Bookstruck

पत्र बारावे 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणखी एक मुद्दा असा कीं मनुष्याची बुध्दीसुध्दां तो सहासात तास शारीरिक श्रम करील तर अधिक तेजस्वी राहील. जितकें शारीरिक काम कमी तितकी बुध्दि कमी तल्लख. थोरो म्हणत असे, अरे लेखका, जरा हातांत कुदळ घे. अंगातून घाम निघू दें. शरीरांतील मळ बाहेर पडूं दें. अंगाला ऊन लागूं दे. प्रकाश मिळूं दे. म्हणजे तुझ्या लिहिण्यांतहि प्रकाश येईल. तुझ्या लिहिण्यांतील पोटदुखी व निराशा जाईल. खोलींत बसून लिहितोस म्हणून पोटांत मुरडामारतो व लिहिण्यातहि सुतकीपणा येतो ! '' थोरोंच्या या म्हणण्यांत अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की शरीरश्रम न करणारेहि बुध्दिमान झाले. आमचें म्हणणें असे कीं त्यांनीं शरीरश्रम केले असते तर ते अधिकच सतेज बुध्दीचे झाले असते.

तसेंच तुम्ही जें म्हणतां की हुकुमशाही ही संक्रमणावस्थपुरतीच आहे. परंतु ही संक्रमाणावस्था किती काळ चालणार? आजूबाजूची सर्व दूनिया समाजवादी होईपर्यात तुम्हाला धोका राहणार ! म्हणजे सारें जग समाजवादी होईपर्यंत तुम्हाला हुकुमशाही ठेवावी लागणार !! याकाळाला कांहीं मर्यादाच नाहीं. तसेंच तुमच्या प्रयोगक्षेत्रांतील सारे लोक तुमचा प्रयोग पचवीपर्यंतहि तुमची हुकुमशाही राहणार. तेव्हां संक्रमणकाल अनंत आहे. सारें जग समाजवादी होईपर्यंत तुमचा प्रयोग वाढत जाणार. तोंपर्यंत  लढाया राहणार. कट होणार. म्हणून हुकुमशाही राहणार !

आणि मनुष्य-स्वभाव असा आहे कीं सत्तेची एकदां सवय लागली, चटक लागली कीं ती जात नाहीं. एकदां एखाद्या वर्गाला सत्ता मिळाली कीं तो ती सोडू इच्छित नाहीं. हुकुमशहा अमर्याद काळपर्यंत राहणार,सत्तेची एक परंपरा निर्माण होणार. जी कम्युनिस्ट पार्टी असेल ती सत्तेची मैत्रीण बनेल. आज रशियांत तोच प्रकार झाला आहे. या सत्तावाल्यांना हातची सत्ता   सोडणें मग जिवावर येईल. महत्वकांक्षी लोक पुढे येतील. हुकुमशाहीच्या संक्रमणावस्थेंतून असे उत्पात निर्माण होण्याचासंभव आहे. कारण तुमची संक्रमणावस्था जवळ जवळ सारें जग समाजदवादी होईपर्यंत राहणार !

तुम्ही मोठमोठी प्रशस्त शहरें निर्मूं व प्रजा कशी तरी एकत्र राहतो असें दिसणार नाही म्हणून म्हटलेंत. परंतु प्रजा एकत्र न आणण्यांत आणखीहि आमची एक दृष्टि आहे. जगांत युध्दें आहेंत, महत्वाकांक्षा आहेत, तोपर्यंत धोकाहि आहे. जगांतील सारे धोके नाहीसे झाल्यावर तुम्ही तशीं शहरे निर्मिलीत तर ठीक, परंतु सारें जक निवैर कधीं होईल तें होवों. तोंपर्यंत काय? तोपर्यंत जनता खेडयापाडयांतून पांगलेलीच राहूं दे. ही विमानें पहा. एक लंडनवर आली कीं, लाखों लोकांचे प्राण संकटांत येतात. सात लाख खेडी हिंदुस्थानांत आहेत. एक प्रकारें तें संरक्षणहि आहे. परंतु या सात लाख खेडयांची सातशें शहरें केलीं म्हणजे शत्रुच्या विमानांचे काम सोपें झालें. मरणाचा मार्ग सोपा झाला !

शिवाय आणखी किती तरी गोष्टी मनांत येतात. तुम्हांला कदाचित् त्या काव्यमय वाटतील. परंतु एका. उद्यां सारेंच यंत्रमय करावयाचें. दूध प्रयोगालयांत तयार होईल. नांगर वाफेचे असतील. कारण तुम्ही सारी शेती सामुदायिक करणार. असें झालें म्हणजे गायी-गुरांची जरूरच राहणार नाहीं. केवळ दुधांसाठी गाय ठेवायची म्हटलें तर बैलांचे काय करायचें? ते सारे मारून टाकावे लागतील. तुम्हांला त्याचें कांही नाहीं वाटणार. परंतु आम्हां भारतींयांस वाटतें. आम्ही मनुष्याचें कुटुंब मोठें केलें आहे. माणसाच्या शेजारीं घोडा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे. माणसाचा आवाज गुरें ओळखून हंबरत आहेत. घोडा पाठीवर धन्याचा हात फिरतांच फुरफुरतो आहे. यांत का आनंद नाहीं? पशूंनाहि माणसानें स्वकुटुंबांतील केलें आहे. तुम्ही दोन चित्रें चितारा. एका चित्रांत मनुष्याच्या सभोंतीं फटफटी, वाफेचा नांगर वगैरे वस्तु उभ्या करा. दुस-या चित्रांत माणसांभोवतीं गाय, घोडा, वांसरे रंगवा. कोणतें चित्र तुम्हांला आवडेल? घोटयाला थोपटलें तर तो फुरफरतो, हुंकार देतो. मनुष्याच्या प्रेमाला हे मुके पशु उत्तर देतात. त्यांना समजतें. गाव अंग चाटायला येते. परंतु त्या फटफटीवरुन हात फिरवला, त्या वाफेच्या नांगरावरुन हात फिरवला तर माझ्या प्रेमाला आहे का उत्तर? आपल्या प्रेमाला प्रत्युत्तर मिळालें तर अपार आनंद होतो. आपण मूलाचा मुका घेतों. मुल हंसते. परंतु कचकडयाच्या बाहुल्यांचा मुकाघेऊन आनंद होईल का? तेव्हां सारेंच उद्यां यांत्रिक करायचें ठरविलेंत तर गायी, बैल, घोडे सर्वांचीच हत्या करावी लागेल. तो एक निर्मळ आनंद नष्ट होईल.

« PreviousChapter ListNext »