Bookstruck

ईश्वरचंद्र विद्यासागर 60

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विद्यासागर म्हणाले, “त्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूस ठेवून देत जा, म्हणजे माझी माणसे येऊन घेऊन जातील.” तो गृहस्थ तसे करू लागला. परंतु त्यास कोणी माणूस तर खिडकीजवळ दिसेना. “कोठे आहेत हो तुमची माणसे? मला तर कोणी दिसत नाही. गप्पा मारता.” असे स्नेही म्हणाले.

“असे माझ्या जागेवर तुम्ही बसा व मी तुमच्या जागेवर बसतो; म्हणजे तुम्हास दिसतील माझी माणसे.” असे विद्यासागर हसून म्हणाले. आपल्या जागांची त्यांनी आलटापालट केली. खिडकीत पाखरे येऊन ती फळे खात आहेत असे स्नेह्यास दिसले. या पाखरांस विद्यासागर फळे, धान्य देत; ती विद्यासागरांस मुळीच भीत नसत. विद्यासागरांची ही स्थितप्रज्ञ व प्रेमवृत्ती पाहून ‘धन्यानां गिरिकंदरेषु वसतां ज्योतिः परं ध्यायताम् । आनंदाश्रुकणान् पिबन्ति शकुना निःशंकमंकेशयाः’ या भर्तृहरीच्या योग्यांच्या वर्णनाची आठवण होते. द्विजेंद्रनाथ टागोर (रवींद्रनाथांचे वडिलबंधू) यांची अशीच वृत्ती होती असे सांगतात.

विद्यासागरांच्या अशा या निस्सीम उदारपणाचा फायदा पुष्कळ लबाड लोकही घेत. याबद्दलची एक गंमतीची गोष्ट सांगतो. एकदा एका मुलाने विद्यासागरांस पत्र पाठविले, ‘मी तिस-या इयत्तेत आहे; मजजवळ खालील पुस्तके नाहीत; तरी आपण कृपा करून पाठवाल तर गरिबावर फार उपकार होतील.’ विद्येसाठी गरीब मुलास मदत करावयाची नाही तर कोणास करावयाची? विद्यासागर यांनी या मुलास ती पुस्तके पाठवून दिली. एक वर्षाने त्या मुलाने चौथ्या इयत्तेची पुस्तके मागितली; असा त्याचा क्रम सातवीपर्यंत चालला. एकदा काय झाले, ज्या गावी हा मुलगा पुस्तके मागवून घेई, त्या गावातील शाळेचे मुख्य गुरुजी विद्यासागरांस भेटले. विद्यासागरांनी त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची चौकशी केली. ‘या नावाचा मुलगा मला माहीत नाही,’ असे गुरुजी म्हणाले. “वाः, शाळेचे मुख्य गुरुजी तुम्ही, आणि चार वर्षे सतत उत्तीर्ण होणारा मुलगा तुम्हांस माहीत नाही? झालांत कशाला मुख्य गुरुजी?” असे विद्यासागर जरा रागाने त्या गुरुजींस म्हणाले. ‘मी गेल्यावर चौकशी करून काय ते कळवीन.’ असे त्या शिक्षकांनी कबूल केले. ते शिक्षक आपल्या गावी परत आले. त्यांनी सर्व वर्गांत फिरून चौकशी केली, परंतु त्या नावाचा मुलगा त्यांस आढळेना. शेवटी चौकशी करता असे आढळले, की, त्याच नावाचा मुलगा शाळेजवळच एक दुकान घालून राहतो. त्या मुलाचे पुस्तके विकण्याचे दुकान होते आणि तो दरवर्षी विद्यासागरांकडून अशी मोफत पुस्तके मिळवी. तेवढाच जास्त फायदा. विद्यासागरांस ही गोष्ट कळविण्यात आली व त्यांस जगाचे आश्चर्य वाटले. इतका अप्रामाणिकपणा लोकांत का असावा याचे त्यांस कोडे पडे. बहुतकरून जेवढ्या लोकांस ईश्वरचंद्रांनी साहाय्य केले, त्यांनी त्या साहाय्यासाठी कृतज्ञता तर नाहीच दर्शविली; पैसे वगैरे परत नाहीच केले; तर उलट त्यांचे नुकसान करावयास, त्यांची निंदा करावयास मात्र ते तयार असत. एकदा एका मित्राने विद्यासागरांस सांगितले की, अमका अमका फलाणा माणूस तुमची निंदा करतो. लगेच विद्यासागर विनोदाने व यथार्थतेने म्हणाले, “का बरे? त्याने माझ्याविषयी मनात वाकडे का धरावे? मी त्यांचे चांगले तर काहीच केले नाही! त्याच्या उपयोगी मी अद्याप पडलो नाही; मग माझेविषयी तो दुष्टावा करितो याचे कारण काय?” ज्याचे आपण चांगले करावे, तो हटकून आपले वाईट करणार असा खरोखर विद्यासागरांस पूर्ण अनुभव आला होता.

« PreviousChapter ListNext »