Bookstruck

समाजधर्म 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१४ आपल्या समोर उभे असलेले काम

ज्या वेळेस जुने जाऊन नवीन यावयाचे असते, शतकानुशतके पूज्य भावाने हृदयाशी धरलेले विचार सोडून देऊन नवीन अनुभवी अशी विचारपध्दती उचलावयाची असते, अशा संक्रमणावस्थेत, अशा प्रचंड घडामोडीच्या काळात सर्वच वस्तू जणू भट्टीत घातलेल्या असतात अशा या बदलत्या परिस्थितीत एक; दोन पिढ्या बुध्दीचा जर घोटाळा झालेला दिसला, गोंधळ उडालेला दिसला, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. असे होणारच व कोणाचेही होईल; मग हिंदुस्थानचे तसे झाले म्हणून काय मोठेसे बिघडले? भारताची बुध्दी जरा स्तिमीत झाली, थोडा वेळ घुटमळली, गोंधळली, यात आश्चर्य नसून उलट इतक्या जलदीने नवीन नवीन विचारसरणीशी त्याने जमवून घेण्यास त्याला फारसे प्रयास पडले नाहीत ही गोष्ट मात्र आश्चर्य करण्यासारखी आहे. पन्नास वर्षाच्या अवधीत अत्यंत परकी अशी भाषा पूर्णपणे आपलीशी करून घेऊन स्वत:च्या ध्येयसोपानातील प्रत्येक पायरीपायरीत काहींना काही फरक घडवुन आणण्याचे ज्याने कार्य केले, त्याची शक्ती आश्चर्यकारक नाही का? सर्व संसारातून, सर्व कर्मातून आत्मा काढुन घेणे हीच जीवनातील अत्यंत थोर व श्रेष्ठ वस्तू म्हणून जेथे सारखे कथा; पुराणातून उपदेशिले जात होते, तेथील लोकांची सर्व शक्ती एका क्षणात कर्मात आणून सोडणे, सहकार्यात आणून सोडणे, सेवेत रंगविणे ही गोष्ट कठीण होती. या गोष्टी चुटकीसारशी कशा होणार? तरीही असे दिसुन आले की, हिंदुस्थान मेलेला नाही. तो जिवंत आहे. त्याच्या अंगात खूप सामर्थ्य आहे. आज जरी भारतीय लोक निराश दिसले, उपासमारीने त्रस्त झाल्यासारखे दिसले, परिस्थितीने खचल्यासारखे वाटले, तरी नवयुगाला आरंभ करण्यासाठी ते उठण्यासाठी सिध्द होत आहेत, अमावस्या पुरी झाली असून बिजेचा चंद्र लौकरच दिसणार आहे. आहोटी संपली असून लौकरच भरतीला सुरूवात होणार आहे; ग्रहण पुरे लागून झालं. आता मोक्षपर्वास सुरूवात होणार. दैवाची अद्भूत लीली सुरू होणार आहे, महान घटनेला आरंभ होणार आहे. कारण आज विसाव्या शतकाच्या आरंभी भारतवासी आपल्या सर्व गत इतिहासाचं एकदा नीट सिंहावलोकन  करण्यास उभे आहेत. आपण आज कोठे उभे आहोत;कोठे जावयाचे आहे ते नीट पाहून घेत आहोत.

अद्याप संक्रमणावस्था संपली नाही. कार्याचे स्वरूप अजून सारे स्पष्टपणे डोळयासमोर उभे राहिले नाही. काही आराखडे, काही ठोकळ नकाशे तयार होत आहेत. निराशेची व भयाची पहिली स्थिती आज निघून गेली आहे. हिंदी राष्ट्र आता आंधळ्याप्रमाणे दरीत पडणार नाही हे नि:संशय हिंदी राष्ट्रात नवशक्तीचा संचार होत आहे, भूत व वर्तमानकाळाचे नीट निरीक्षणपरीक्षण होत आहे आणि भविष्यकाळासंबंधीचे धोरण व साधने निश्चत केली जात आहेत.

अर्वाचीन काळातील नेत्यांच्या समोर यंत्राचे ध्येय चमकू लागले. त्यांच्या भरभराटीला व विकासाला यंत्र उपयुक्त झाल्यामुळे यंत्र म्हणजे परब्रम्ह असे त्यांना वाटू लागले. यंत्रोपासना सुरु झाली. यंत्रोपनिषद गायिले गेले. कोणत्या राष्ट्राची यंत्रशक्ती किती आहे, यंत्रदेवतेची किती देवळेरावले तेथे बांधली जात आहेत. यावरुन त्या त्या राष्ट्राची तयारी, त्या त्या राष्ट्राची संस्कृती व सामर्थ्य ही अजमवण्यात येऊ लागली. एखादा मोठा कारखाना, त्यातील ती प्रचंड यंत्रे, तेथील ते हजारो मुग्यांसारखे काम करणारे मजूर या सर्वानी मिळून एकमोठे मानवी यंत्र सुरु होत असते. जसा देव तसा भक्त. यंत्राच्या उपासनेमुळे माणूसही यंत्र बनू लागला. ज्याचे करावे चिंतन तसे होते मन. यंत्रचिंतनाने मनही यांत्रित बनू लागले. आपले दुसर्‍याशी संबंध यावयाचे तेही औपचारिक, भावनाशून्य, स्वार्थापुरते व कामापुरते यांत्रिक होऊ लागले. पौर्वात्य लोक आपल्या गडीमाणसांना नोकराचाकरांना यंत्र समजत नाहीत. त्यांच्या परस्परसंबंधात हृदयाचे भाव असतात. धनी गड्याच्या सुख; दु:खाची चौकशी करील. गडीमाणसे, नोकरचाकर पुष्कळ वेळा कुटुंबातल्यासारखेच होतात. परंतु पाश्चिमात्त्य मनुष्य मजुरांना यंत्रच समजतो. बोलती; चालती यंत्रे ना यंत्राला जणू भावना, ना मन, ना मान, ना आवड, ना विचार. पौर्वात्य व पाश्चिमात्य दृष्टीत हा अजून फेर आहे. याचे कारण पौर्वात्य मनूष्य अजून पुरा पुरा शेतकरी गडी आहे.  पेरणी, निंदणी, कापणी, मळणी यांच्याच गोंधळात अजून तो आहे.  त्याचे शेत व त्याचे बैल, त्याचा मळा व त्याची मोट त्याचे खळं व त्याचे  कोठार हीच अजून त्याची सुंदर सृष्टी आहे. हेच अजून त्याचे साधं जग आहे. यात त्याला अजून त्रास वाटत नाही. कंटाळा येत नाही. अजूनही  त्याचा हा खेडवळ साधा आनंद त्याच्याजवळ आहे. याच्या उलट माझे यंत्र नीट आहे की नाही व मीही यंत्रासारखा व्यवस्थित, टापटिपीचा, झटपट काम करणारा झालो आहे की नाही, अत्यंत थोड्या खर्चाने अवाढव्य फायदा मला मिळवता येईल किंवा अशी पाश्चिमात्तयांची वृत्ती बनली आहे.

« PreviousChapter ListNext »