Bookstruck

देशबंधू दास 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोमिल्ल्याची मध्यरात्रीची सभा

आणि त्या दिवशी रात्री चित्तरंजन कोमिल्ल्यास येणार होते. पूर्व बंगालमध्ये कोमिल्ला म्हणजे देशभक्तिचे आगर. उल्हासकर दत्त हा थोर क्रांतिकारक कोमिल्ल्याचाच. कोमिल्ला शहराने जितके देशभत्तच् दिले तितके क्वचितच एखाद्या शहराने दिले असतील. दोन दिवसांनी इंटरमीजिएटची परीक्षा सुरू व्हायची होती. ती बंद पडावी म्हणून चित्तरंजन येणार होते. रात्री तुफान सभा भरली. परंतु चित्तरंजनांचा पत्ता नाही. ९ वाजले, १० वाजले, ११ वाजले; आणि बारा वाजायची वेळ आली. सभा वाट पाहत होती आणि इतक्यात चित्तरंजन आले. वंदेमातरमचा घोष शांत आकाशात दुमदुमला. सर्वांची तोंडे फुलली. चित्तरंजन थकले होते. परंतु तो उत्साह पाहून त्यांच्या भावना उचंबळून आल्या. ते उभे राहिले. आणि तेच तेच शब्द पुनःपुन्हा उच्चारीत.
'एवढया मध्यरात्री मी का आलो? बोला का आलो? का आलो सांगा. मी का पागल आहे? का आलो माहीत आहे?'

ते का आलो, का आलो शब्द श्रोत्यांच्या हृदयाचा जास्त ठाव घेत. त्या व्याख्यानाचा अपार परिणाम झाला. बहुतेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा-कॉलेज सोडली. एक प्रकारची स्फूर्ती सर्वत्र संचरली होती.

नवे महान संकल्प

काँग्रेस कार्यकारिणी समिती १९२१ च्या एप्रिलमध्ये बेझवाडा येथे भरली. आणि एक कोटी टिळक फंड, एक कोटी काँग्रेसचे सभासद, २० लाख चरखे सुरू करणे असा कार्यक्रम राष्ट्रास देण्यात आला. पुढारी आपापल्या प्रांतांत रात्रंदिवस खटपट करू लागले. क्षणाची विश्रांती नाही. चित्तरंजनांची वाणी बंगालला चेतवणी देत होती.

« PreviousChapter ListNext »