचे आई-वडील आपल्या गावच्या घरी राहायला निघुन जातात जेणेकरून ह्या दोघांना एकांत मिळु शकेल, एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळेल.
(तीन महिन्यानंतर)
मोहन : राधा मी निघतोय ऑफिसला जायला. दरवाजा बंद करुन घे आतुन नीट. मी कचऱ्याचा डबा बाहेर ठेवलाय, कचरावाला येऊन गेला तर तु ऑफिसला जाताना तो डबा आतमध्ये ठेव आणि हो दरवाजाची किल्ली शेजारच्या साठेकाकुंकडे ठेवून जा.
राधा : हो मी करते सगळं. तु आधी आतमध्ये ये आणि चहा-बिस्किट खाऊन घे. तसंच मी चपाती-भाजी बनवलीय तर तु पण डबा घेऊन जा.
मोहन : (आश्चर्याने) डबा? माझ्यासाठी? अगं कशाला उगाच, मी खाल्ल असतं काहीतरी बाहेर.
राधा : ठिक आहे ना. माझ्यासाठी बनवतेच ना डबा मी त्यात तुला थोडं. थांब तु घेऊन जा डबा.
मोहन : चालेल…. पण लवकर दे, उशीर होतोय मला. संध्याकाळी काही आणायचय का काही बाजारातुन, मला मेसेज कर मी घेऊन येतो.
राधा : काही नको…. म्हणजे मी आज लवकर येणार आहे घरी तर मी आणेन सर्व. काही राहीलच तर मी फोन करून सांगेन. तु पण आज जमलं तर लवकर ये जरा, मला काही महत्त्वाचे बोलायचं आहे.
मोहन : का गं काय झालं? सर्व ठिक आहे ना?
राधा : हो रे. तु जास्त प्रश्र्न विचारत बसु नकोस आता. तुलाच उशीर होईल. संध्याकाळी बोलु आपण.
मोहनला काहीच कळत नव्हते नक्की काय चाललंय ते. राधा आज त्याच्याशी अशी का वागतेय ते. लग्नानंतर एवढ्या दिवसात तीने त्याला ऑफिसमध्ये जाताना कधी साधा चहा बनवुन दिला होता, ना कधी डबा बनवून दिला होता. त्याला वाटलं कदाचित आता आई-बाबा नाही आहेत तर हि आपला निर्णय सांगणार असेल. तो त्याच विचारात ऑफिसला निघुन गेला. पण त्याच कामात लक्ष लागत नव्हतं, सारखा विचार येत होता की आता हिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला तर पुढे कसं होणार. आई-बाबांना काय वाटेल, समाजातील लोक काय म्हणतील, तिचे आई-बाबा काय विचार करतील, त्यांना हा धक्का सहन होईल का? माझ्याबद्दल लोकांच्या मनात काय प्रतिमा निर्माण होईल. यासारख्या असंख्य प्रश्नांनी मोहनच्या मनात काहुर माजले होते. खरंतर मोहनला राधा आवडायला लागली होती पण फक्त स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी तिचा इच्छा-आकांक्षा का मारायच्या असा विचार करून राधाचा जो काही निर्णय असेल तो स्विकारायचा आणि तिला मुक्त करायचं असा विचार करत तो संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर थेट घरी निघाला. राधा अगोदरच घरी आलेली होती, मोहन घरी पोहोचल्यावर तिने त्याला पाणी, चहा आणुन दिला आणि ती त्याच्यासमोरच बसली. मोहनने निमुटपणे समोर आलेला चहा इच्छा नसतानाही संपवला. त्यानंतर काहीवेळ तिथे Pin drops silence म्हणतात तशी शांतता पसरली होती. दोघांच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता मात्र एकमेकांकडे चोरुन कटाक्ष ठेवून कोण बोलायला सुरुवात करतोय याची वाट बघत होते. शेवटी मोहननेच कोंडी फोडली…
मोहन :तु काहितरी सांगणार होतीस ना महत्त्वाचं?
राधा : (गोंधळलेल्या अवस्थेत) हो, अरे ते. मला तुला सांगायचं होतं…. की तु ते….माझ्यासाठी
मोहन : अगं काय झालं? अशी गोंधळतेस का? काही असेल तर सांग स्पष्ट. मला नाही वाईट वाटणार काही. तशीही माझ्या मनाची तयारी आहे जे काही असेल ते स्विकारायची.
राधा : नाही रे गोंधळली कुठे.
मोहन : मग बोल ना.
राधा : मोहन मला माफ कर, मी खुप त्रास दिला तुला आतापर्यंत. पण आता नाही देणार. जे सुख तुला माझ्याकडुन अपेक्षित होते त्यापासून तुला आतापर्यंत वंचित ठेवलं मी.
मोहन : ठिक आहे गं. त्यासाठी का माफी मागतेस. कदाचित मीपण काही प्रमाणात त्याला जबाबदार आहेच ना.
राधा : नाही रे. मी तुला समजुन घ्यायला पाहिजे होते. पण आता नाही, तुला जर वाटत असेल की हा त्रास कमी व्हावा तर तुला एक काम करावं लागेल.
मोहन : ( याच्या मनाची घालमेल चालु असते) काय ते?
राधा : मोहन मला आयुष्यभरासाठी सहन करायची तयारी आहे का तुझी? मी नाही सोडुन जाऊ शकत तुला.
मोहन : काय म्हणालीस? तुला मी…. सहन…. काय बोलावं नाही सुचत आहे. तु खरं सांगतेस. मी तर कधीपासून वाट बघतोय या क्षणाची. पण तु आज हे सगळं…कसं काय??? मला तर वाटलेल की तु आज मला तुझा अंतिम निर्णय सांगणार असशील.
राधा : हो, अरे गेल्या काही दिवसांपासून मी तुला सांगायचं ठरवत होते पण हिम्मत होत नव्हती आणि जवळपास गेले तीन महिने तुझ्यासोबत घालविल्यानंतर जर मला कोणीतरी राजकुमार मिळेल, गर्भश्रीमंत मुलगा मिळेल म्हणून मी तुला सोडून गेले तर माझ्याएवढी मुर्ख व्यक्ति कोण नसेल. ज्या गृहस्थाला मी लग्नानंतरच्या तिसऱ्या दिवशी माझ्यापासून दूर रहायला सांगितले, मला साधा स्पर्श करायची परवानगी नाकारली तर तु माझ्या इच्छेखातर तीही अट मान्य केली. या एकंदर दिवसांत ना कधी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना कधी माझ्यावर हक्क गाजविण्याचा प्रयत्न केला. मनात आणलं असतं तर तु सर्व काही करु शकला असता पण नाही… तु असं काहीही केलं नाहीस. मी कधी स्वत:हुन तुझ्यासोबत काही नाही बोलले तरी तु न चुकता माझ्याशी बोलायचास, मला तुझ्या दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी सांगायचास.
लग्नानंतर मी कधी माझ्या पगारातील एक रुपया घरखर्चासाठी वापरला नाही आणि ना कधी तुला कसलं गिफ्ट आणुन दिलं. परंतु तु घरात आवश्यक असणारी प्रत्येक वस्तु न विसरता आणि न सांगता आणुन दिली. प्रत्येक सणावाराला माझ्यासाठी खास भेटवस्तू आणली, यामध्ये कधी छान महागड्या साड्या, ड्रेस, सोन्याचे दागिने इत्यादी….. पण मला कधी माहेरची आठवणसुद्धा येऊ दिली नाही. मला काय काय आवडतं ते माझ्या दादाकडून माहीत करून घेतले आणि दररोज माझ्या आवडीचा नविन नविन पदार्थ आणुन देत असायचाच. पुरुषांच्या अंगी संयम जास्त असतो असे म्हणतात, त्यांचा अनुभव मी स्वत: घेतला. सुरुवातीला मला तुझ्यासोबत एकत्र राहायची भिती वाटायची पण जसजसे दिवस जात होते तसतसे मी तुला अगदी जवळुन ओळखायला लागले. तुझ्यासोबत स्वत:ला खुप सुरक्षित समजु लागले.
मोहन मी आता खरंच तुझ्या प्रेमात पडायला लागलेय रे. मी खुप मोठी चुक करता करता वाचले. तु एक विश्वासु मित्र, जबाबदार पती, उत्तम मार्गदर्शक म्हणून सार्थ आहेस. आणि मला तुझी आयुष्यभरासाठी साथ हवी आहे, देशील का रे? माझ्या आतापर्यंतच्या सर्व चुकांवर पांघरूण घालुन मला सोबत करशील का? प्लिज नाही म्हणु नकोस, आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्यातरी प्रेमात पडलेय, मला असंच या अनोख्या जगात डुंबुन राहुदे. बोल ना रे……… करशील ना असंच प्रेम नेहमी…..
मोहन : बापरे…… राधा अनपेक्षित आहे हे सगळं माझ्यासाठी. खरचं मला कधीच वाटलं नव्हतं कधी की तु माझ्या प्रेमात पडशील म्हणुन. मी तर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासुनच तुझ्या प्रेमात पडलो. जरुरी नाही की तुही त्यावेळी माझ्यावर प्रेम करावेस. पण आता मी तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा निर्माण करु शकलो हेच माझ्यासाठी खुप आहे. खरंतर तु जेव्हा मी तुला आवडत नाही म्हणून सांगितलस पण तरीही माझ्यासोबत एकत्र राहीलीस. आणि हो तु मघाशी म्हणालीस तशी मी खूप काही करु शकलो असतो तेपण नवरा या अधिकाराने. आपल्या वनरुम किचनमध्ये राहताना रात्री झोपताना आपल्या दोघांमध्ये केवळ एक हाताचं अंतर असायचं. पण म्हणतात ना जेव्हा मालक चोराच्याच हातात तिजोरीच्या चाव्या देतात तेव्हा तो चोरही त्याठिकाणी चोरी करायला धजत नाही. तसंच त्यावेळी माझं व्हायचं, तु भले मला पसंद करत नव्हतीस पण तेवढ्याच विश्वासाने माझ्यासोबत राहत होतीस त्यामुळे तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणताही वाईट विचार मनात आला नाही. मी तुझ्या मनाविरुध्द काहीच करणार नव्हतो आणि करणार नाही. मला खात्री होती मी तुला जबरदस्तीने नाहीतर प्रेमानेच जिंकु शकतो. जबरदस्ती करुन मी तुझं फक्त शरीर मिळवलं असतं. पण तु मला फक्त शरीराने नको होतीस तर पूर्ण तना-मनाने पाहिजे होतीस म्हणुनच मी तुला जिंकण्यासाठी तुझ्यावर प्रेम करत राहीलो आणि मला वाटतंय की मी त्यात यशस्वी झालोय. आणि हो, मला नक्कीच आवडेल तुझ्यासोबत संपुर्ण आयुष्य व्यतित करायला. यापुढे आपण खुप आनंदाने संसार करु.
🙏✒️✍. निल