Bookstruck

आजचे अनुभव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आजचे अनुभव आपले एक वाचक मित्र अक्षय परमाने यांनी पाठवले आहेत... माझी आई एकदा आमच्या आजीकडे, वडिलांच्या आईकडे, गेली होती. आई रेणुका देवीची भक्त आहे. तिला रेणुका देवीचे मुख्य मंदिर, जे बेळगाव, अथणी तालुका इथे कोकत्नुर या गावी आहे, तिकडे जाण्याची इच्छा होती. आई पूर्वी कधी तिकडे गेली नव्हती, माझी आजीच सर्व देवाचे पहायची. जत्रा, उपास, आणि इतर पूजा-अर्चा आणि विधींसाठी आजी आणि गावातले इतर रेणुका भक्त गाड्या करून तिकडे त्या गावी जात, तिथे ३-४ दिवस राहून सर्व विधी करून मग परत येत असत. माझी आई त्या ठिकाणी जायला निघाली. आईला त्या ठिकाणाबद्दल माहिती नसल्यामुळे गावातली एक बाई आईने सोबत म्हणून घेतली आणि तिचा सर्व खर्चही उचलला. त्या बेळगावला गेल्या. त्या दिवशी मंगळवार होता, देवीचा वार. त्यामुळे खूप गर्दी होती. स्त्रियांची तर खूपच गर्दी होती. तिथे ४-५ वेगवेगळी मंदिरे आहेत. खूप गर्दी असल्यामुळे त्या सोबत आलेल्या बाईने आईला एक दोन ठिकाणी बाहेरूनच मुख-दर्शन करून नमस्कार करायला सांगितला. आईला काहीच माहिती नसल्यामुळे ती बाई सांगेल तसे आई करत गेली. नंतर आईने त्या बाईला विचारले, “रेणुका देवीच्या मुख्य मंदिरात कधी जायचे?” त्यावर ती बाई बोलली, “आपण मघाशीच बाहेरून दर्शन घेतले ना, तेच मुख्य मंदिर. त्याच्या बाजूला परशुरामाचे मंदिर होते आणि त्यानंतर मारतंगी देवीचे.” आईला खूप वाईट वाटले. ती बोलली “आधी का सांगितले नाही. इतक्या दुरून तुमचा सर्व खर्च करून का आणलेय मी तुम्हाला इकडे? नीट दर्शन पण झाले नाही...” त्यावर ती बाई बोलली कि जाउदे आता नंतर कधीतरी दर्शन घे. पण आईच्या मनात मात्र चुटपूट लागून राहिली. दर्शन झाले नाही हे तिला ठीक वाटत नव्हते. तिथे प्रवासी वाहतूक देखील टेम्पोने होते. त्यामुळे घरी जाण्यासाठी त्या दोघी टेम्पो मध्ये जाऊन बसल्या. आई डोळे मिटून विचार करत होती, ‘आपण आई रेणुकेच्या दर्शनाला इतक्या दुरून आलो पण तरीही दर्शन झाले नाही... आपले काही चुकले तर नाही ना? असे का झाले असावे....’ इतक्यात आईला त्या टेम्पोच्या बाहेर एक खूप तेजस्वी अशी दिसणारी म्हातारी स्त्री आली आहे असे जाणवले. शुभ्र पांढरी साडी, एका हातात काठी तर दुसर्या हातात आई रेणुकेची परडी आणि चेहऱ्यावर मंद स्मितहास्य अशी ती स्त्री म्हातारी होती तरीही खूप तेजस्वी दिसत होती. पण आईने डोळे उघडले तर समोर कुणीच नव्हते. आईने लगेच बाजूच्या एका वयस्कर स्त्रीला हे सर्व सांगितले त्यावर ती स्त्री बोलली, कि तू मघापासून बोलत होतीस ना कि तुला आईचे दर्शन झाले नाही... रेणुका आईने तुझी भेटीची आस, तळमळ पाहिली, म्हणून आई स्वतः येऊन तुला दर्शन देऊन गेली. पहा, देव भक्तीचा किती भुकेला आहे.... दुसरा अनुभव माझा स्वतःचा आहे. माझे लग्न झाले तेव्हा आम्ही वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. आधी रेल्वेने नाशिकला आणि तिथून पुढे सिटी बस ने नांदुरी आणि मग नांदुरी वरून वणीला बस ने गडावर असा प्रवास ठरवला होता. पण नाशिक मध्ये आम्हाला बस उशिरा मिळाली त्यामुळे पुढची वणीची बस चुकली. आम्ही दोघेच तिथे थांबून होतो, काय करावे समजत नव्हते. अनोळखी जागा आणि माणसे... माझी पत्नी अगदी मनापासून देवीचा धावा करत होती, “आम्हाला यायचे आहे तुझ्या दर्शनाला, एखादे वाहन मिळूदे....” आणि तेवढ्यात एक बस दिसली. ती बस स्वतःहूनच आमच्यापाशी येऊन थांबली आणि वाहकाने विचारले, “कुठे जाणार?” आम्ही सांगितले कि गडावर वणीला जायचे आहे, तेव्हा तो बोलला कि बस तिथेच जाते, या आत. गाडी पूर्ण भरली होती. फक्त एका सीट वरच्या दोन पैकी एक जागा रिकामी होती. दुसर्या जागेवर एक लहान मुलगा बसला होता. मी माझ्या पत्नीला तिथे बसवले आणि स्वतः उभा होतो. पण तेवढ्यात त्या मुलाच्या आईने त्याला स्वतःच्या मांडीवर घेतले आणि आम्हाला जागा मोकळी करून दिली. त्यानंतरचा प्रवास अगदी नीट झाला. दर्शन देखील अगदी उत्तम झाले. आम्ही देवीचे अगदी मनापासून आभार मानले. पहा देवीचा महिमा... भक्ताच्या हाकेला देवी सदैव धावून जाते. तिची भक्ती करणे सोडू नये. कारण देव फक्त आणि फक्त भक्तीचा भुकेला असतो.
« PreviousChapter ListNext »