Bookstruck

समाजधर्म 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या मनाला पुढील प्रश्न विचारावा "माझ्या गावाहून हया शहरात शूद्र लोक कोठे राहतात? ''हया प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल, आपणाला त्याची माहिती नसेल; सर्वाची बाजूला राहू दया, अशा एकाही इसमाची माहिती नसेल, त्याचा ठावठिकाणा माहित नसेल, तर ऐक्याचे ध्येय, बधुत्वाचे ध्येय आचरण्यात आणण्याचे बाबतीतील केवढी उदासीनता, किती निष्काळजीपणा, केवढी गाफिलगिरी!माझ्या गावच्या माणसाची मी चौकशी केली नाही? त्यांना मदत करणे
मला शक्य होईल का? मला ज्या सवलती, जी सुखे मिळत आहेत, त्यात त्यांना भागीदार करता येईल का असा विचार नको का प्रत्येकाने करावयाला? या गोष्टीचा आपण अनुभव घेतला पाहिजे. करून पाहिले पाहिजे. आपल्या बांधवासाठी कितीतरी गोष्टी आपणास करता येतील! आपणास लाभणार्‍या गोष्टी, मिळणार्‍या नाना संधी हयांचा त्यांनाही उपयोग देता येईल. पण इच्छा हवी तळमळ हवी. पोटतिडक हवी! उगीच शक्याशक्यतेच्या शंका नका काढू. करून पहावयास लागा म्हणजे काय ते दिसून येईल.

बारा धडे शिकविणे-महिन्यातून एक तास देणे; ते ओझे आहे? परंतु शिकणार्‍यांना केवढी मदत! हे बारा धडे कसलेही असले तरी चालतील. तुम्हाला येत असेल तेच तुम्ही द्या एखाद्याला व्यायामाचे प्रकारच माहीत असतील, तर त्याने तेच शिकवावे. लिहिणे , वाचणे, संख्या मांडणे यागोष्टी शिकविल्या तर बरे. परंतु सर्वात उत्कृष्ट गोष्ट म्हणजे इतिहास व  भूगोल या विषयावर गोष्टी सांगा; या विषयासंबंधीच्या गप्पा मारा; तसेच रोजच्या जीवनातील शास्त्रीय गोष्टी, साधी परंतु रोज उपयोगाची अशी शास्त्रीय सत्ये त्यांना सांगा; किंवा आजूबाजूच्या सृष्टीचे नीट निरीक्षण करावयास त्यांना शिकवा. जे साधेल ते करवायास चला, जे देता येईल ते द्यावयास चला. विचारांची थोडीशी पुंजी जवळ असेल तर जीवनाला कळा चढते. विचाराने जीवनाला निराळाचा रंग येतो. एखादाच किरण परंतु काळया मेघाला तो किती रमणीय करतो! एखादाच पेरलेला विचार; तो कसा रूजेल, कसा वाढेल, कोणाला केव्हा आशा येईल, धीर सुख देईल, जीवनाला कसे गंभीर करील हयाची कल्पना तुम्ही कधी केली आहे का? खरोखर ज्ञान हीच जीवनाची खरी भाकर आहे. हया भाकरीशिवाय जीवनात राम नाही, जीवनाला अर्थ नाही, जीवनाला कळा नाही, जीवनाला तेज नाही. जीवनाला अर्थ नाही. जीवनाला गोडी नाही. सौंदर्य नाही! ''न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। ''ज्ञानासारखे पवित्र व जीवनदायी अन्य काही नाही. म्हणून स्वत:पाशी जे जे काही उत्कृष्ट असेल ते ते घेऊन  आपल्या आजूबाजूच्या बंधूंना देण्यासाठी त्वरा करा, धावून जा.

« PreviousChapter ListNext »