Bookstruck

अन् गुलाबाला काटे मिळाले - प्रकाश क्षीरसागर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका गावात एक उद्यान होतं. तिथं नाना प्रकारची फुलझाडं, वेली आणि मोठमोठे वृक्षही होते. अर्थात खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पण अगदी प्राचीन काळातली नाही आणि अगदीच अलीकडच्या काळातली नाही. झाली असतील पन्नासेक वर्षे. या उद्यानाचं नावंच मुळी बालोद्यान होतं.तिथं खूप मुलं खेळायची. बागडायची. धिंगाणाही करायची. सगळे बाळगोपाळ या उद्यानात आले की खूश व्हायचे. त्यांना खूप खेळायला मिळायचं ना.

अर्थात सगळीचं मुलं काही गुण्यागोविंदानं थोडीच खेळताहेत. काहींना फुलांचं, कुणाला झाडांच तर काहींना वेलीचं निरनिराळ्या वनस्पतींचं कुतुहल असायचं. मग ही मुलं फुलांना हात लावायची काही फुलं तोडायची. झाडांना काही ते आवडायचं नाही. पण काय करतात बिचारी. थोडी मुलं हळुवारपणे फुलांना कुरवाळतं. फुलं तरी किती तऱ्हांची , किती रंगांची. सगळी मृदू मुलायम आणि आकर्षक वाटायची. ही मुलं कौतुकांन या फुलांकडं बघत.

या मुलांमध्ये काही मुलं मात्र टारगट होती. ती मुलं फुलं कुस्करायची दुष्टपणा करायची. झाडंही उपटायची. झाडांना कित्ती वेदना होत. पण काय करतात बिचारी. त्यात काही गुलाबाची झाडंही होती. आश्चर्य म्हणजे या गुलाबांना काटे नव्हते. त्यामुळे तर या मुलांच खूपच फावायचं. ते बिनधास्त या गुलाबांची नासधूस करायचे. गुलाबाची झाडं वैतागली. ती प्रतिकार तर करू शकत नव्हती. मग त्यांनी वनदेवीची करुणा भाकली आणि आपलं दुःख त्यांनी देवीला सांगितलं. देवीनं स्मित केलं आणि त्यांना अभय दिलं. गुलाब बाळांनो मी तुमचं दुःख जाणलंय. आता तुम्ही उद्यानात जा. उद्यापासून तुम्हाला कोणताही मुलगा त्रास देणार नाही.

दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. त्या दिवशी होता रविवार. ही टारगट मुलं आली की. त्यांना गुलाबाची रंगीबेरंगी फुलं दिसली. लाल, पिवळी, गुलाबी मोहकशा रंगांची. मुलांना खूप हाव सुटली. काही टारगट मुलांनी फुलांना तोडायला हात पुढं केला तर काय आश्चर्य. मुलं ओरडू लागली. मुलांच्या हातातून रक्त येऊ लागलं. ती दूर पळू लागली. मुलांना आणि फुलांनाही काही कळेना. मग मोगरा, जाई, जुई आणि काही मोठ्या गुलाबांनी पाहिलं. तर गुलाबांच्या फांद्याफांद्याला काटे आले होते. अन् तेच या मुलांच्या हातात घुसले होते. मुलांना अद्दल घडली म्हणून गुलाब खूश झाले. त्यांनी वनदेवीचे मनोमन आभार मानले.

« PreviousChapter ListNext »