Bookstruck

पत्र तेरावे 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वसंता, मी एकदां एक मनुष्य पाहिला होता. तो सुपारी दोन बोटांनी धरी व तिचा चुरा करी ! अंगठा व मधले बोंट या दोन बोटांच्या अग्रभागी सारी शरीरांतील शक्ति तो जणू एकवटी आणि ती शक्ति या सुपारीवर सोडी. सुपारीचा चुरा होई ! तसेच बुध्दिचे आहे. ज्याला बुध्दि एकाग्र  करण्याची सवय झाली तो कोणत्याही विषयांत प्रगती करू शकेल. भारतीय शिक्षण शास्त्राने हा महत्वाचा सिंध्दांत जगाला दिला आहे.

हिंदुस्थानातील बहुजन समाज लहानपणापासूनच बापाचा धंदा शिकत असे. जीविकेचा धंदा लहानपणापासूनच सुरू होई. कुंभाराचा मुलगा मडकें करू लागे. सुताराचा रांधू लागे. लोहाराचा भाता फुंकू लागे. आपापल्या पिढीजात धंद्याचे ज्ञान त्यांना घरींच जणूं मिळे. किंवा त्या त्या धंद्यातील अधिक कसबी माणसाकडे काही दिवस उमेदवारी करीत. मनांचे व बुध्दिचे सांस्कृतिक     ज्ञान श्रवणाने मिळे. कथा, किर्तने, पुराणें यातून मिळे. जग हीच जणुं आमची शाळा होती !

ब्रिटिश राजवट आली. आणि मुख्य फरक हा झाला की येथील धंदेच बुडाले. लोक बेकार होऊ लागले. ब्रिटिशांनी नवीन शिक्षण सुरू केले. प्रथम हें शिक्षण त्या त्या प्रांताच्या प्रांतिक भाषांतून सुरू झाले. निरनिराळया विषयांवर भाषांतरे होऊं लागली. पर्रतु मेकॉले साहेबांनी आपली भारतीय शिक्षणावरची पत्रिका प्रसिध्द केली आणि इंग्रजीतून शिक्षण सुरू झालें !

परभाषेंतून शिक्षण देण्याचा प्रयोग दुनियेंत कोठे झाला नसेल ! शिक्षणाचे माध्यम मातृभाषा हेंच असणें साहजिकच आहे. परंतु पारतंत्र्यांत सारेंच अस्वाभाविक असते. देशाची लेंकरे अन्नास मोताद होतात व परकीयांची चैन चालते ! इंग्रजांना देशाचा कारभार चालविण्यास गावठीसाहेब हवे होते. त्यांना इंग्रजी लिहीणारे, बोलणारे कारकून हवे होते. प्रथम इंग्रजी शाळेंत मुलांनी यावे म्हणून खाऊ वाटले जात, बक्षिसें दिली जात, पैसे दिले जात. मुलांनी फी देण्याऐवजी  शाळेतूनच घरी पैसे न्यावे ! परंतु पुढें सारे तंत्र बदलले. लाखो लोक शिकू लागले आणि शिकून कर्मक्षेत्र तर दिसेना.

शिक्षण सरकारच्या हाती होते. लोकांना वाटले की आपल्या हातांत शिक्षण घ्यावें मिशनरी लोकांच्या संस्था देशभर होत्याच. आपले लोकही शिक्षण संस्था काढूं लागले. महाराष्ट्रांत प्रथम थोर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शिक्षण कार्यास वाहून  घेतलें. त्यांना आगरकर, टिळक अशी अद्वितीय माणसें मिळाली. न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झाले. फर्ग्युसन कॉलेज झालें. प्रथम सरकारी ग्रँट घ्यायची  नाहीं असे धोरण होते म्हणतात. परंतु पुढे ग्रँट घेऊ लागले. लोकमान्य संस्था सोडून गेले ! सरकारी शाळा-कॉलेजातून शिक्षण मिळे तेंच येथेंहि मिळे. येथे फी थोडी कमी, शिक्षक कमी पगारावर रहात. अन्यत्र मोठया नोक-या मिळत नसूनही त्यागपूर्वक या संस्थांतून कामें करीत.

« PreviousChapter ListNext »