Bookstruck

सर्वत्र नकार 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आंतरराष्ट्रीय वृत्ती वाढत आहे, ही गोष्ट खरी. अर्थशास्त्रज्ञ सांगत आहेत की युद्धाने फायदा नाही. युद्ध म्हणजे शेवटी आतबट्टाचा व्यवहार. युद्धाने दिवाळे निघण्याचीच पाळी येते. काही लोक धोरण म्हणून तरी शांततावादाचा पुरस्कार करु लागले आहेत. तशी त्यांची प्रामाणिक निष्ठा असते असे नाही. आंतरराष्ट्रीय वृत्ती अद्याप खरी आंतरिक झाली नाही. ती ओठांवर आहे, पोटात नाही. मागच्या महायुद्धांत प्रत्येक राष्ट्रातील काही, मूठभर लोक आंतरराष्ट्रीय धर्माला चिकटून राहीले, त्यांनी त्या तत्त्वाला धैर्याने जवळ धरले; परंतु बाकीच्या बहुतेकांनी राष्ट्राच्या स्थंडिलावर आंतरराष्ट्रीय धर्माचा बळीच दिला! शांतीधर्मावर प्रवचने देणारे मोठेमोठे धर्मोपदेशकही शेवटी दांभिकच ठरले! त्यांनी ईश्वरासाठी चर्चे व मंदिरे उभारली; परंतु ईश्वराच्या आदेशाचा तुच्छतेने तिरस्कार केला. चर्चे रिक्रूटभरतीची स्थळे झाली. जो तो आपणास जय मिळावा म्हणून ईश्वराची प्रार्थना करु लागला. आपल्या बाजूला देव आहे, असे सारे म्हणत. धर्मोपदेशक आपापल्या राष्ट्राच्या शिपायांना आशीर्वाद देत होते, विजयी व्हा म्हणत होते. ईश्वर गोंधळून गेला असेल बिचारा ! जे. सी. स्क्वायर या कवीने त्या वेळेची स्थिती मोठ्या मार्मिकपणे वर्णिली आहेः

युद्धात गुंतले देश। चढला त्यांना रणावेश
त्यांच्या प्रार्थना जगदीश। ऐकता झाला।।
देवा, इंग्लंड हे सांभाळी। देवा, राजा आमुचा प्रतिपाळी
देवाच्या कानीकपाळी। नाना प्रार्थना आदळती! ।।
देवा, तू आमचा। देवा, तू नाही त्यांचा
देवा हे करी, ते करी, ऐशी वाचा। सारी राष्ट्रें गर्जती।।
देव म्हणाला मनात,। ‘देवाची नाही धडगत!
देवाचे कार्य मिळविती धुळीत। किमर्थ ओरडती कळेना’।।

राष्ट्रसंघ वगैरे स्थापन झाले. सारे खरे; परंतु प्राणाशिवाय कुडी काय कामाची? राष्ट्रसंघातील घटक सदैव परस्परांविषयी साशंकच असतात. अविश्वास व असदिच्छा यांचेच प्राबल्य आहे. खरी आंतरराष्ट्रीय वृत्ती फारच थोड्या लोकांजवळ आहे. ती अद्याप सर्वसामान्य मानवी मनाची अभिजात वृत्ती झाली नाही. १९१४ च्या ऑगस्ट महिन्यात आकाश काळे कुट्ट होते. महायुद्ध संपून तह झाले. तह होऊन गेली. परंतु आकाश निर्मळ झाले आहे का? पूर्वीहून स्वच्छ झाले आहे का? नाही; आकाशात अद्याप अंधारच आहे. गेल्या महायुद्धाच्या आरंभी जितके सैन्य युरोपात होते, त्याच्यापेक्षा आज युरोपात किती तरी पटीने अधिक सैन्य आहे. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ, आपण जगाची पुनर्रचना व पुनर्घटना करणारे, आपण देवाचे प्रेषित, या भावना आजही कोणी सोडल्या आहेत असे नाही. अशा अहंकारातूनच युद्धे जन्मतात. असले अहंकार आपल्या राष्ट्रात नसावे अशी नम्रता दाखवण्यात कोणीही तयार नाही. प्रत्येक राष्ट्र म्हणत आहे की, आम्ही काय ते खरे. तो खरा देशभक्त, जो फक्त स्वतःच्या देशापुरतेच पाहील. थिऑडॉर रुझवेल्ट एकदा म्हणाला की, ‘पत्नीलाच द्यावयाच्या प्रेमात पतीने जर दुस-या एखाद्या स्त्रीस भागीदार केले तर ते जसे अश्लील व असभ्य, त्याप्रमाणे नागरिकाने जे प्रेम संपूर्णपणे आपल्या देशालाच द्यावयाचे त्यात जर इतर राष्ट्रेही भागीदीर केली तर ते अयोग्य व अधर्म्य़ होय.’  अशा प्रकारे स्वतःच्या राष्ट्रावर प्रेम म्हणजे दुस-या राष्ट्रांचा द्वेष असे झाले आहे. राष्ट्राराष्ट्रांमधील हे द्वेष, राष्ट्राराष्ट्रांच्या परस्परांस मारक अशा या महत्त्वाकांक्षा, यामुळे शांती नाहीच. चाणक्यनीतीच सर्वत्र मानली जात आहे. कपटी कारस्थाने व डावपेच म्हणजेच राजकारण असे झाले आहे. राष्ट्रे निःस्वार्थ बुद्धीने सहकार्य करण्यास तहानेली नसून स्वार्थांध होऊन दुस-यावर सत्ता गाजविण्यासाठी अधीर झाली आहेत.

« PreviousChapter ListNext »