अण्णा
"अण्णा" खरतर या शब्दातुन आपलेपणाची दरवळ निघाल्याचा भास मला होतो. कारण "अण्णा" या शब्दाशी कुठला जवळीक साधणारा शब्द असेल तर तो म्हणजे "अन्न" आणि त्यातल्या त्यात "अण्णा" आणि "अन्न" या दोघांच खुप जवळच नातं.अन्नाचा एकही कण वाया जाता कामा नये असं ते सतत म्हणतात. आणि अन्न उरलचं तर ते गरजवंताना ,प्राण्यांना द्या असा त्यांचा प्रेमळ अट्टाहास. "अण्णा" हे माझ्या गावातील अतिशय कलंदर आणि दिलखुलास व्यक्तीमत्व आणि तितकच प्रेमळही . या आधुनिक काळात अनेक तंत्रांचा आणि यंत्रांचा शोध लागला.पण अण्णांचा साधेपणा बघा एक साधा मोबाईलही त्यांच्या कडे दिसणार नाही.एक गँरेज आहे त्यांच पण त्यातही पार्टनरशिप. घरापासून गँरेजच अंतर ५-६कि.मी असेल पण अण्णा तिथपर्यंत जाण्यासाठी साधी सायकल ही वापरत नाही. अंगावर मळमळ करणारे कपडे घालून फिरणारा हा माणूस अतिशय चारित्र्यशुद्ध आणि धवल चारित्र्याचा. पन्नाशीच्या जवळ आलेल्या माणसाला कलंदर म्हणण्या मागेही भान असणार कारण आहे. ते ही सामाजिक आणि शैक्षणिक भान. जेमतेम दहावी (नापास) पर्यंत शिक्षण झालेल्या अण्णांना एवढं भान असाव खर तर नवलच. आता यात नवल करण्यासारख काय असं तुम्हाला वाटलं असेल. पण माझ्या माहितीस्तोवर अनेकांना उच्चशिक्षित असुनही सामाजिक भान नसतं.आपण समाजाला काही तरी देणं लागतो सतत या विचाराने जगणारे अण्णा मला खरे उच्चशिक्षित वाटतात.एवढंच नव्हे तर अण्णांना " दिलखुलास " म्हणण्या मागेही खूप दिलखुलास कारण आहे आणि ते म्हणजे असं की जरं एखादा गरजवंत त्यांच्या कडे आला आणि म्हणाला की मला पैशांची गरज आहे, मला मदत करा , तर अण्णा कुठलीही विचारपुस न करता खिशात जेवढे पैसे निघतील तेवढे देणार.......या सर्व गोष्टीतून या महान पुरूषांची महानता झिरपते. मी आता एम. ए. च्या पहिल्या वर्षाला आहे आणि खूप अडखळत, पडत-झडत मी शिक्षण सुरू ठेवल आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे काम करण्याशिवाय गत्यंतर नाही हे कळल्यावर मी कामाकडे विशेष लक्ष देत गेलो पण त्यामुळे शिक्षण मागे पडत गेलं. आणि नंतर हे ही कळून चुकले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्याला. खरतरं आजोबा शिक्षक. पारंपरिक व्यवसाय म्हणून वडिल सुतारकाम करायचे. वडिलांच शिक्षण नववी पर्यंतच. एक चुलते बँकेत नोकरी करायचे. म्हणजेच घरी शैक्षणिक वातावरण बऱ्यापैकीच. पण मला कोणी मार्गदर्शक म्हणून लाभला नाही ही खंतच. अण्णा हे ही नात्याने चुलतेच माझे. हे आवर्जून सांगावास वाटतय की मला जर कोणी मार्गदर्शक म्हणून लाभले असतील तर ते अण्णा आहेत. अण्णांची उंची कमीच पण अण्णांच्या विचारांची उंची मात्र गगनाला भिडलेली होती. ते म्हणतात ना 'मुर्ती लहान पण किर्ती महान' जणू हे वाक्य त्यांच्यासाठीच बनलेलं असाव. अनंत अपेक्षांच्या नांदीने सगळी स्वप्न अगदी काठोकाठ सजली होती माझी. पण क्षणार्धात सगळ्या अपेक्षा मोकळ्या व्हायच्या माझ्या. म्हणून कोणीतरी पुढे ढकलनार हव होत मला आणि ते अण्णारुपी मिळालं. अण्णांच नाव अर्जुन पण खरतरं मी त्याच्यासाठी अर्जुन होतो आणि ते माझ्यासाठी श्रीकृष्ण. ते माझ्याकडे नित्याने येतात न विसरता. मग मी घरी असो अथवा कामावर... माझ्याकडे विशेष लक्ष आहे त्यांच हे पाहून आत्मिक समाधान लाभायचं. मला जगाव कस हे अण्णांकडे बघून उत्तमच कळलं होत तस ही समाजशास्त्र या विषयाचा पदवीधर म्हणून सामाजिक भान अतिउत्तम. त्यांनी मला एकदा विचारल की "तू समाजशास्त्र या विषयाचीच का निवड केली" मला हा त्यांचा प्रश्न ऐकून आत्मिक हर्ष झाला आणि मनाला हळूच सांगितल की तू आज समाजशास्त्र या विषयाची पदवी घेऊन सार्थ झाला. सार्थ होण्यामागील कारण अस की असा प्रश्न पहिल्यांदा मला कुणीतरी विचारला म्हणजेच आपल्यावर कोणीतरी पुर्णपणे लक्ष देऊन आहे याची जाण झाली. कारण आजपर्यंत कुणीच 'तू सध्या काय करतोय' एवढही साध विचारल नव्हतं म्हणून त्यांच्या विचारण्यानेच का होईना पदवीचं शिक्षण सार्थकी झाल्याच वाटलं. खूप उशिरा का होईना मी एक पाऊल पुढे टाकलं म्हणजेच मी अण्णांच्या सांगण्याने प्रभावित होऊन स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली हळूहळू मला अण्णा किती प्रतिभावंत आहेत हे कळलं. ज्या गणिताची सर्वांनाच भिती वाटते ते गणित अण्णा चपखलपणे सोडवताना अण्णा दिसले. हे त्यांच अद्वितीय रुप कळल्यावर तर मी अवाकच् झालो. सार्वत्रिक गणित हा भितीचा विषय असूनही अण्णांनी किती सहजरित्या ते सोडवलं... याच नवलं वाटल नाही तर नवलंच. गणित हा त्यांचा आवडीचा विषय असावा हा तर्क माझा खरा ठरला. ते मला गणिताबद्दल नेहमी सांगायचे की गणित हा विषय मुळात अवघड नाहिये अापण सर्वांनी मनाशी तसा ग्रह करुन घेतलाय. आपण कधी कुठली पाठ केले नाहीत, कधी वर्ग लक्षात ठेवले नाहीत आणि सगळ्यात महत्वाच आधुनिक उपकरणामुळे आकडेमोड करणं सोप झाल्या कारणाने अापण स्वत:हून कागद आणि पेन घेऊन कधी आकडेमोड केली नाही मग कसा सोपा वाटणार हा विषय. त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य होत पण ज्याला कळेल त्यालाच.... अण्णांना वाचनाची खूप आवड. ते सांगतात की मला जो फावला वेळ मिळतो ना त्या वेळात मी फक्त आणि फक्त वाचनाला प्राधान्य देतो. जेवढी काही वृत्तपत्र माझ्या परिकक्षेत असतील ती सर्व मी चाळून काढतो आणि आता त्यांच्या एका गौरवणीय बाबीचा उल्लेख करतो. माझ्याकडे येताना सतत काही ना काही पण उपयुक्त असणारी कात्रण ते घेऊन यायचे आणि मला आवर्जून वाचत जा अस सांगून निघून जायचे. एवढंच नाही तर कधी कधी रस्त्यावरचा कागद उचलून, तो साफ करुन जर त्यातून काही घेण्यासारख असेल किंवा वाचण्यासारख असेल तर ते माझ्यापर्यंत घेऊन यायचे. मला हे त्यांच्यातील कुठल भान असेल याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. पण यातून एक कळलं की समाजोपयोगी गोष्टी अशा रस्त्यावर पडता कामा नये.