Bookstruck

इस्लामी संस्कृति 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सृष्टिवर्णन आहे, तद्वत् लोकांचे जीवनहि आहे. धनगरांची शांत, स्वस्थ जीवनें वीरांची रोमहर्षक कृत्यें युध्दें, लुटालुटी, पाठलाग, सूड, मैत्री, प्रेम, प्रतिस्पर्धी जातिजमातींवरचीं विडंबनात्मक काव्यें, स्वजातीयांची महिग्नस्तोत्रें, मृतांविषयींचीं शोकगीतें, असें हे प्राचीन अरब काव्य आहे. वस्तुस्थितिनिदर्शक, अकृत्रिम आहे.बालसद्दष वृत्तीच्या लोकांचे हें काव्य आहे. ज्यांच्या डोक्यांत जीवनाचीं गूढें अद्याप शिरलीं नाहींत वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ नाहीं ! अरब भूत व वर्तमान काळांत जगे, रमे. भविष्याची दिलगिरी त्याला नसे. या आत्तांच्या क्षणाला तो उत्कटतेंने पकडतो, पूर्णतया पकडतो. त्या क्षणाच्या पलीकडे पाहण्याचें त्याला भान नसें. उद्यां नशिबीं काय असेल, याची त्याला काळजी नसे. भविष्याच्या चिंता वा सुंदर स्वप्नें तो मनांत खेळवीत बसत नाहीं. तो भूतकाळात बघतो. वर्तमान काळांतील मौज भोगतो. संवेदना, भावना, कल्पना यांत तो श्रीमंत होता, चिंतन व विचार यांत गरीब होता. जीवनाचा फेसाळ पेला तो भरकन् पिई व रिता करी. त्याच्या भावना खोल व उत्कट असत. परंतु भूतकाळाकडे पाहून अज्ञात भविष्याकडे नजर फेकणा-या विचारप्रधान युगाची त्याला अद्याप ताद्दश कल्पना नव्हती. हे अरब काव्य जीवनापलीकडे उड्डाण करीत नाही. अर्थगंभीर नाहीं. परंतु तें तेजस्वी, जोरदार आहे. ते सजीव आहे, उदात्त आहे. खरें व उत्कट आहे. स्वच्छंद व भरपूर आहे.

अकडा येथें सर्वात मोठी यात्रा भरे. पवित्र मोहरम महिन्यांत ही यात्रा भरते. या वेळेस देवाचा तह असे. त्या महिन्यांत रक्तपात करायचा नाहीं, सूड घ्यायचा नाहीं. त महिन्यांत भांडणे विसरायचीं. सर्वांनी त्या यात्रेंत जमायचें तेथें सा-या जातिजमाती जमत. निरनिराळें कवि तेथें पोवाडे म्हणत, काव्यें गाऊन दाखवित. ती काव्यें शत्रूवर टीका करणारींहि असत. परंतु बुरखे घेऊन बसत. एकमेकांस पाहून ती काव्यें ऐकतां स्फुरण चढायचे एखादें वेळी म्हणून बुरखे घेत ते प्रतिस्पर्धी. तरीहि कधीं प्रकरणें हातघाईवर येत. परंतु असें फार क्वचित् होई. ही यात्रा म्हणजे मोठी संस्था होती. अरबी वाङ्मयाचें तें संमेलन असे. लहान मोठे कवि तेथें येत. आपापलीं काव्यें म्हणत. सर्वांनाच कीर्ति नसे मिळत. परंतु मान सर्वांना मिळे. येथें कोणी अध्यक्ष नसे. तेथें व्याकरण, छंद यांच्या चर्चा होत. सूक्ष्म भेद नजरेस आणले जात. अरबस्थानांतील नाना भाषाभेदांतून येथें एक सर्वमान्य भाषा बने. कुराणी भाषा येथेंच तयार झाली. मुहंमदांच्या हातीं ती कमावलेली भाषा आली आणि त्यांनी जग जिंकले!

ही अकडा यात्रा केवेळ साहित्य-संगीताचीच नसे. सर्व बेदुइनी सद्गुणांचा वार्षिक अहवाल जणुं तेथें घेतला जाई. तेथें अरब राष्ट्र स्वतःची जणूं परीक्षा देई. स्वतःचें, राष्ट्राचें आत्मपरीक्षण केलें जाई. जीवनांत व काव्यांत जें जें उदार व उत्तम त्याची तेथें चर्चा होई. अरबांतच नव्हे तर जगांत सर्वत्रच त्या त्या राष्ट्रांचे उदात्त आदर्श त्यांच्या काव्यांतूनच प्रकट झाले आहेत.

या यात्रेंत जीवनांतील कर्तव्यांची परमोच्च कल्पना मिळे. त्या कल्पनेचा येथें उच्चार होई, तिचें समर्थन केलें जाई. ही यात्रा म्हणजे रंगभूमि, व्यासपीठ, सभागृह, वर्तमानपत्र, सारें होतें! अरबांची जणूं राष्ट्रीय विद्यापीठ उघडे. मुहंमदांनी ही यात्रा पुढें अधार्मिक कवींच्या भीतीने बंद केली. मुहंमदांनी एक नवीनच अरब राष्ट्र निर्मिलें. परंतु पूर्वीचे ते अरब राष्ट्र. तेथें मुहंमदांचे इस्लामी अरब पूर्वीच्या अरबांची जात घेऊं शकणार नाहींत!

« PreviousChapter ListNext »