Bookstruck

देशबंधू दास 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वाभिमानी चित्तरंजन

हा अलिपूर बाँब खटला चालवीत असता एकदा न्यायाधीश 'Non-Sense' म्हणून उद्गारला. चित्तरंजनांचे डोळे लाल झाले. हा न्यायाधीशच उद्या निकाल देणार. त्याच्याजवळ जपून वागले पाहिजे. अपमान गिळला पाहिजे. असे विचार त्यांच्या मनात आले नाहीत. ते एकदम म्हणाले, ''यावेळेस तुम्ही न्यायासनावर आहात. ही दुःखाची गोष्ट आहे. दुसर्‍या स्थितीत असते तर योग्य उत्तर मी दिले असते.''

संपत्तीच्या शिखरावर

अरविंदांच्या खटल्यात चित्तरंजन दासांनी अपरंपार मेहनत घेतली. ती निष्काम सेवा होती. परंतु पुढे अपरंपार फळ मिळाले. चित्तरंजनांची देशभर कीर्ती गेली. बंगालभर त्यांचा जयजयकार झाला. चित्तरंजनांचे अलौकिक, परिश्रम सर्व गोष्टी जनतेच्या नजरेस आल्या आणि मोठेमोठे खटले आता त्यांच्याकडे येऊ लागले. एकेका दिवसाला हजार, दोन हजार रुपये त्यांना मिळू लागले. लक्ष्मी भराभरा येऊ लागली.

परंतु ते पैशाचे आशक नव्हते. देशसेवकांचे सारे खटले त्यांनी विनामूल्य चालविले. बिपिनचंद्र पाल व ब्रह्मबांधव उपाध्याय यांचे खटले चालवीत असता ज्युरी रडली. इतके परिणामकारक चित्तरंजनांचे भाषण झाले. बंगालभर ठिकठिकाणी या खटल्यांसाठी त्यांना जावे लागे. सर्व बंगाल या सेवेसाठी त्यांचा ॠणी आहे.

जुने देणे दिले

आणि चित्तरंजनांनी आता एक चमत्कार केला. त्यांनी स्वतःचेही नाव दिवाळखोरांच्या यादीत घातले होते. परंतु आता संपत्ती आली होती. त्यांनी पूर्वीच्या देण्याचा सारा हिशोब केला. आणि सर्व देणे देऊन टाकले. न्यायमूर्ती फ्लेचर म्हणाले, 'नादारीत नाव नोंदवल्यावर मागून सर्व ॠण फेडून टाकल्याचे हे पहिलेच उदाहरण.'

कुटुंबाची प्रतिष्ठा वाढली

चित्तरंजनांच्या या कृतीमुळे सारा बंगाल चकित झाला. त्यांच्या कुळाची, कुटुंबाची प्रतिष्ठा वाढली. चित्तरंजनांची कीर्ती सर्वत्र पसरली. आता सुखाचे, भाग्याचे दिवस होते. घरात आनंद होता.

« PreviousChapter ListNext »