Bookstruck

समाजधर्म 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नीतीमध्ये अशाच रीतीने विकास होत गेलेला आहे. प्रथम सहानुभूती शिकवायची, प्रथम हृदय दुसर्‍याच्या सुखदु:खाशी न्यावयाचे व मग बुध्दीही तेथे न्यावयाची. हृदय व बुध्दी दुसर्‍याच्या सुखदु:खाशी पूर्ण एक आल्यावर एकदम एक दिव्य स्फूर्ती येते व त्या स्फूर्तीतून नवीन नीती निर्माण होते, नवीन संस्था प्रगट होते. या नवीन नीतीच्या योगे एक नवीन पायरी चढविली जाते. परमेश्ववराकडे, पूर्ततेकडे जाण्यासाठी जो जिना तयार केला जात आहे, त्याच्या पायर्‍या अशा रितीनेच घडविल्या जात आहेत व जिना वरवर नेला जात आहे. महापुरुष येतात व नवीन नवीन पायर्‍या बसवितात. गगनासारखी बुध्दी व सागरासारखे हृदय हे महापुरुष घेऊन येत असतात व मानवजात थोडी वर चढवितात. याचा भावार्थ असा की, नवीन सामाजिक घटना, प्रगतीची नवीन दिशा, समाजाची नवीन वाढ ह्यांचा जन्म नवीन सहानुभूतीत होत असतो, नवीन उत्कृष्ट भावनांच्या सहानुभूतीतून होत असतो, ही विशाल सहानुभूती; हे अपार प्रेम, ही जळती पेटती भावना नवीन ध्येयबाळाला जन्म देतात; आणि या नवीन ध्येयाला व्यवहारात आणण्यासाठी नवीन संस्था उत्पन्न होतात व सुधारणा पुढे जाते, पाऊलपुढे पडते. केवळ एका चालीऐवजी दुसरी चाल सुरू केल्याने समाजाचे दु:ख दूर होत नाही वडाची साल पिंपळाला बांधून कार्य होत नसते, प्रश्न सुटत नसतात. विशाल हृदयाची व थोर बुध्दीची तेथे जरुरी असते. नवीन ध्येये व नवीन संस्था निर्माण व्हाव्या लागतात.

स्त्रियांच्या शिक्षणाची अनेक वेळा आपल्याकडे भवती न भवती होत असते. या बाबतीतही वर प्रकट केलेले विचारच मनात येतात. भारतीय नारीवर्गाने जेवढे करता येण्यासारखे होते तेवढे या बाबतीत केले आहे. चाळीस वर्षापूर्वी भारतातील स्त्रियांना देशी भाषेत लिहितावाचताही येत नसे परंतु भारतवर्षात जणू अंत:स्फूर्तीने या प्रश्नाला चालना मिळाली. स्त्रियांचे शिक्षण सुरू झाले. या शिक्षणप्रसाराचे कामी साधी व सुंदर पुस्तके आणि मासिके निघू लागली. स्त्रिया स्वत:च स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढे येऊ लागल्या व संस्था चालवू लागल्या. बाहेरच्या हितचिंतकांनीही मदत दिली.

आज स्त्रियांनी हे प्राथमिक शिक्षण आपलेसे करून टाकले आहे असे म्हटले तरी चालेल. बंगाल, महाराष्ट्र, मद्रास पंजाब सगळ्या प्रांतांत मुलींना आपण होऊनच वाटते की नुसते वाचावयास नाही तर स्वत:च्या भाषेत लिहिताही नीट आले पाहिजे. घरातल्या घरात लिहिणे वाचणे आता होऊन जाते. घरेच जणू पाठशाळा होत आहेत, बहिणी भावजवळ शिकत आहेत. बंगालमध्ये जुन्या पध्दतीच्या बायकाही रमेशचंद्र, बंकिमचंद्र यांच्या कादंबर्‍या वाचू लागल्या आहेत. बंगालमध्ये स्त्रियांसाठी सचित्र मासिकेही भरपूर निघाली आहेत व इतर प्रांतातूनही निघत आहेत.

प्राथमिक शिक्षण सुरू झाले. आता आज पुढचे पाऊल टाकावयाचे आहे. स्त्रियांच्या शिक्षणोन्नतीच्या बाबतीत आता आणखी पुढे जावयाचे आहे. गंभीर प्रश्न आज उभा राहिला आहे. येथे हृदयसंशोधन केले पाहिजे. विचारमंथन झाले पाहिजे. सामाजिक जीवनातील शिक्षण हे अत्यंत पवित्र, अत्यंत नीतीमय व धर्ममय, परम थोर असे अंग आहे. या शिक्षणाची कशी तरी वासलात लावून चालणार नाही. या प्रश्नांची हयगय व उपेक्षा होता कामा नये. शिक्षणाला जर योग्य दिशा व योग्य वळण न लाभेल तर अपाय व हानी होण्याचा संभव आहे. शिक्षणाच्या हेतूवरूनच प्रयोजनावरूनच शिक्षण कसे असावे याची दिशा कळले. कशासाठी शिक्षण द्यावयाचे हे ठरले पाहिजे. कसे द्यावयाचे हे पाहता येईल.

आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना शिक्षण मिळावे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे हेतू कोणता असतो? किंप्रयोजनम्, किमुद्दिष्टम्? अस्तास जाऊ पहाणार्‍या, मागील शतकातील युरोपातील स्त्रीशिक्षणात असणार्‍या ज्या गोष्टी, जे हेतू, तेच आज आपले आहेत का? या शिक्षणाच्या अलंकाराने लग्नासाठी का त्यांना नटवून ठेवावयाचे आहे? विवाहाचा जो बाजार भरतो त्या बाजारात अधिक किंमत यावी म्हणून का त्यांना शिकवावयाचे? त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून का त्यांना शिकवावयाचे? असले तात्पुरते लग्नहेतू शिक्षण देऊन, भाव पाडण्यापुरते शिक्षण देऊन, त्याचा जीवनावर काय परिणाम होणार? 'अग, शीक थोडे लिहा-वाचायला. नवरा हवा ना चांगला मिळायला?' हेच शब्द जेथे मुलींच्या कानावर पडतात, त्या शिक्षणाची गंभीरता त्यांना काय वाटणार! जीवनातील कठीण प्रसंगी, आणीबाणीच्या वेळेस हे बाजारभावाचे शिक्षण काय धीर देणार? काय स्फूर्ती देणार? असले शिक्षण देणे म्हणजे मुलीवर मेहेरबानी करणे आहे, ही कीव आहे, ही भीक घालणे आहे या देण्यात मोकळेपणा नाही, स्वातंत्र्य नाही. असले हे मिंधे मेहेरबानीचे शिक्षण न मिळाले तरी बरे. काही तरुण म्हणतील, 'ज्यांच्याजवळ पुढे आम्हाला लग्ने लावावयाची आहेत, त्यांना जर नीट शिक्षण असेल तर आमचे बरेच काम त्या करतील. त्या हिशेब ठेवतील, धोब्याला किती कपडे दिले ते मांडून ठेवतील, मूल आजारी पडले तर टेंपरेचर घेतील. अशी सुशिक्षित पत्नी मिळणे हे सोईचे आहे आणि म्हणून त्यांना शिक्षण दिले पाहिजे. '

« PreviousChapter ListNext »