Bookstruck

इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशी पत्रें जमा होत होती; त्यांत ओझर्डेकर पिसाळ देशमुख यांचे दप्तर मिळण्याचा संभव दिसू लागला. कांही अस्सल कागद मिळालेही. हें दप्तर औरंगजेब याने दक्षिणेकडे स्वारी केली त्यावेळचें असून त्या काळच्या इतिहासावर बराच प्रकाश पाडणारें आहे. हें घराणें सुप्रसिध्द सूर्याजी पिसाळ देशमुख यांचे असून त्यांचेशी झालेला बादशहाचा पत्रव्यवहार या दप्तरांत आहे. सूर्याजी हा बादशहास मिळाल्यावर त्याने स्वत:चे जातभाई जे मराठे त्यांस गनीम असें पत्रांत लिहिलेलें राजवाडे यास दिसून आले, तेव्हां राजवाडे यांस संताप आला. स्वजनद्रोहाचें भयंकर पातक करून पुन्हा त्यांस शिव्या देणें म्हणजे काय असें त्यांस वाटलें. राजवाडे यांनी ही पत्रें ग्रंथमालेंत प्रसिध्द करितांना एक टीप लिहून 'सूर्याजी' हा राजद्रोही होता. असें प्रसिध्द केलें. ही गोष्ट या घराण्यांतील मंडळीस कळल्यावर त्यांनी राजवाडे यांस दप्तर देण्याचें साफ नाकारिलें. ते म्हणत 'हल्लीचे गायकवाड, शिंदे, होळकर, हे इंग्रजांशी सलोख्यानें वागून त्यांच्या हितांत समरस होतात, तरी ते राष्ट्रद्रोही ठरत नाहीत, मग त्यावेळच्या असलेल्या सार्वभौम सत्तेशी सूर्याजी पिसाळ समरस झाला तर तो राष्ट्रद्रोही कसा?' परंतु राजवाडे यांनी आपलें म्हणणें सोडलें नाही; व हें दप्तर हाती येण्याचा मार्ग खुंटला.

वाई प्रांतांत इतिहासासंबंधी कागदपत्रें शोधीत असतां त्यांस जुनी काव्यें वगैरेही सापडत. जुनी ज्ञानेश्वरी त्यांस सांपडली; दासोपंताचें एक बाड सांपडलें दासोपंताचे काव्य छापण्यासाठी महाराष्ट्र सारस्वत म्हणून एक मासिक सुरु झालें. तें कांही दिवस चालू होतें.

एकदां हें संशोधनाचें काम महत्वाचें म्हणून पटल्यावर राजवाडे यांनी सर्व जीवित त्यास वहावयाचे ठरविलें. ठिकठिकाणी ते वणवण हिंडले. काशीपासून रामेश्वरपर्यंत जेथेजेथे म्हणून कागदाचा चिटोरा मिळण्याचा संभव, तेथें तेथें ते हिंडले. ते बलुचिस्थान व अफगाणिस्थान इकडेही गेले होते. कोठें जाण्याचें त्यांनी बाकी ठेवलें नाहीं. त्याप्रमाणें सर्व ऐतिहासिक स्थळें, किल्लेकोट, गुहा, द-या, राजवाडे, शिलालेख, दर्गे, लेणी सर्व त्यांनी नीट पाहिलें. सर्व महाराष्ट्र त्यांच्या डोळयासमोर उभा असे. कधी कधी या स्थाननिरीक्षणाच्या नादानें त्यांच्यावर भयंकर संकटें ही ओढवत, परंतु दैवसाहाय्यानें ते यांतून सुरक्षित बाहेर पडले. एकदां खांदेरी उंदेरी हें मुंबई जवळील समुद्रांतील ठिकाण नीट पहाण्यासाठी म्हणून मुंबईस ते कुलाबादांडी जवळ ओहटी होती, तेव्हा गेले व सर्व प्रदेश नीट न्याहाळून पहात होते. रात्र होत आली व भरती लागण्याची वेळ आहे, याकडे त्यांचें लक्षच नव्हतें. पहारेकरी म्हणाला 'येथें रात्रीचें राहावयाचें नाही.' शेवटी पाण्यांतून पोहत जावयाचें त्यांनी ठरविले. त्यांच्या बरोबर एक मुसलमान खलाशी येण्यास तयार झाला, परंतु मार्गात त्या भरतीत त्या मुसलमानाने चकविले. मुंबईस त्यावेळी हिंदुमुसलमानांचे दंगे चालू होते. त्या मुसलमानानें तर हातावर तुरी दिल्या. समुद्रांत लाटाशी दोन हात खेळत हा पठया सारखा पुढें येत होता. परंतु कोठे जातों हें कळेना. इतक्यांत त्यांस एक अंधुक दिवा दिसला. त्या दिव्याच्या आधारानें ते चालले. एक कोळी जाळें पसरून मासे पकडीत होता. राजवाडे खूप मोठयानें ओरडले. कोणी तरी पाण्यांत पोहून येण्याची धडपड करीत आहे हें त्या कोळयानें ताडलें व त्यानें आपलें जाळें खूप दूरवर फेंकले. त्या जाळयाच्या आधाराने राजवाडे किना-यावर आले. त्या कोळयानें त्यास घरी नेऊन पोंचविलें. राजवाडे यांनी त्यास चांगलें बक्षीस दिलें हें सांगण्याची जरुरी नाही. सुदैव महाराष्ट्राचें व भरतवर्षाचे की, त्या काळाच्या जबडयांतून हा थोर पुरुष बचावला. अशाप्रकारे सर्व जागा त्यांनी डोळयांखालून घातल्या. पुण्याची माहिती तर त्यांच्या इतकी कोणासच नव्हती. कोणत्या ठिकाणी कोण होते, काय होतें सर्वं ते सांगत.

« PreviousChapter ListNext »