Bookstruck

इस्लामी संस्कृति 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घोडयाच्या आधाराने. निष्प्राण शरीर उभें होतें! रक्तस्त्रावानें कधीच तो मेला होता. शत्रुजवळ आले. अंतारानें प्रेमानें जिवंतपणींच नाही तर मेल्यावरहि रस्ता धरून ठेवला हें त्यांनी ओळखलें. इस्लामपूर्व अरबांत अशा अनेक कथा आहेत. खरा अरब एकदांच प्रेम करी. तो त्याच्यावर आमरण प्रेम करी. पुढें बहुपत्नीत्वाची चाल पडली. विशेषेंकरून शहरांत ती सुरू झाली. बहुपत्नीत्व व बहुपतित्व दोन्ही प्रकार.

प्राचीन अरब काव्याचे जे थोडे फार नमुने आहेत. त्यांतून भावनांची कोमलता आहे. अरब लोक लहान मुलींना वाळवंटांत जिवंत पुरून मारीत! सदैव चालणा-या लढायांनी पुरुषांची संख्या फार कमी होती. मुलींचे करायचें काय, हा प्रश्न असे. म्हणू अशा रीतीनें ते संख्या कमी करीत. परंतु शहरांतील अरबच मुलींना अशा रीतीनें मारीत. बेदुइन या गोष्टी कमी करी. कधीं दारिद्यामुळेंहि त्याला असें करावे लागे. परंतु त्याला का प्रेम नसे? एक बाप आपल्या मुलीस म्हणतो

''माझी उमेयमा नसती तर माझ्या जिवाला कसलीच काळजी वाटली नसती, मग मी कशाचीहि फिकीर नसती केली. या काळयाकुट्ट अंधारांत भाकरीसाठीं मी धडपडत राहिलों नसतों. ही दगदग केली नसती. अजूनहि जगावें असें का बरें मला वाटतें? कोणतें कारण, कोणता हेतु? मी गेलों तर मुलीचें कसें होई? ती पोरकी होईल. नातलग निष्ठुर असतात. म्हणून मला जगावें असें वाटतें. तिला सोडून जाऊं नये असें वाटतें. मी भिकारी होईन का, सा-या संपत्तीचा नाश होईल का, असा विचार मनांत येतो व मी घाबरतों. कां बरे? कारण जवळ कांहींच नसेल तर माझ्या मुलीचें कसे होईल? तिचें रक्षण हा दरिद्री पिता कसें करूं शकेल? एखाद्या ताटांत मांस ठेवावें, मग त्याच्यावर सारे तुटून पडतात तसें तिच्यावर सारे तुटून पडतील! माझी मुलगी-लाडकी उमेयमा-माझ्यासाठीं प्रार्थना करते, मला उदंड आयुष्य मिळावें म्हणून प्रार्थना करते. आणि मी कोणती प्रार्थना करतो? ती माझी लाडकी मुलगी मरावी अशी मी प्रार्थना करतों! ती मरावी म्हणून प्रार्थना? होय. तिच्या मरणाची प्रार्थना! कुमारिकेचा प्रेमळ व कृपाळू एकच मित्र आहे. तो म्हणजे मरण. तिला भेटायला येणा-या मृत्यूहून अधिक सौम्य व मायाळू दुसरें कोण असेल? असा प्रेमळ पाहुणा दुसरा कोणता भेटेल? भाऊ तिला कठोरता दाखवतील. चुलते टोचून बोलतील. तिच्या कोमल हृदयाला एकाहि शब्दाचा धक्का बसूं नये अशी काळजी घेणें हें माझें सर्वांत मुख्य कर्तव्य आहे.''

दुसरी एक कविता पहा

''संपत्ति जाऊन विपत्ति मला आली. मी वर होतों, आतां खालीं घसरलों. दुर्दैवाने सारें सारें गेलें. आतां अब्रू यांचे धन तेवढें उरलें. दैवानें माझ्या आनंदाचें अश्रूंत परिवर्तन केलें. कितीदां तरी दैवानें जें जें मला, दिलें तें तें पाहून मी हंसलों आहें. परंतु आज?

''या मुली नसत्या तर? मग या अनंत पृथ्वीवर माझी भाकरी धुंडीत मी स्वैर फिरलों असतो. पृथ्वीची लांबीरुंदी कांहीं कमी नाहीं! आपलीं मुलें म्हणजे चालतीं बोलतीं जणुं आपलीं ती हृदयेंच असतात. त्यांतील एखाद्यालाहि जरी जरा कठोर वारा लागला तरी माझा डोळा झोपेला नाही म्हणूं लागतो.''

अशा त्यांच्या भावना होत्या. असें हें काव्य आहे. जुनें अरबी काव्य.

« PreviousChapter ListNext »