Bookstruck

देशबंधू दास 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

देशबंधू दास!

मुंबईतील एका भव्य चाळीच्या मोठया गच्चीवर सेवा दलाची मुले बसली होती. रात्रीची वेळ होती. मुले जेवूनखाऊन आली होती. गच्चीवरून समुद्र दिसत होता. त्याच्या लाटा कानावर येत होत्या. जवळची नारळीची झाडे वार्‍याने डोलत होती. मी आल्याबरोबर मुले वाटोळी बसली.

''आज कोणाच्या सांगता पुण्यकथा?'' एकाने विचारले.

''आज त्या प्रांतातील एका थोर देशभक्ताच्या कथा सांगणार आहे, ज्या प्रांतात प्रचंड नद्या आहेत; वंदेमातरम् गीत ज्या प्रांतात जन्मले व हिंदुस्थानभर गेले; सुजलां, सुफलां, सस्यशामलां ही विशेषणे ज्या प्रांताला विशेषेकरून लावता येतील; ज्या प्रांताने जगातील महान कवी दिला, जगातील थोर शास्त्रज्ञ दिला, जगातील थोर योगी दिला; ज्या प्रांताने भारतमातेसाठी अपरंपार बलिदान केले; अशा प्रांतातील थोर देशभक्ताच्या गोड व हृदयंगम गोष्टी सांगणार आहे. त्यागाच्या व वैभवाच्या कथा सांगणार आहे. कोणता बरे हा प्रांत, ओळखा?''

''बंगाल, बंगाल!'' मुले एकदम म्हणाली.

''होय. बरोबर ओळखलेत. ऐका तरा आता. गोष्टी संपेपर्यंत कंटाळू  नका.''

''त्या दिवशी विनोबाजींच्या गोष्टी ऐकताना आम्ही कंटाळलो का? वेळ कसा गेला ते समजलेसुध्दा नाही. तुम्हीच बोलून दमाल. आम्ही रात्रभरसुध्द बसू.''

''आता करतो हं आरंभ.''

विक्रमपूर परगणा

पूर्व बंगालमध्ये विक्रमपूर नावाचा परगणा आहे. गंगेचा एक फाटा व ब्रह्मपुत्रा यांची बनलेली विशाल पद्मा नदी, तिच्या तीरावर हा परगणा आहे. पद्मेला सर्वनाशा असेही नाव आहे. पद्मेला अपार पूर यावा व गावेच्या गावे वाहून जावी. पद्मेच्या काठी किती संस्कृती फुलल्या व नाश पावल्या. पद्मेने किती राज्ये उभारली व पाडली. पद्मा नदीने स्वतःच्या हाताने अनंत इतिहास लिहिला व स्वतःच पुसूनही टाकला. अंधार व प्रकाश यांचा खेळ पद्मा खेळत आली आहे. पद्मेचा प्रवाह फारच विशाल. पूर येतो तेव्हा तिचे पात्र आठआठ मैलसुध्द रूंद होते. रवींद्रनाथ या पद्मेच्या प्रवाहावर कित्येक महिने गलबतात बसूनच राहिले होते. गीतांजलीतील काही अमर गीते या पद्मेच्या संगीतात जन्मलेली आहेत.

विक्रमपूर पूर्व बंगालचे जणू हृदय. येथे कला फुलल्या, व्यापार वाढला, ज्ञान नांदले, येथले व्यापारी दूर सिंहलद्वीप, सुमात्रा, अरबस्तान सर्वत्र जात. प्रसिध्द चिनी प्रवासी हयुएन त्सँग याचा गुरू पंडित शीलभद्र त्याची येथेच जन्मभूमी तुम्ही गोपीचंदाची गाणी ऐकली आहेत ना? बोलपट पाहिला असेल. तो गोपीचंद याच प्रांतातला.

Chapter ListNext »