Bookstruck

पत्र तेरावे 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सात वर्ष उद्योगधंद्यांतूनच सारे शिक्षण देऊं या. इंग्रजीविरहित आजकालच्या मॅट्रिकला जितके ज्ञान असते, तितकें उद्योगधंद्यांतून सात वर्षात देतां येईल. आणि मग ज्याला पुढे अधिक शिकावयाचे आहे, ज्याच्या ठिकाणी कल्पकता आहे; शोधकता आहे, तो दुस-या उच्च शाळांतून जाईल. संशोधनाच्या शाळा उद्योगधंदेवाल्यांनीच काढावा असे गांधीजींचे मत आहे. प्रयोगाची त्यांना जरुरी. युरोपांतील बहुतेक कारखान्यांतून प्रयोगालये असतात. तेंव्हा सरकारवर हा खर्च न लादतां व्यापा-यांनीच संशोधनाच्या उच्च संस्था चालवाव्या आणि सात वर्षे हस्तव्यवसायांतून शिकलेली तरतरीत बुध्दीची मुले तेथे जातील. अर्थात ही गांधीजींची सूचना होती.

उद्योगधंद्यांतून शिक्षण देणारे शिक्षक विशेष दृष्टिचे हवेत. ते सर्वांनाच शक्य होईल असे नाही. ती पध्दती शिकवणारी शिक्षणधामें निघाली पाहिजेत. परंतु हा नवीन प्रयोग आहे. हिमतीने करुं या, असे म्हटले पाहिजे. परंतु आमचे लोक म्हणू लागले, 'मुलांना का हमाल बनवावयाचे? ती कोवळी असतात. त्यांना शाळेत का काम करायला लावायचे?' नाना गोष्टी बोलूं लागले. अरे, काम म्हणजे वाईट वाटते? आणि मुलांच्या डोक्यावर का गोणी द्यावयाचे आहेत? मुलांना तर काम हवं असते. परंतु मुलांची मनोवृत्ती पाहतो कोण? आईबापही म्हणू लागले की, मुलगां शाळेत पाठवतो तो काम करायला नाही. काम करणे म्हणजे कमीपणा, अशी आमची भावना झाली आहे ! ज्या देशांतील श्रीकृष्णाने 'ईश्वराची कर्मरुप पूजा कर व मुक्त हो' असे सांगितले त्या देशांतील लोकांना कर्माची का किळस यावी? अरेरे ! केवढा हा अध:पात !

मुलें तर कर्मात तेंव्हाच रमतात. कर्मांत त्यांना मोक्ष वाटतो. शिक्षकानेही त्या कर्मात मुलांबरोबर रमावे. मुलांच्या भातुकजीत आईनेही भाग घेतला तर मुलांना मोठे कौतुक वाटते. मुलें पाणी घालीत आहेत, शिक्षक काढून देत आहेत. मुले खणीत आहेत, शिक्षकही खणून घामाघूम होत आहेत. गाणी म्हणत आहेत, फाळेंफुलें निर्मित आहेत. निर्मितीचा आनंद मिळत आहे. मजा आहे. सलोनमध्ये तर पुष्कळ शाळांना शेती जोडलेली आहे. मुलांचे संघ असतात. ते शेती पिकवतात. सारे सामुदायिक, संगीत काम ! ते बाजार करतात. जमाखर्च ठेवतात. सिलोनमधील या प्रयोगाने असा फायदा करुन करुन दिला की, पूर्वी मुलगा शिकला की, तो शेतीकडे वगैरे वळतच नसे. तो नोकरी धुंडू लागे. परंतु आतां मुलें शिकली तर स्वत:ची शेती करायला जातात. 'शिकणे म्हणजे मातीत हात न घालणे' असे आतां त्यांना वाटत नाही. शिकलेला व न शिकलेला यांत मी असा फरक करीन : शिकलेल्या उद्योगांत, कर्मात आदंद घेतां आला पाहिजे, जो अशिक्षितांस घेतां येत नाही.

आपल्याकडे श्रम आणि शिक्षण यांची फारकत झाली आहे. अमळनेर येथील शाळेच्या वसतीगृहांत मी रहात असे. मी पहात असे की, नवीन मुलगा शिकावयास येतांना आपली ट्रंक स्वत:च्या डोक्यावर घेऊन स्टेशनवरुन बोर्डिंगात येई. परंतु बोर्डिंगात राहून शाळेत थोडे शिकून तो सुटीत परत जाऊ लागला म्हणजे स्वत:ची ट्रंक डोक्यावरुन न्यायला त्याला लाज वाटे ! तो पांढरपेशा बने. कपडा सुरुकतेल, मळेल ! 'शिक्षण म्हणजे शरीरश्रम न करणे' असे कोष्टकच झालें. अमळनेरला डॉ. उत्तमराव पाटील आहेत. तीस साली त्यांनी इंग्रजी सहावीतून शाळा सोडली. पुढे नऊ महिने शिक्षा भोगून ते घरी गेले. ते नांगर चालवूं लागले. तर त्यांच्या गांवांतील लोक म्हणत, 'इंग्रजी शिकलास व शेवटी नांगर हातांत धरलास. मूर्ख आहेस तूं ! मग शाळेत गेलास कशाला?'

वर्धा शिक्षणपध्दतीने ही पोशाखी वृत्ती जाईल. मुलांच्या नैसर्गिक वृत्तींना वाव मिळेल. त्यांची शोधक व कल्पक बुध्दि वाढूं लागेल. तो खेडयापाडयांत घरी जाऊन उद्योग करील; त्यांत नावीन्य आणील. त्याला हस्तव्यवसाय मिळाल्यामुळे उपजीविकेचाही प्रश्न सुटेल आणि या पध्दतीने शिक्षणसंस्थाही स्वावलंबी होईल.

« PreviousChapter ListNext »