Bookstruck

प्रश्न 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

संस्कृती  व सुधारणा ही बाहेर नसून आपल्या अंतरंगात आहेत. तुमच्या नैतिक कल्पनांत, तुमच्या धार्मिक विचारांत, समाजाकडे पाहण्याचा तुमच्या दृष्टीकोणात संस्कृती भरलेली असते. आगबोटी आहेत व आगगाड्या आहेत, टंकलेखक आहेत व टेलिफोन आहेत, एवढ्यावरुन आपण सुधारलो, असे म्हणता येणार नाही. माकड दुचाकीवर बसायला शिकले, दारुचा पेला तोंडाला लावू लागले, चिरुट ऐटीने ओढण्यात तरबेज झाले, तरी शेवटी माकड ते माकडच ! यांत्रिक सुधारणा म्हणजे काही नैतिक सुधारणा नव्हे. बडा कारखाना चालवता आला एवढ्याचवरुन मनही मोठे झाले, असे म्हणता येणार नाही. आजच्या काळापेक्षाही प्राचीन भारतवर्षातील व ग्रीस देशातील किंवा मध्ययुगीन इटलीतील भौतिक शास्त्रांचे ज्ञान जरी कमी असले, किंवा यांत्रिक उद्योगधंदे त्या वेळी त्या देशांत आजच्याएवढे अवाढव्य नसले, तरी त्या लोकांना आध्यात्मिक मूल्यांची अधिक यथार्थ कल्पना होती, जीवनाची कला आपल्यापेक्षा त्यांना अधिक सत्यतेने कळली होती, यात शंका नाही. नवीन नवीन वस्तूंसाठी पिसाटाप्रमाणे धडपड करणे, पैशासाठी प्राणघेणी स्पर्धा करीत राहणे म्हणजे जर संस्कृती नसेल तर आपणास प्राचीन ग्रीक लोकांपासून किंवा हिंदी नि चिनी लोकांपासून जीवनाच्या कलेत किती तरी कल्याणकारक गोष्टी शिकता येतील. चीन, हिंदुस्थान किंवा ग्रीस यांच्यामध्ये दोष नव्हते असे नाही. ग्रीस देशातील नागरिक सुसंस्कृती होते, कलावान व ज्ञानवान् होते. परंतु त्यांना स्वतःचा हा विकास करुन घेण्यास फुरसत कोणी दिली ? त्यांच्या देशातील गुलामांनी ! जीवनाला आवश्यक असणा-या शेकडो गोष्टी निर्मिण्यासाठी जे अहोरात्र राबत व कष्टत त्यांना नागरिकत्वाचे हक्क या ज्ञानकलासंपन्न होणा-या ग्रीकांनी दिले नाहीत. श्रमणा-या लोकांच्या गुलामगिरीवर ग्रीकांची संस्कृती उभी होती. भारतीय संस्कृती जरी सर्वांचा संग्रह करीत होती. त्या त्या लोकांच्या स्थानिक आचारविचारांना सहानुभूतीने वागवीत होती, नाना जाती-जमातींना एकत्र आणून तिने जरी एकत्व निर्मिले, तरी तिच्यात एक महान दोष दिसून येतो. ज्ञानाचा दिवा तिने सर्वत्र नेला नाही, शूद्रांना ज्ञानाचा अधिकार दिला नाही. मागासलेल्या लोकांना तसेच अज्ञानात ठेवण्यात आले. भारतीय संस्कृतीतील मोठमोठी ध्येये कितीही सुंदर व उदात्त असली तरी ती समाजाच्या खालच्या थरापर्यंत गेली नाहीत. आणि पुढे पुढे तर अनियंत्रित राजसत्ता तेथे स्थापन झाल्यापासून ती मोठमोठी ध्येयेही दूरच राहिली. हुकूमशहांच्या कारकीर्दीतून मानव्याचा मोकळेपणाने विकास होणे बंदच झाले.

आजची संस्कृती म्हणजे आर्थिक क्षेत्रातील जंगलीपणा. आजची संस्कृती सत्ता व संपत्ती यांना मानते, आत्मा व आध्यात्मिक पूर्णता यांना झुगारते. जगाचा आदि काय व अंत काय हे आपणास कळणे शक्य नाही.’कस्त्वम् ?, कुत आयातः ?’ हे प्रश्न कधीही सुटावयाचे नाहीत. म्हणून आपल्या सभोवती काय आहे, तेवढेच पाहावे, हाती घेतलेले काम नीट करावे, आपला उद्योगधंदा पाहावा, व्यवहार सांभाळावा, अशी धडपड जीवनाचे बाह्य स्वरुप नीटनेटके करण्यासाठी अहोरात्र चालली आहे. बाहेरुन रंगरंगोटी चालली आहे; सृष्टिसत्तेवर ताबा मिळवावा, जगाची औद्योगिक पाहणी करावी, संसार सुधारावा, मनुष्याचे जीवन अधिक सुखी करण्यासाठी नैसर्गिक शक्तींवर विजय मिळवावा.

« PreviousChapter ListNext »