Bookstruck

देशबंधू दास 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असे क्षण आम्ही क्वचितच अनुभवले!

१९११ मधील गोष्ट आहे. एके दिवशी चित्तरंजनांकडे त्यांचे मित्र जमले होते. थंडीचे दिवस होते. आणि चित्तरंजनांनी सागर संगीत पुस्तक मागवून घेतले. त्यांनी त्यातील कविता म्हणून दाखविल्या. श्रोत्यांची जणू समाधी लागली. ते मित्र म्हणाले, ''असे क्षण आम्ही क्वचितच कधी अनुभवले असतील.''

सागर संगीतात तो आहे


आणि पुढे चित्तरंजनांची आई जेव्हा अत्यवस्थ होती, तेव्हा चित्तरंजन मुंबईला गेलेले होते. मुलगा केव्हा भेटेल असे मातेला झाले होते. ती पुत्रासाठी तळमळत होती. शेवटी ती माता म्हणाली, 'त्याचे सागर संगीत काव्य पुस्तक माझ्याजवळ आणून द्या. त्या पुस्तकात तो आहे.' आणि माता सागर संगीत वक्षःस्थलाशी धरून देवाघरी नेली. असे हे सागर काव्य आहे. देशबंधूंची ती वाड्मयीन मूर्ती आहे.

अंतर्यामी

अंतर्यामी या काव्यात चित्तरंजनांची श्रध्दा जागृत झाली आहे. ईश्वरी  प्रेमाचा पुन्हा उदय झाला आहे. हृदयात पुन्हा दीप लागला आहे. पुन्हा फुले फुलली आहेत. ते म्हणतात, 'वाजवा, विजयाचा डंका वाजवा. आज भय नाही. संकोच नाही. शंका नाही. शेवटी आशेचा विजय झाला. श्रध्दा व अश्रध्दा यांच्या झटपटीत श्रध्दा विजयी झाली. माझ्या गळयात किती हे विजयहार! माझे पंचप्राण या विजयाने, या वैभवाने थरथरत आहेत. हृदयात पाहा ही फुलबाग पुन्हा फुलत आहे. आज दुःख सुखमय झाले, सुख दुःखमय झाले. सुखदुःख एकरूप झाले. कोणत्या गीताच्या गर्वाने माझे हृदय भरून आले आहे.?'

असा अंतर्यामी पुन्हा भेटला. मालंच व अंतर्यामी या दोन काव्यसंग्रहांच्या मध्यंतरी दहा वर्षे गेली. दहा वर्षे हृदयमंथन चालले होते. दहा वर्षे आशा-निराशांचा झगडा चालला होता. शेवटी आशेचा, श्रध्देचा, प्रेमाचा विजय झाला.

वासंतीदेवी

आणि १८९७ मध्ये, जीवनात प्रकाश व अंधार यांचे युध्द चालू असतानाच त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव वासंतीदेवी. चित्तरंजनांच्या जीवननौकेचे सुकाणू म्हणजे वासंतीदेवी. दासांच्या जीवनांत वासंतीदेवीमुळेच संगीत आले. प्रमाण राहिले. चित्तरंजनांच्या जीवनाचा वासंतीदेवी म्हणजे मोठा आधार होता. चित्तरंजनांचा स्वभाव वासंतीदेवींना समजे, तसा कधी कोणाला समजला नाही.

« PreviousChapter ListNext »