Bookstruck

पत्र चवदावे 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मागें मुंबईला कामगारांची प्रचंड सभा झाली होती. कांही प्रसिध्द साहित्यिक ती सभा पाहायला आले. एक दिवस तरी लेखणीचें ललित परब्रम्ह गरीबाच्या भेटीस आलें ! परंतु तेवढयानें काय कळणार? गरिबांत जा, त्यांच्यांत मिसळा, त्यांची सुख:दुखें रोज पहा. मग तुमची लेखणी निराळें लिहील. त्या लिहिण्यांत प्रचंड शक्ति येईल. परंतु तोंपर्यंत तुमची लिखाणें चार पांढरपेशे तरुन व तरुणी वाचतील. महाराष्ट्र म्हणजे का चार गुलजार तरुण? महाराष्ट्र तर हजारों खेडयांत मरत पडला आहे. त्याला उपासमारीचा क्षयरोग जडला आहे.

धुळयाच्या तुरुंगांत ३०-३२ सालीं काहीं कांदब-या आमच्या खानदेशी सत्याग्रहींनी वाचल्या. लोढूभाऊ नांवाचे एक थोर खानदेशी प्रचारक म्हणाले, '' या कादंब-यांतून आमचें कोठेंच कांहीं नाहीं! '' त्या थोर प्रचारकाचे ते शब्द मला नेहमी आठवतात. खरा जो महाराष्ट्र त्याच्या संसाराचें कोठेंच कांही चित्रण नाहीं.

आमचे कलावान् म्हणतील, ''शेतक-याच्या, कामक-याच्या जीवनांत काय नवीन आहे? त्यांच्या जीवनांत रंगवण्यासारखें काय आहे?''

मी विचारीत,'' तुम्हां प्रतिष्ठितांच्या जीवनांत तरी काय नवीन आहे? तें टेनिस, तेंच ब्रिज, त्याच नटया, तेच बोलपट, तीच बाजाची पेटी, तेंच ' वळखलं ग ' काय आहे नावीन्य? उलट शेतक-याच्या जीवनांतच किती विविधता आहे ती पहा. आज पावसांत तो भिजला. आज कापणी आहे. आज लावणी आहे. उद्यां कोळपणी आहे, परवां निंदणी.आज थंडीनें त्याचा केळयांचा मळा करपला. दुस-या दिवशी गारा पडून आंब्याचा मोहोर झडला. आज पुरांतून त्याला आपली गायीगुरें आणावीं लागली. परवां त्याला रानांत एकदम वाघ भेटला. आज धान्याला भाव नाही म्हणून तो संचित आहे. उद्यां सणाला घरीं काय करायचें म्हणून मुलें निजल्यावर तो बायकोशीं बोलत आहे. सावकाराची जप्ती येणार म्हणून तो कधीं रडतो. कधी तो नवीन झाडा लावतो. बैलांना थोपटतो. नवीन माल विकत घेतो. किती प्रसंग ! तसेच शहरांतील कामगारांच्याहि जीवनांत. परंतु ज्याला डोळे आहेत व कान आहेत त्यालाच श्रमणा-यांची हीं करुणगंभीर जीवनें समजणार. इतरांना  काय?

अरे महाराष्ट्रांतील कलावंतांनो ! तुम्ही महाराष्ट्रांतील खेडोपाडी हिंडा. ते कलाहीन संसार बघा. ती खोल गेलेली पोटें बघा. खोल गेलेले डोळे बघा. आणि ही दुर्दशा दूर करण्यासाठीं लेखणी उचला. तुमच्या लेखणीचें ललित गरिबांचे सुंदर करण्यासाठी असूं दे.
वसंता, प्रतिभा व प्रज्ञा या दोन्हीं वस्तु क्वचितच एकत्र दिसतात. मी प्रतिभावान असेन, सहृदय असेन पण प्रज्ञावान असेनच असें नाहीं. प्रज्ञावान मनुष्य समाजाला ध्येयें देत असतो. समाजानें आजच्या क्षणी कसें वागावें, काय करावें तें तो सांगतो. व्यास, वाल्मीकि, रवीन्द्रनाथ हे    प्रज्ञावान होते व प्रतिभावानहि होते. त्यांनीं समाजाचीं ध्येयें निर्मिली व ती प्रतिभेने रंगवून घरोघर नेलीं. साहित्य संसाराय सुंदरता देते. आज हिंदु कुटुंबांत जें समाधान आहे तें रामायणानें दिलें आहे. आमच्यांत जी अहिंसा कृति आह ती साधुसंतांच्या वाड्मयानें बायकांच्या संपत शनिवारच्या किंवा नागपंचमीच्या कहाण्यानीं निर्माण केली आहे. भारतीय समाजांत आज जी मंगलता आहे, ती पूर्वीच्या वाड्मयानें निर्मिली. आजच्या वाड्मयानें उद्यांचे संसार मंगल होतील असे करावे.

« PreviousChapter ListNext »