Bookstruck

पत्र नववे 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आमच्यांतील कांही परंपरापंडित म्हणतात, '' पूर्वजांच्या वैभवाची हीं चिन्हें आहेत. ती राहूं देत. ती नष्ट करणें कृतघ्नपणा आहे ! '' परंतु तीं नष्ट व्हायला नको असतील तर त्यांना थोडी सुधारणा करुं दे. ज्यांना नष्ट व्हायचे नसेल त्यांनीं युगधर्म ओळखला पाहिजे. सतराव्या-अठराव्या शतकांतील नवाबी थाटानें त्यांना अत :पर राहता येणार नाहीं. बदला, नाहीं तर नष्ट व्हा !

या संस्थानिकांना जर कांही स्वाभिमान असता, या देशाचे आपण याची कांही लाज असती तर उत्कृष्ट कारभार चालवून त्यांनीं ब्रिटिशांस लाजविलें असतें. ब्रिटिश सरकार बोलूनचालून परकी. सहा हजार मैलांवरुन आलेलें. त्यांना हिंदुस्थानविषयीं का म्हणून आपलेपणा वाटावा? ते रक्त शोषण करण्यासाठींच आले आहेत. परंतु संस्थानिक तर आमचे ना? ते येथलेच ना? त्यांनी आदर्श कारभार कां हाकूं नये? आम्हा ब्रिटिश हिंदुस्थानांतील लोकांना असे कां सांगता येऊं नये कीं, '' संस्थानांतील तो सुंदर कारभार पहा, तेथें पहा लोकसत्ता आहे. सर्व कारभार जनतेच्या हातीं अहे. '' परंतु असें होण्याऐवजीं उलट संस्थानांतच जाऊन नेहमी सांगावें लागतें की '' ब्रिटिश हद्दींत आहेत तसे तरी कायदे येथे करा. तितकें तरी स्वातंत्र्य तुमच्या संस्थानांतून द्या. '' पदोपदीं ब्रिटिश हिंदुस्थानाकडे पहा असे सांगावें लागणें लाजीरवाणे आहे. त्याने आमची मान खालीं होते. पूर्वजांचीहि मान खालीं होते असेल.

आम्हां महाराष्ट्रीयांना आमचें साम्राज्य अद्याप आठवते ! साम्राज्यात जे त्याग झाले, जी शौर्य-धैय-त्यागाची कृत्यें झाली तीं सदैव वंदनीयच आहेत. परंतु त्यावेळेस आम्ही आमचे साम्राज्य निर्मित होतो, हें विसरून चालणार नाहीं !! आम्हाला बडोदे, ग्वाल्हेर, इंदूर, कोल्हापूर, सांगली, मिरज वगैरे लहानमोठया संस्थानाचा अभिमान वाटतो ! परंतु त्या संस्थानिकांनी प्रजेला हक्क दिले तर तो अभिमान सार्थ होईल. बडोदे संस्थान हें गुजरातमध्यें. मराठयांनी गुजरातवर स्वा-या केल्या. आपली सत्ता तेथें स्थापली आपले अधिकारी नेमले. जित व जेते असे संबंध सुरू झाले ! मला असें मागें कळलें कीं, डाकोर या देवस्थानचे पुजारी हे महाराष्ट्रांतले आहेत. गुजरातमधील देवस्थानंचें पुजारीहि महाराष्ट्रीय नेमले गेले ! अहमदाबादला महाराष्ट्रीय वस्ती ज्या भागांत आहे, त्या भागाला ' भद्र ' म्हणतात ! हा भद्र भाग पूर्वीहि होता कीं महाराष्ट्र जेते स्वत:ला ' भद्र ' व 'उच्च' समजून वागूं लागले तें देवाला माहीत ! तें पूर्वीचें जावो, गुजराती भाषेंत मराठयाविषयीं वाक्यप्रचार-खेडयापाडयांतून रूढ आहेत ते ऐकले म्हणजे आपली कारकीर्द तिकडील लोकांना कितपत मानवली ते दिसून येईल ! एकदां पूज्य विनोबाजीस कोणीं विचारलें, '' काकासाहेब कालेलकर महाराष्ट्र सोडून गुजरातेंत कशाला गेले? त्यांच्या सेवेला महाराष्ट्र मुकला. '' तेव्हां विनोबाजी म्हणाले, '' आपण पूर्वीं जें पाप केलें तें निस्तरावयास काका तेथें गेले आहेत. पूर्वी सत्ता गाजविली, आतां थोडीं सेवा करुं या. ''

परंतु बडोदे प्रजामंडळ जर म्हणालें कीं, आमच्या हातांत सत्ता द्या तर आम्हां महाराष्ट्रीयांना राग येतो ! या गुजरात्यांना मराठी राजा बघवत नाहीं, असें आपण म्हणतों. जर महाराष्ट्रीयांना लोकशाहीची, स्वराज्याचीं खरी आवड असेल तर ते म्हणतील कीं, बडोदे संस्थानांत बहुतेक प्रजा गुजराती आहे. त्यांच्या हातांत राज्यकारभार जाणें साहजिक आहे. त्यांनीं तसा कारभार मागितला तर चूक काय? परंतु आम्हांला गुजराती बंधूंची रास्त मागणिहि अन्यायाची वाटते. कारण आमच्या रक्तांतील तो जुना साम्राज्यवाद जात नाहीं ! आमच्या जुन्या साम्राजयवादाचीं हीं चिन्हें आतां लोकशाही स्वरुपांचीं व्हावीं असें जर आम्हांस अद्यापहि वाटत नाही तर ब्रिटिशांनीं मात्र येथली साम्राज्याची मगरमिठी सोडावी असें आम्ही कोणत्या तोंडाने म्हणावे?

« PreviousChapter ListNext »