Bookstruck

जुळे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ऋचा पोलिस स्टेशन मध्ये एकटीच आली होती. तिला एकटीला बघून तावडे तिच्याजवळ गेल्या.

“काय गं, आई आली नाही का तुझ्या सोबतीला...??” तावडेंनी जरा शंकेनेच विचारलं.

“नाही. हल्ली आत्या नाही म्हणून सगळं तिलाच करायला लागतं. वेळ नसतो. काम असतं तिला ऑफिसमध्ये. माझी मी आलेय ना....??? आई कशाला हवी.. तिने निरोप दिलेला काल म्हणूनच आले. असाही ती इथे आली तर तिचा एक दिवस खाडा होईल आणि पगार कट होईल. तिला पेड सुट्टी मिळत नाही.” ऋचा आपल्या मोबाईल मध्ये टायपिंग करत डोकं वर न काढताच म्हणाली.  

“बस इथेच सगळे साहेब लोकं आले कि बोलवते तुला...!” तावडे म्हणाल्या.

“मी दादाला भेटू का तोपर्यंत ??” ऋचाने तावडेंना विचारलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली.

ऋचा ऋषिकेशच्या तुरुंगाजवळ गेली.

“ओ ताई, तुरुंगाजवळ जाऊ नका.” तिथे असलेला हवालदार खेकसला.

“मला माझ्या भावाला भेटायचंय. मला इन्स्पेक्टर कदमांनी बोलावलं आहे.” ऋचा म्हणाली.

“अच्छा, ते आत्याला मारल्यानी त्याची भईन काय तुमी...? भेटा.. सोडतो त्याला.. इथे बाकड्यावरच बसा.”  हवालदार म्हणाला.

ऋषिकेश बाहेर आला. दोघं बाकावर बसले होते. त्यांच्या समोर हवालदार बसला होता. त्याच त्यांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष होतं. त्याला ऐकू जाणार नाही अश्या आवाजात ऋचा बोलू लागली. एखाद तास झाला असेल. अजून कदम आणि टीम पोलिस स्टेशनात आली नव्हती. त्यामुळे आज त्यांना बराच वेळ एकत्र मिळाला. त्यांनी आज खुप गप्पा मारल्या. शेवटी तावडे ऋचाला बोलवायला आल्या.

“मी कंटाळलोय ऋचा. लहानपणापासून हेच चालू आहे. मला आता बाहेर यायचंच नाही. विचारांना कृतीची जोड असणं फारच घातक आहे. विचार नकोत आणि कृती तर त्याहून नको.” ऋषिकेश ठामपणे पण हताश होऊन म्हणाला.

ऋचा तिथून उठली आणि तावडेंबरोबर निघून गेली. तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ऋषीच्या डोक्यात विचार आला.

“आज ऋचा नक्की काय सांगेल? लहानपणीचं सगळं खरं सांगेल कि यावेळीही तिच्याकडे कारण असेल. तिने पाहिल्यावेळेस जे केलेलं त्याच प्रायश्चित्त मी भोगलंय पाच वर्ष...!! तरीही ती या प्रकरण निर्दोष सुटू नये असच मला वाटतं.....!!”

ऋषी त्याच्या तुरुंगात जाऊन बसला. त्याने अंथरूण टाकले. तो पहुडला, डोळे मिटले आणि तो झोपला... हवालदाराने पहिले.आज इतक्या दिवसांनी ऋषी बऱ्यापैकी शांत दिसत होता... त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होते...

« PreviousChapter ListNext »