
अण्णा
by Swapnprakash
"अण्णा" खरतर या शब्दातुन आपलेपणाची दरवळ निघाल्याचा भास मला होतो. कारण "अण्णा" या शब्दाशी कुठला जवळीक साधणारा शब्द असेल तर तो म्हणजे "अन्न" आणि त्यातल्या त्यात "अण्णा" आणि "अन्न" या दोघांच खुप जवळच नातं.अन्नाचा एकही कण वाया जाता कामा नये असं ते सतत म्हणतात. आणि अन्न उरलचं तर ते गरजवंताना ,प्राण्यांना द्या असा त्यांचा प्रेमळ अट्टाहास. "अण्णा" हे माझ्या गावातील अतिशय कलंदर आणि दिलखुलास व्यक्तीमत्व आणि तितकच प्रेमळही . या आधुनिक काळात अनेक तंत्रांचा आणि यंत्रांचा शोध लागला.पण अण्णांचा साधेपणा बघा एक साधा मोबाईलही त्यांच्या कडे दिसणार नाही.एक गँरेज आहे त्यांच पण त्यातही पार्टनरशिप. घरापासून गँरेजच अंतर ५-६कि.मी असेल पण अण्णा तिथपर्यंत जाण्यासाठी साधी सायकल ही वापरत नाही. अंगावर मळमळ करणारे कपडे घालून फिरणारा हा माणूस अतिशय चारित्र्यशुद्ध आणि धवल चारित्र्याचा. पन्नाशीच्या जवळ आलेल्या माणसाला कलंदर म्हणण्या मागेही भान असणार कारण आहे. ते ही सामाजिक आणि शैक्षणिक भान. जेमतेम दहावी (नापास) पर्यंत शिक्षण झालेल्या अण्णांना एवढं भान असाव खर तर नवलच. आता यात नवल करण्यासारख काय असं तुम्हाला वाटलं असेल. पण माझ्या माहितीस्तोवर अनेकांना उच्चशिक्षित असुनही सामाजिक भान नसतं.आपण समाजाला काही तरी देणं लागतो सतत या विचाराने जगणारे अण्णा मला खरे उच्चशिक्षित वाटतात.एवढंच नव्हे तर अण्णांना " दिलखुलास " म्हणण्या मागेही खूप दिलखुलास कारण आहे आणि ते म्हणजे असं की जरं एखादा गरजवंत त्यांच्या कडे आला आणि म्हणाला की मला पैशांची गरज आहे, मला मदत करा , तर अण्णा कुठलीही विचारपुस न करता खिशात जेवढे पैसे निघतील तेवढे देणार.......या सर्व गोष्टीतून या महान पुरूषांची महानता झिरपते. मी आता एम. ए. च्या पहिल्या वर्षाला आहे आणि खूप अडखळत, पडत-झडत मी शिक्षण सुरू ठेवल आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे काम करण्याशिवाय गत्यंतर नाही हे कळल्यावर मी कामाकडे विशेष लक्ष देत गेलो पण त्यामुळे शिक्षण मागे पडत गेलं. आणि नंतर हे ही कळून चुकले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्याला. खरतरं आजोबा शिक्षक. पारंपरिक व्यवसाय म्हणून वडिल सुतारकाम करायचे. वडिलांच शिक्षण नववी पर्यंतच. एक चुलते बँकेत नोकरी करायचे. म्हणजेच घरी शैक्षणिक वातावरण बऱ्यापैकीच. पण मला कोणी मार्गदर्शक म्हणून लाभला नाही ही खंतच. अण्णा हे ही नात्याने चुलतेच माझे. हे आवर्जून सांगावास वाटतय की मला जर कोणी मार्गदर्शक म्हणून लाभले असतील तर ते अण्णा आहेत. अण्णांची उंची कमीच पण अण्णांच्या विचारांची उंची मात्र गगनाला भिडलेली होती. ते म्हणतात ना 'मुर्ती लहान पण किर्ती महान' जणू हे वाक्य त्यांच्यासाठीच बनलेलं असाव. अनंत अपेक्षांच्या नांदीने सगळी स्वप्न अगदी काठोकाठ सजली होती माझी. पण क्षणार्धात सगळ्या अपेक्षा मोकळ्या व्हायच्या माझ्या. म्हणून कोणीतरी पुढे ढकलनार हव होत मला आणि ते अण्णारुपी मिळालं. अण्णांच नाव अर्जुन पण खरतरं मी त्याच्यासाठी अर्जुन होतो आणि ते माझ्यासाठी श्रीकृष्ण. ते माझ्याकडे नित्याने येतात न विसरता. मग मी घरी असो अथवा कामावर... माझ्याकडे विशेष लक्ष आहे त्यांच हे पाहून आत्मिक समाधान लाभायचं. मला जगाव कस हे अण्णांकडे बघून उत्तमच कळलं होत तस ही समाजशास्त्र या विषयाचा पदवीधर म्हणून सामाजिक भान अतिउत्तम. त्यांनी मला एकदा विचारल की "तू समाजशास्त्र या विषयाचीच का निवड केली" मला हा त्यांचा प्रश्न ऐकून आत्मिक हर्ष झाला आणि मनाला हळूच सांगितल की तू आज समाजशास्त्र या विषयाची पदवी घेऊन सार्थ झाला. सार्थ होण्यामागील कारण अस की असा प्रश्न पहिल्यांदा मला कुणीतरी विचारला म्हणजेच आपल्यावर कोणीतरी पुर्णपणे लक्ष देऊन आहे याची जाण झाली. कारण आजपर्यंत कुणीच 'तू सध्या काय करतोय' एवढही साध विचारल नव्हतं म्हणून त्यांच्या विचारण्यानेच का होईना पदवीचं शिक्षण सार्थकी झाल्याच वाटलं. खूप उशिरा का होईना मी एक पाऊल पुढे टाकलं म्हणजेच मी अण्णांच्या सांगण्याने प्रभावित होऊन स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली हळूहळू मला अण्णा किती प्रतिभावंत आहेत हे कळलं. ज्या गणिताची सर्वांनाच भिती वाटते ते गणित अण्णा चपखलपणे सोडवताना अण्णा दिसले. हे त्यांच अद्वितीय रुप कळल्यावर तर मी अवाकच् झालो. सार्वत्रिक गणित हा भितीचा विषय असूनही अण्णांनी किती सहजरित्या ते सोडवलं... याच नवलं वाटल नाही तर नवलंच. गणित हा त्यांचा आवडीचा विषय असावा हा तर्क माझा खरा ठरला. ते मला गणिताबद्दल नेहमी सांगायचे की गणित हा विषय मुळात अवघड नाहिये अापण सर्वांनी मनाशी तसा ग्रह करुन घेतलाय. आपण कधी कुठली पाठ केले नाहीत, कधी वर्ग लक्षात ठेवले नाहीत आणि सगळ्यात महत्वाच आधुनिक उपकरणामुळे आकडेमोड करणं सोप झाल्या कारणाने अापण स्वत:हून कागद आणि पेन घेऊन कधी आकडेमोड केली नाही मग कसा सोपा वाटणार हा विषय. त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य होत पण ज्याला कळेल त्यालाच.... अण्णांना वाचनाची खूप आवड. ते सांगतात की मला जो फावला वेळ मिळतो ना त्या वेळात मी फक्त आणि फक्त वाचनाला प्राधान्य देतो. जेवढी काही वृत्तपत्र माझ्या परिकक्षेत असतील ती सर्व मी चाळून काढतो आणि आता त्यांच्या एका गौरवणीय बाबीचा उल्लेख करतो. माझ्याकडे येताना सतत काही ना काही पण उपयुक्त असणारी कात्रण ते घेऊन यायचे आणि मला आवर्जून वाचत जा अस सांगून निघून जायचे. एवढंच नाही तर कधी कधी रस्त्यावरचा कागद उचलून, तो साफ करुन जर त्यातून काही घेण्यासारख असेल किंवा वाचण्यासारख असेल तर ते माझ्यापर्यंत घेऊन यायचे. मला हे त्यांच्यातील कुठल भान असेल याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. पण यातून एक कळलं की समाजोपयोगी गोष्टी अशा रस्त्यावर पडता कामा नये.अण्णा माझ्या कडे रोज येऊन बसायचे, रोज मला नव नवीन गोष्टी त्यांच्या कडून शिकायला मिळायच्या.असेच अण्णा माझ्या शेजारी बसलेले असताना एक किस्सा सांगत होते आणि सांगताना त्यांना अचानक गहिवरुन आलं. अन बघतो तर काय त्यांच्या डोळ्यातून त्यांचे अमृततुल्य आसव सरसर खाली येताना पाहून माझे ही डोळे तरळले.तर तो किस्सा असा की, त्यांना तीन पुतणे आहेत. त्या पैकी मोठा बाहेर राहतो. मधला एम.एस्सी म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेत होता.आणि लहान मिळेल ते शेतातील अंगमेहनतीचे काम करायचा.असेच एकेवेळी परिक्षा शुल्क भरण्याकरता पुरेसे पैसे जवळ नव्हते. परिस्थिती हालाखीची असल्या कारणाने सर्वच चिंतातूर होते. आपला मधला भाऊ जो घरात एकमेव शिक्षण घेतोय याकरीता धाकटा कामासाठी वणवण करत होता.पोटात अन्नाचा एक कणही नाही , भर दुपार अन् जोडीला रणरणत ऊन . ऊन म्हणत मी अन् इकडे पोटात कावळ्यांची कावकाव होत असताना देखील तो कर्तव्य पार पाडण्याची आणि आपल्या भावाचं शिक्षण पुर्ण करण्याची जिद्द घेऊन धापा टाकीत काम शोधत होता. थोडसं अंतर पुढे गेला असेल आणि ग्लानी येऊन जमीनीवर कोसळला. तेवढ्यात जवळून जाणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसांनी तत्काळ दवाखान्यात हलवलं. हे सारं ऐकून मला कर्तव्य आणि त्याग यांचा परिचय झाला. लगेचच पुढे बोलताना अण्णा म्हणाले , ज्याचं शिक्षण पुर्ण करण्याकरता एवढ्या खस्ता खाल्या त्याला त्या गोष्टीची आणि त्यागाची कदर नाही. रक्ताचं पाणी करुन ज्याला ऐवढं शिकवलं तो आता लोखंडावर घणाघात (वेल्डिंग) करतोय. ठीक आहे तु हे काम करं पण ज्यांनी तुझ्यासाठी रात्रीचा दिवस केलाय त्यांच्या स्वप्नांना असा तडा नको जाऊ देऊ...अशा वेळी उंच स्वरात बोलून त्यांना तू निशब्द करतोस यापेक्षा वाईट काय असणार.. मला ही वाटत की जर कोणी आपल्या हिताच सांगत असेल तर त्याला निराश करु नये. हा किस्सा ऐकत असताना मी ही अचानक माझ्या भूतकाळात गेलो. मला ही माझा परिक्षा फी चा किस्सा आठवला. मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांकडे फी साठी पैसे नाही. शिक्षण थांबत की काय मला ही धास्ती. पेचप्रसंग पडलेला, काय कराव काही सुचेना. घरची परिस्थिती बिकटच. पप्पांना सांगाव फी बद्दल तर त्यांना काम नसायचं. स्वाभिमानामुळे काम नसायचं त्यांना. दशा फार वाईट. मग मम्मी ला सांगितल, मग तिने एका काकूंकडे ते पैसे मागितले तेव्हा कुठ ती भरता आली. आणि हा किस्सा कायम संस्मरणीय असेल माझ्यासाठी. असे अनेक किस्से माझ्या आयुष्यातले पण आता माझ्या लेखणीला ही गहिवरुन येतंय त्यामुळे बस्स... अण्णांच्या मुखी एक वाक्य नेहमी असायचं 'किर्तनाने माणस सुधरली नाहीत अन तमाशाने माणस बिघडली नाहीं' आणि खरंय समाज खूप विचित्र होत चाललाय. सुशिक्षित झालाय पण सुसंस्कारीत झालेला दिसत नाही. त्याकरता आधी संस्कारची बिजं रुजवणं गरजेच आहे. संस्काराशी अनभिज्ञ असलेला समाज आजही वैचारिक अकार्यक्षमतेकडे वाहवत चालला आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणणे महत्वाच आहे. म्हणून मला अस वाटत की अण्णा सारखा माणूस प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात लाभावा. अण्णांकडे बघताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती अशी की 'माणूस जगण्याच्या धडपडीत स्वत:ला सावरायलाच विसरुन जातो' प्रत्येकासाठी काही करु पाहणारा माणूस एवढा दुर्लक्षित राहीलाच कसा? पन्नाशीच्या जवळ असलेल्या अण्णांना अजूनही मूल नाही पण त्याबद्दलचा अविर्भाव त्यांच्या मुखपटलावर मला कधी दिसला नाही. प्रत्येकाने शिकाव, मोठ व्हाव, समाज व देशहितासाठी काम कराव अशी अण्णांची सर्वां बद्दलची दृढ ईच्छा. मला त्यांची एक गोष्ट जाम आवडायची की जर एखादा होतकरु मुलगा त्यांना दिसला तर ते त्याच्याकडे जात व त्याच्याशी शैक्षणिक गप्पा मारत. आणि त्याला पुढे काय करता येईल याबद्दल त्याच्याशी संवाद साधत असायचे. मग तो ओळखीचा असो अथवा नसो. एवढी शैक्षणिक कळवळा एका शिक्षकाकडे दिसून येणार नाही जेवढी अण्णांकडे दिसायची. आणि अनेकदा मी बघितल की सांगण काही मुलं मुद्दाम दुर्लक्षित करायचे. अण्णांना तो दुर्लक्षितपणा जाणवायचा पण वाईट वाटून न घेता ते त्यांच काम शिताफीने करायचे. त्यांच्या जगण्यातून त्यांचा समाजविषयक भानातून एक गोष्ट लक्षात आली , ती म्हणजे अर्थप्राप्तीसाठी जगण्यापेक्षा अर्थपुर्ण जगण केव्हाही उत्तमच. कुंभकर्णी निद्रा अवस्थेत असलेल्या तरुणाला जागे करुन त्याच्या जडण-घडणीला नवीन आकार व नविन दिशा देण्याचे काम अण्णा करत होते. मी ही असाच होतो मुलखाचा आळशी . अनेकदा ते मला सांगायचे पण मी काही त्यावर अमल केला नाही.आज खरं तर मी नव्याने जन्मलोय. नव्याने जगण्याचे स्वप्न उराशी धरुन जगतोय. एक नवचैतन्य अंतरंगात संचारलय. मला माझ्याशीच अंतर्मुख करुन देणा-या अण्णांसाठी मी ठरवलयं की मी प्रशासकीय अधिकारी होणार आणि नाहीच जमलं तर समाजसेवा नक्कीच करणार. अशा या कर्मकठीण काळात एखाद्या पार्थाला श्रीकृष्ण मिळावा तसे अण्णा मला मार्गदर्शक म्हणून लाभले हे माझे भाग्यच. ब-याच गोष्टी अण्णांकडून शिकलो पण सगुण , सदाचारी आणि सुसंस्कारी असणं सगळ्यात महत्त्वाचं.आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर माणूस कुठलही शिखर पादाक्रांत करू शकतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असाल तरीही आपण समाजाला काही तरी देणं लागतो हे मष्तिष्कात ठेऊन कार्यरत राहा. उद्या जिंकलात तर सन्मानाची अपेक्षा ठेऊ नका आणि ठेवलीच तर ती समाजाकडून सन्मानित होण्याची ठेवा. कारण त्या पेक्षा मोठा पुरस्कार नाही या जगात....
Chapters
Related Books

अण्णा
by Swapnprakash

संग्रह २
by भा. रा. तांबे

Simple Sanskrit
by संकलित

Part 1: The Loss of Friends
by Abhishek Thamke

गीताधर्म और मार्क्सवाद
by स्वामी सहजानन्द सरस्वती

AYODHYA
by Koenraad Elst

Negationaism in India - Concealing the Record of Islam
by Koenraad Elst

Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible
by Koenraad Elst

Update on the Aryan Invasion Debate
by Koenraad Elst

Arun Shourie Article Collection
by Arun Shourie