Bookstruck

असाही एक "प्रवास" - निलेश लासुरकार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रवास हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवास करावाच लागतो. आजवर कित्येक प्रवास केलेत, पण तो एक प्रवास थरकाप उडवणारा होता. मी आणि माझा मित्र 'मंगेश' दोघे सैलानी यात्रेत लिंबूविक्री करण्याकरिता गेलो होतो. तिथून परततांनाचा हा प्रवास!

बुलढाणा हाईवे पर्यंत एका तीन चाकी मालवाहू वाहनाने आम्हाला सोडून दिलं. रात्रीचे बारा वाजले होते.

आता आम्ही बाळापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवाल्यांना थांबवायाचा प्रयत्न करत होतो, कुणीही थांबत नव्हतं..

तेवढ्यात एक जुनाट ट्रक आला, त्यातला ड्राइवरने स्वतःहून आमच्याजवळ ट्रक उभा करून, "कुठे जायचं आहे" म्हणून विचारणा करू लागला.

"बाळापूर" (मी आणि मित्र दोघेही एकाचवेळी बोलून गेलो.)

"चला बसा, या केबिनमध्ये! मी सोडतो तुम्हाला, मला अकोल्याला जायचं आहे"

(मी आणि मंगेश ट्रकच्या केबिनमध्ये बसलो.)

ट्रक चालकाचं वर्णन सांगायचं तर सावळा, धिप्पाड, चेहऱ्यावर चाकूचा व्रण होता..त्यामुळे त्याला बघून भीती वाटत होती. अर्धा तास ट्रक धावत होता, नंतर ड्राईव्हरने हाईवेला लागून असलेल्या एका छोट्या गावाला ट्रक उभा केला.

"माझं घर इथे जवळच आहे. चला, चहा घेऊन येऊ" ड्राइव्हर मला आणि मित्राला म्हणाला.

"नको! मी चहा घेत नाही. आणि याला पण नकोय." (मंगेश बोलला.)

"चहा तर घ्यावाच लागेल. एक काम करतो. इथेच चहा घेऊन येतो." आमचं होकाराची वाट न बघता ड्राईव्हर एवढं बोलून निघून गेला. आता मात्र आमच्या मनात नको ते विचार येऊ लागले.

ट्रक ड्राईव्हर गुंगीचं औषध तर नाही ना घालून आणणार चहामध्ये?

मी आणि मित्राने प्लॅन केला की, मी एकट्यानेच चहा घ्यायचा. मंगेशने घ्यायचा नाही!

थोड्या वेळाने ट्रक चालक चहा घेऊन आला. ठरल्याप्रमाणे मी चहा घेतला आणि माझा मित्र चहा घेत नाही, असं सांगितलं..

ट्रक चालक परत एकदा त्याच्या घरी जाऊन आला.

"चला. आता थेट बाळापूर नाक्याशिवाय थांबवायचं नाही."

ट्रक भरधाव वेगाने पळत होता, मला डुलक्या येऊ लागल्या.

अधूनमधून हळूच मंगेश विचारणा करीत होता की गुंगी तर येत नाही ना?

त्याला डुलक्या येऊ लागल्या की मी त्याला हाताने झटका द्यायचो.

मला झोप आली तर तो मला चिमटा घ्यायचा.  

अखेर आम्ही दोघेही झोपी गेलो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ट्रक बाळापूर नाक्यावर थांबलेला होता. ट्रक चालक आम्हाला हलवून उठवत होता. आम्हाला बाळापूर नाक्यावर सोडून ट्रक चालक अकोल्याच्या दिशेने निघून गेला.

आम्ही अजून घरी पोहोचलेलो नव्हतो, प्रवास अजून बराच बाकी होता, पण  त्या ट्रक चालकाबाबतचे आमचे गैरसमज दूर झाले होते. लय चांगला माणूस होता तो!

« PreviousChapter ListNext »