Bookstruck

ईश्वरचंद्र विद्यासागर 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

डब्ल्यू गार्डन यंग, डिरेक्टर पब्लिक इन्स्ट्रक्शन यांस
कलकत्ता, संस्कृत महाविद्यालय
२९ ऑगस्ट १८५७.

मेहेरबानांस विनंती की

आपण तीन महिने कलकत्ता सोडून बाहेर दौर्‍यावर जाणार असे ऐकतो. यासाठी तुम्हास काही गोष्टी कळविणे युक्त आहे असे समजून हे पत्र लिहीत आहे. लवकरच मी नोकरी सोडण्याच्या विचारात आहे. राजीनामा देण्यास जी काही कारणे आहेत, ती थोडीफार खाजगी स्वरूपाची असल्यामुळे, त्यांची परिस्फुटता न करणे हेच मला बरे वाटते.

संस्कृत महाविद्यालयात जी नवीन व्यवस्था करावयाची आहे त्यास दोन-तीन महिने तरी लागतील. ते काम संपविण्यापूर्वी काम सोडून जाणे मला योग्य वाटत नाही; तेव्हा ते काम संपेपर्यंत म्हणजे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत माझ्या जागेवर मी राहणार आहे. त्या वेळेस मी माझा अर्ज रीतसर मेहेरबानांस पाठवीनच.

तुम्हास आगाऊ ही गोष्ट माहीत असावी, आणि तुम्हांस माझ्या जागेवर कोण नेमावा याचा विचार करण्यास भरपूर अवसर मिळावा या हेतूने मी हे लिहीत आहे; कळावे,

आपला,
ईश्वरचंद्र विद्यासार.

विद्यासागर यांनी बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नरांस एक पत्र पाठविले व त्या पत्रासोबत वरील पत्राची एक नक्कल पाठविली. ते पत्र असे,

कलकत्ता संस्कृत कॉलेज
३१ ऑगस्ट १८५७

लेफ्टनंट गर्व्हनर एफ्. जे. हॅल्डे यांस,

प्रिय महाशय,

काही दिवसांपूर्वी शिक्षणासंबंधी तुमचे व माझे बोलणे झाले होते. त्या वेळेस बंगालमधील प्राथमिक शिक्षणासंबंधी एक योजना करावयास तुम्ही मला मोठ्या संतोषाने सांगितले होते. मी प्रथम जरा नाखूष होतो; परंतु पुढे मी जसजसा विचार करू लागलो, तो हे काम मला फार नाजूक आहे असे दिसून आले. कारण सद्यःस्थितीतील प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थेचा विचार करावयाचा व तत्संबंधी लिहावयाचे म्हणजे माझे जे सहकारी अधिकारी आहेत, त्यांच्याच कृत्यांचा परामर्ष घेण्यासारखे आहे. तेव्हा हा अहवाल न पाठविण्याबद्दल आपण उदार मनाने क्षमा कराल अशी आशा आहे. मी कबूल केले खरे; परंतु मला सध्या अन्य उपाय दिसत नाही.

डिसेंबरअखेर मी एकंदर माझ्या नोकरीपासून मुक्त होऊ इच्छितो. यंग यांसही निमसरकारी पत्राने मी ही गोष्ट कळवून ठेवली आहे. त्याच पत्राची एक प्रत मी सोबत जोडण्याचे धाष्टर्य करीत आहे. असो.

आपल्याबद्दल आदर व पूज्यबुद्धी बाळगणारा,
ईश्वरचंद्र शर्मा.

« PreviousChapter ListNext »