Bookstruck

पत्र दुसरे 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु कांही आशाळभुतांना काँग्रेसचें हें असें करणें म्हणजे आड रानांत जाणें, वनवासांत जाणें वाटतें. त्यांना हा काळ फुकट गेला असें वाटते. १९२० ते ३५ सालापर्यंतचा काळ का फुकट गेला? हा काळ फुकट नाहीं गेला. सार्थकीं लागला. राष्ट्र-संवर्धनाचा हा काळ होता. या काळांत नवें राष्ट्र तयार झालें. शहरें व खेडी एकजीव झाली. पूर्वी धडाला मुंडके नव्हतें, मुंडक्याला धड नव्हतें ! परंतु महात्माजींनीं धडामुंडक्यांची भेट घातली आणि राष्ट्र सजीव होऊन उभे राहिलें. आपल्या महाराष्ट्रांतले ब्राम्हणब्राम्हणेतर वाद कमी झाले. सत्यशोधकी गांवे सत्याग्रहांत आली. ३०-३२ सालच्या चळवळीत हे वाद मेले. बहुजन समाज चळवळींत आला. काँग्रेस आपली, असें त्याला वाटूं लागलें. तुरुंगात एके ठिकाणी कामें करूं लागले. एकाच चक्कीला, एकाच मोटेला ब्राम्हण, मराठा, न्हावी, धोबी यांचे हात लागले. तें एकमेकांस म्हणाले, '' आपण उगीच अलग राहून भांडत होतों. परंतु आतां सेवेसाठी एकत्र आलों. ''

इंग्लंडमधील प्रतिगामी मुत्सदी सॅम्युअल होअर लिहितो, ''गांधींशीं माझे मतभेद आहेत. परंतु एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे. गांधींनीं हिंदुस्थानचा दर्जा वाढविला. गांधींच्या चळवळी होण्यापूर्वी हिंदुस्थानाकडें तुच्छतेनें आम्ही पहात असूं. परंतु आतां आदराने बघतो. ''

वसंता, ज्या काळांत अशी गोष्ट घडली, ज्या काळांत राज्यकर्त्यांच्या अहंकारी दृष्टीतहि हा असा फरक पडला, तो काळ का वाया गेला? आणि होअर साहेबांसारख्यांस हिंदुस्थानविषयी हा आदर कां वाटूं लागला? कारण अन्यायाविरुध्द सारें राष्ट्र झगडण्यासाठीं उभें राहिलें. नि:शस्त्र राष्ट्रहि उठावलें. नसलें शस्त्र म्हणून का अन्याय मुकाटयाने सहन करायचे? आणि शस्त्रास्त्रें झालीं तरी कांही लोकच तीं वापरुं शकतात. परंतु गांधीजींच्या अहिंसक लढयांत सर्वांची गति होती. रामनाम ज्याप्रमाणें कोणीहि उच्चारावें, तसा हा गांधीजींचा मार्ग होता. स्त्रिया, पुरुष, मुलें सारीं या चळवळींत सामील झाली. सर्वांचा आत्मा जागा झाला.

दुस्थानांतील लोकांस कोणी बक-या म्हणे, कोणी उंदीर म्हणे. परंतु या देशांत माणसें राहतात, ही गोष्ट महात्माजींनीं जगाला दाखविली. अन्यायाविरुध्द जो झगडत नाहीं तो का माणूस? गांधीजींनीं अन्यायाविरुध्द झगडायला शिकविले. दुस-यास मारुं नका, परंतु अन्यायहि सहन करुं नका असें शिकवून इतर राष्ट्रांतील मारमुटया माणसांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रकारची माणसें या देशांत आहेत असें गांधीजींनीं जगाला दाखविलें.

गांधीजींची चळवळ आली व चुलीजवळ बसणा-या आया-बहिणीहि कायदेभंग करुं लागल्या. स्त्रिया लाठींमार खाऊं लागल्या. मुंबईच्या आझाद मैदानावर घोडयांच्या टापांखाली त्या चिरडल्या जाऊं लागल्या. मुंबईच्या रस्त्यावरुन समुद्राचे बेकायदा पाणी स्वातंत्र्याचीं गाणीं गात आणूं लागल्या. मीठ करुं लागल्या. परदेशी मालावर, दारुगुत्यांवर त्या निरोधने करुं लागल्या. कर्मवीर कर्वे एकदां म्हणाले, ''स्त्रियांची ती जागृत झालेली शक्ति पाहून माझ्या डोळयांचे पारणें फिटले ! '' ज्या महर्षीनें सारें आयुष्य स्त्रियांच्या उध्दारार्थ दिलें त्यालाहि महात्माजींच्या चळवळीतींल ती दिव्यता दिसली. ''सत्याग्रही शिबिरांत एक स्वयं-सेवक व्हावें असें मला वाटलें. '' असें ते म्हणाले. परंतु आमच्यातील अहंकारग्रस्तांना वाटलें की हा सारा काळ फुकट जात आहे ! त्यांच्या बुरसलेल्या बुध्दीला वाटलें कीं १९२० ते ३५ पर्यंतचा काळ वांझ गेला !

« PreviousChapter ListNext »