Bookstruck

ईश्वरचंद्र विद्यासागर 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

यानंतर विद्यासागर यांनी अनेक विद्यालये व महाविद्यालये यांत उपयुक्त होतील अशी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. त्या वेळेस नवीनच शाळा, महाशाळा स्थापन होत होत्या. अर्थातच उपयुक्त पुस्तकांची फार जरुरी होती. ही जरूर पुरविण्यास विद्यासागर हे योग्य व विद्वान पुरुष पुढे आले. ही क्रमिक शालोपयोगी पुस्तके आजही अनेक शाळांत बालगोपालांना शिक्षण देत आहेत; त्यांची मने रिझवीत आहेत; आणि पुष्कळ प्रकाशकांस पैसाही पुरवीत आहेत.

१८५५ मध्ये कालिदासाच्या जगप्रसिद्ध सुंदरतम अशा शाकुंतल नाटकाच्या आधारे त्यांनी गद्यात ‘शकुंतला’ हा ग्रंथ लिहिला. आधीच विषय मधुर व चित्तापहारी; करुणशृंगारादि रसांनी भरलेला. विद्यासागर यांनी हा ग्रंथ इतका सुंदर लिहिला की, बंगाली लोक नागाप्रमाणे डोलू लागले. या ग्रंथाने ते वेडावले व लोभावले; आणि विद्यासागर यांची ख्याती सर्वत्र प्रसार पावली. त्या वेळचे अभिजात गद्दलेखक, गद्यलेखकमुकुटमणी असे त्यांस संबोधण्यात येऊ लागले. याच वर्षी पुनर्विवाहावर विद्यासागर यांनी विद्वत्ताप्रचुर निबंध लिहिले. विद्यासागर हे जातिवंत विचारांचे प्रवर्तक आहेत हे या प्रबंधांवरून दिसते. दुसर्‍यांचे विचार घेऊन त्यातच पुनर्विलास करणारे ते भाषांतऱे नव्हते. हे निबंध पुनरपि अशा टीकाकारांनी वाचावे व मग आपले शेवटचे मत देण्यास धजावे. या बाबतीत मतभेदास अल्पस्वल्प जागा असली तरी एक गोष्ट मात्र सर्वसंमत आहे; ती ही की, सुशिक्षित जनमनाचे आकर्षण करील, त्यांचेही मनोरंजन व हृदयाकर्षण करील अशी भाषा प्रथम विद्यासागर यांनीच उपयोगात आणली. हा विद्यासागर यांच्याच विलासी लेखणीचा पराक्रम होता. तिचेच हे वैभव होते. विद्यासागर यांच्या लेखणीने लोकमनास लोल बनविले ही गोष्ट लहानसान नव्हे. अशी सुंदर बंगाली भाषा वृद्धिंगत करण्यास, तिचे स्वागत करण्यास आपण पुढे यावे असे होतकरू नवविद्वानांस कळू लागले. ही या तरुणांस स्फूर्ती कोणी दिली? ही शक्ती कोणी निर्मिली? विद्यासागरांच्या लेखणीचा हा महिमा होता. तिला हे श्रेय आहे. बंगाली कादंबरीलेखकांचे गुरू बंकिमचंद्र लिहितात, ‘विद्यासागर आणि अक्षयकुमार दत्त यांनीच प्रथम संस्कृतप्रचुर बंगाली सुधारली. विद्यासागर यांनी जी बंगाली भाषा सजविली, तीच घेऊन आम्ही पुढे जात आहोत. ईश्वरचंद्रांनी साहित्य गोळा केले व आम्ही ते घेऊन मोठ्या डौलाने मिरवीत आहोत. त्यांनी वस्तु जमविल्या, आम्ही बाजार करीत आहोत.’ बंकिमचंद्रांचे हे मत वाचून आपणास विद्यासागर यांच्या कामगिरीचे महत्त्व कळून येईल. याचा अर्थ असा नव्हे की, त्या काळी संस्कृतमय बंगाली अजिबात थांबली. जरी संस्कृतमय घटना दिसून येत होती, तरी बंगाली आता दुर्बोध राहिली नव्हती. विशेषतः विद्यासागर हे फार मधुर व मनोवेधक लिहीत. त्यांच्या पूर्वी कोणी असे सुंदर बंगाली गद्य लिहिले नाही व त्यांच्यानंतरही त्यांची धाटणी व भाषासरणी कोणास तशी साधली नाही, असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.

अरविंद घोष यांचे नाव सर्वांस माहीत असेलच. या राजकीय संन्याशाच्या मातामहांनी (राज नारायण बोस यांनी) विद्यासागर यांस बंगाली भाषेचे जॉन्सन असे म्हटले आहे. जॉन्सन हे केवढे विख्यात पंडित होते, हे इंग्रजी जाणणार्‍यास व विष्णुशास्त्री यांची निबंधमाला वाचणार्‍यास तरी सांगण्याची जरूर नाही.

« PreviousChapter ListNext »