Bookstruck

पत्र अकरावे 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विषमतेचें उच्चाटन हें मानवाचें ध्येय
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

माझीं पत्रें तुला व तुझ्या सेवा दलांतील मित्रांना आवडतात. हें वाचून मला बरें वाटलें. मला माझी मर्यादा माहीत आहे. सांगोपांग ज्ञान मला नाहीं. परंतु समर्थांनी सांगितलें आहे कीं, जें जें आपणांस माहीत असेल तें तें द्यावें. काजव्यानें आपल्या शक्तींनें चमकावें. तारे आपल्यापरी चमकतील. चंद्रसूर्य त्यांच्या शक्तीप्रमाणें प्रकाश देतील. माझ्यानें राहवत नाही. भारतीय तरुणांकडे माझें मन धांवतें. त्यांना मिठी मारावी व भारताच्या ध्येयाकडे त्यांना न्यावें असें वाटतें, परंतु मी कोण, माझी शक्ति ती किती ! राहवत नाहीं म्हणून करायचें.

माझीं पत्रें वाचावयास इतर मुलें मागतात असें तूं लिहिलेंस. एखादे वेळेस वाटतें कीं, हीं पत्रें प्रसिध्द करावीं. मुलांना वाचायला होतील. या पत्रांवर टीकेची झोड उठेल, मला माहीत आहे. माझ्या पत्रांना उत्तरें देण्यासाठीं म्हणूनहि संघांतील कांहीं मुलें तीं पत्रें मागत असतील. परंतु आपला लपंडाव थोडाच आहे. आपला सारा खुला कारभार. जें ज्ञान मोकळेपणें चारचौघांत देण्यास भय वाटतें, तें माणुसकीस धरुन नसेल असें समजावें !

तूं तुझ्या पत्रांत इतर कांही गोष्टीविषयीं थोडक्यांत माहिती मागितली आहेस. गांधीवाद व समाजवाद यांत साम्य काय, विरोध काय असें तूं विचारलें आहेस. वसंता, मी तुला थोडक्यांत कितीसें सांगणार? परंतु तुम्हांला थोडीशी कल्पना यावी म्हणून कांही गोष्टी सांगतो. तुम्ही मोठे झालांत म्हणजे मोठीं पुस्तकें वाचा, अधिक विचार करा व काय तें ठरवा.

आज जगांत सर्वत्र विषमता भरली आहे. ती आजच आहे असे नाहीं. प्राचीन काळीहि असेल. परंतु आजच्या प्रमाणेंच ती भयंकर होती कीं काय याची शंका आहे. आज यांत्रिक उत्पादन झालें आहे. त्यामुळें थोडयाशा मजुरीवर हजारों कामगार कामाला लावतां येतात. कामगार १० रु. चे काम करतो; पण त्याला मजुरी चारसहा आणेच मिळते. ज्यांच्या ताब्यांत कारखाना असतो त्यांना असा अपरंपार फायदा मिळत असतो. परंतु कामगारांची दुर्दशाच असते. भांडवलवाला या फायद्यांतून, हातांत जमा होत जाणा-या भांडवलांतून आणखी कारखाने काढतो. जगांत माल अपरंपार निर्माण होतो. परंतु कामगारांस पगार कमी मिळत असल्यानें या मालाचा उठाव होत नाहीं. तुमचा माल विकत घेणार कोण? जगांत अन्न पुष्कळ आहे, वस्त्र पुष्कळ आहे. परंतु तें घेण्याला बहुजन समाजाजवळ पैसा नाहीं. सुकाळांत दुष्काळ आहे ! बरें कामगारांची मजुरी वाढवावी, तर माल महाग होतो. जगाच्या स्पर्धेत तो टिकत नाहीं. कामगारांची मजुरी इतकी कमी असते कीं, जगांतील सुखसोयी त्यांना घेतां येत नाहींत. पुष्कळ वेळां जगांतील भांडवलवाले मालाचा नाश करतात ! गव्हाचें पीक जाळतात !! कपाशीला आगी लावतात !! असे प्रकार भांडवलशाहीला करावे लागतात.

« PreviousChapter ListNext »