Bookstruck

देशबंधू दास 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मी भिकारी आहे. मी काय देऊ?

मरणाआधी एक वर्षाची ती गोष्ट. वंदेमातरम् गीताचे जनक व वंगीय साहित्यसम्राट ॠषि बंकीमचंद्र यांच्या पुण्यस्मरणार्थ सभा भरली होती. देशबंधू अध्यक्ष होते. त्यांनी लहानसेच भाषण केले. परंतु किती भावनोत्कट भाषण! डोळयांत मध्येच अश्रुबिंदू चमकत. श्रोते तटस्थ होते. श्वाससुध्दा हळूवारपणे जणू घेत होते. भाषणानंतर सभेत बंकीमचंद्रांची स्मृती साजरी करण्यासाठी फंड गोळा करण्याचे ठरले. तेव्हा देशबंधू सद्गदित कंठाने म्हणाले, ''मी तर भिकारी आहे. मी आता काय देऊ?''

ते शब्द श्रोत्यांच्या हृदयात गेले. जलधर नावाचा एक वृध्द मनुष्य तेथे होता. तो एकदम उठून म्हणाला, ''तुम्ही भिकारी? असे नका म्हणू. हे शब्द आमच्या हृदयाला काटयांप्रमाणे बोचतात. तुम्ही भिकारी नाही. तुम्ही राजराजेश्वर आहात. आमच्या प्राणांची तुम्ही देवता.''

माझी देशभक्ति म्हणजे देवभक्ति माझे राजकरण म्हणजे धर्म

असे हे देशबंधू होते. देशबंधू म्हणजे बंगालचे मूर्त स्वरूप. बंगाली लोकांतील गुण वा अवगुण यांची ते मूर्ती होते. बंगालवर त्यांचे अपार प्रेम. बंगालची हवा, बंगालचे पाणी. त्यांच्या रोमरोमात बंगाल होता. परंतु त्यांच्याजवळ प्रांतीयता नव्हती. हृदयात शेवटी आत भारतमाताच होती. मारुतीच्या हृदयात श्रीराम, त्याप्रमाणे देशबंधूंच्या हृदयात भारतमाता. त्यांची देशभक्ति म्हणजे देवभक्ति होती. कलकत्त्यास विद्यार्थ्यांच्या एका सभेत ते म्हणाले होते.

'ज्याला देशभक्ति, देशभक्ति असे म्हणतात ती माझ्याजवळ नाही. मी स्वतः देशभक्त नाही. मी देवाला मानतो आणि माझ्या मते परमेश्वराची प्रकट दीप्ती म्हणजेच देश.'

ते आणखी एकदा म्हणाले, 'माझे राजकारण माझ्या धर्माचं एक अंग आहे.' बंगाल प्रांतिक परिषदेचे ते प्रथम अध्यक्ष झाले. तेव्हा त्या भाषणात ते म्हणाले, 'ज्ञानाने, वयाने, सेवेने अध्यक्ष होण्यास मी पात्र नसेन. परंतु प्रेमाच्या बळावर मी येथे बसलो आहे. बंगालवर प्रेम करण्यात मी कधी कोणास हार जाणार नाही. बाळपणात हाच बंगाल माझ्या हृदयात होता. तारुण्यात तोच होता. आजही तोच बंगाल माझ्या हृदयात आहे.'

दाजिर्लिंग


असे हे त्यागमूर्ति देशबंधू, प्रेमसिंधू देशबंधू सारखी अविश्रांत सेवा करून आजारी पडले. आणि विश्रांती मिळावी, प्रकृती सुधारावी म्हणून ते दार्जिलिंगला जाऊन राहिले. हिमालयाची धवल शिखरे तेथून दिसत. हिमालय पाहताच भारताचा त्याग, तपस्या आठवते, भारताचे अध्यात्मिक जीवन डोळयांसमोर येते. आणि चित्तरंजन प्रभुप्रेमात डुंबू लागले. वैष्णवधर्माची गीते आळवू लागले. त्यांचे हृदय प्रभुमय होते. पुनःपुन्हा त्यांचे मन वृंदावनात जाऊ इच्छी. गंगातटाकी झोपडी बांधून राहू इच्छी.

« PreviousChapter ListNext »