Bookstruck

माणसांप्रमाणे वागा 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपण आपली श्रेष्ठता प्रकट केली पाहिजे. तिचा कोंडमारा करता कामा नये. आपण आपल्या श्रेष्ठतेचे समर्थन केले पाहिजे. जो सर्प दंश करीत नाही, एवढेच नव्हे तर फणा उभारून फुत्कारही करीत नाही, त्या नागाला सर्वांनी दगडधोंडे मारून कसे दीनवाणे केले, ही गोष्ट श्रीरामकृष्ण सांगत असत. तुम्ही दंश करू नका, परंतु फुत्कार तरी करा. जे राष्ट्र फुत्कार करण्याचे विसरत नाही, त्याच्यावर दुसर्‍याला दंश करण्याची पाळीच येणार नाही. ह्या मार्गाने खरी शांती जगात येणे शक्य होईल. ज्याने “दंश करू नका, परंतु फुत्कार करा” असे ध्येय जगाला दिले, त्याची बुध्दी किती स्वच्छ व सतेज असेल बरे ? आजूबाजूच्या सर्व वादविवादात बुडी मारून “तुम्ही माणसांप्रमाणे वागा, मर्दाप्रमाणे वागा” हे सिध्दान्त मौतिक ज्याने आपणास आणून दिले, त्या थोर पुरुषाचे मनही कसे व्यापक व अचूक ग्राही असेल, नाही का ?

आपण माणसाप्रमाणे वागावयाचे म्हणजे काय ? म्हणजे आपण ध्येयाला सदैव चिकटून राहावयाचे. समरांगणात सदैव आघाडीला असावयाचे; परंतु दरबारात बक्षिससमारंभाचे वेळी सर्वांच्या मागे रहावयाचे. सीता शोधावयास, समुद्र ओलांडावयास, लंका जाळावयास, द्रोणागिरी आणावयास तयार, परंतु प्रभू रामचंद्र सर्वांस पारितोषिके देत असता दूर एका बाजूस रामनाम जपण्यात तल्लीन असा जो हनुमंत.... तो आपला आदर्श. अंतर्बाह्य सदैव झगडण्याचेच काम, सदैव युध्दाचाच प्रसंग. कार्य कोणतेही असो, आत्मसंयमन करा व नीट ध्येय पाहून पुढे चला. स्वत:ला गती द्या. प्रत्येक साधनाचा उपयोग करा. कोणताही उपाय वगळू नका. प्रयत्नांची शर्थ करा, जिवाचे रान करा, रक्ताचे पाणी करा, ह्या जागतिक स्पर्धेत, प्रत्येक गोष्टीत पुढे या, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चीत करीन, मागे टाकीन, अशी हिंमत बाळगून पुढे या. अर्वाचीन शास्त्रीय ज्ञान - ते इतरांच्या इतकेच आपलेही आहे- करा तर ते आपलेसे. सत्याचा शोध नाना रूपांनी करावयास आपणही सुसज्ज झाले पाहिजे; बांधा, कमरा. सामाजिक जीवनात प्रामाणिकपणा नाही. चला, आधी तो आणू. आपल्यासाठी भाग्य उभे आहे, मानसन्मान उभे आहेत. नवीन नवीन अपरिचित अशाही कर्मक्षेत्रांत व ज्ञानक्षेत्रांत घुसून तेथेही पूजार्ह आपण होऊ या. सामुदायिक जाणीव, सामुदायिक सामाजिक व्यक्तित्व होय, ह्या गोष्टीही आपल्याजवळ आहेत. सारे काही आपणाजवळ आहे. फक्त नवीन कार्यक्षेत्रात नवीन रूपाने त्यांचा आविष्कार करावयाचा आहे एवढेच. सामाजिक कार्य करण्याची आवड, त्यागाची वृत्ती- यांना आपण काही पारखे नाही.

वरच्या शब्दांनी दिग्दर्शित झालेले ध्येय गाठण्यासाठी, सर्वांगीण शिक्षणासाठी आपण अहोरात्र धडपडले पाहिजे. कोंडलेला मनुष्य शुध्द हवेसाठी, दुष्काळात सापडलेला अन्नासाठी, तहानलेला पाण्यासाठी, त्याप्रमाणे आपण नवीन ज्ञानासाठी, नवीन अनुभवासाठी आतुर व उत्कंठित झाले पाहिजे. जागतिक स्पर्धेत नीट टक्कर देता यावी म्हणून सर्व साधने प्रथम हस्तगत करून घेऊ या. आणि मग अर्वाचीन सुधारणेच्या सर्व कसोटयांचा प्रकाश जरी आपल्यावर सोडण्यात आला, तरी आपण दिपावून जाणार नाही. हे अर्वाचीन संस्कृती ! तुझ्या लखलखाटाने भारतमातेची बाळे का बुजून जातील ? खचून जातील ? नाही. त्रिवार नाही. ते तुलाही पचवून टाकतील, तुझ्या झिंज्या धरून तुला ओढून घेतील व आपल्या पायावर तुला लोळण घेण्यास लावतील !

« PreviousChapter ListNext »