Bookstruck

इस्लामी संस्कृति 24

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुहंमदांचें आरंभीचें जीवन

या प्रसंगानंतर थोडया दिवसांनी अब्दुल्ला यसरिबला सासुरवाडीस जात असतां वाटेंत मरण पावला. त्याचें वय फक्त पंचवीस वर्षांचें होतें. आणि त्याच्या दु:खी पत्नीनें पुढें लौकरच एका मुलाला जन्म दिला. तेच आपले पैगंबर मुहंमद. जो पुढे सर्व अनाथांचा बाप झाला तो जन्मताच पितृहीन होता ! इ.स.५७० च्या ऑगस्टची २९ वी तारीख. त्या दिवशीं हा महापुरुष जन्मला. अबिसिनियन सैन्याच्या नाशानंतरचा तो पन्नासावा दिवस होता.

अरब चालीप्रमाणें एका बेदुइन दाईनें दूध पाजून मुहंमदांस वाढविलें. पुढें तिनें अमीनाजवळ तें वाढलेलें लेंकरुं आणून दिलें. अमीना मोठया प्रेमानें व काळजीनें देवाचा हा ठेवा वाढवूं लागली. तिचे हृदय दु:खाने पोळलेलें होतें. परंतु मुहंमदाच्या बालमूर्तीकडे पाही व शांत राही. परंतु तीहि लौकरच मरण पावली. मुहंमद लहानपणींच पोरके झाले ! मुहंमदाचें वय सहा वर्षांचें. आईबापांच्या प्रेमाची पाखर जगांत कुठें मिळणार ? तसें वात्सल्य कोण  देणार ? मुहंमदांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. पोरक्या मुलांना फसवूं नका, त्यांना प्रेम द्या, असें कुराणांत अनेक उल्लेख आहेत. पोरक्या मुलांची कशी दीनवाणी स्थिति होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता. ती आठवण ते कधीं विसरले नाहींत.

आजोबांनी, अब्दुलमुत्तलिब यांनीं मुहंमदांस आपल्याजवळ घेतलें. या नातवावर ते फार प्रेम करीत. देवाला बळी देऊं केलेल्या मुलाचा हा मुलगा. आणि देवानें मुलाला तर नेलें. त्याचा हा मुलगा राहिला. आजोबा त्याला क्षणभर विसंबत नसत. ए वर्षांचा वृध्द आजोबा व सहासात वर्षांचा नातु. त्या दोघांत अति प्रेमळ व कोमल प्रीति होती. काबाजवळ एका ठराविक जागीं आजोबा बसत. आणि जवळ नातु असायचा. खेळायचा, बोलायचा, प्रश्न विचारायचा. परंतु आजोबांचेंहि प्रेम मुहंमदांस मिळावयाचें नव्हतें. सना येथील नवीन राजाचें अभिनंदन करण्यासाठीं कुरेशांच्या वतीनें वृध्द अब्दुल मुत्तलिब गेले होते. ती प्रवासाची दगदग सहन झाली नाहीं. ते आजारी झाले. मरणार असें वाटलें. आजोबानीं आपला मुलगा अबु तालिब यास बोलविलें व मरणशय्येवरुन सांगितलें, 'हा तुझ्या भावाचा पोरका मुलगा तुझ्या स्वाधीन मी करीत आहें. त्याला प्रेम दे.' आणि इ.स.५७९ च्या अखेर अब्दुल मुत्तलिब देह सोडून गेले. मुहंमदांचें वय नऊ वर्षांचें होतें.

चुलते अबु तालिब यांच्या घरीं मुहंमद राहूं लागले. लहानपणापासूनच मुहंमद विचारी होते. ते नेहमीं विचारमग्न असत. डोळे मोठे काळेभोर. जणुं असारांतील सार शोधावयाला आले होते. सत्यशोधक, जिज्ञासु डोळे, कधीं हा मुलगा एकटाच टेंकडयांवर जाई व सृष्टिसौंदर्य पहात बसे. तेथे दमे, तल्लीन होई. स्वभाव मोठा सौम्य व गोड. दुस-याच्या दु:खानें लगेच दु:खी होत, गहिंवरत. फार करुण, कोमल हृदय होतें तें. असा हा भावनोत्कट मुलगा सर्वांचा लाडका झाला. चुलत्या-पुतण्यांत अपार प्रेम जडलें. 'जणुं देवदूतांनीं येऊन त्यांची हृदयें उघडून आंत प्रकाश भरला.'

उखाझ येथील मोहरमच्या पवित्र महिन्यांतील यात्रेंत तो जाई. अरबांच्या शौर्याधैर्यांचीं वर्णनें ऐके. ते पराक्रम ऐकून तो आनंदी होई. परंतु ते आपसांतील द्वेषमत्सर व सूड ऐकून सचिंत होई. यात्रेमध्यें ज्यू व खिस्ती धर्मोपदेशकहि येत. त्यांचीं प्रवचनें तो लक्ष लावून ऐके. या यात्रेंत सारें भलेंबुरें अरब जीवन तरुण मुहंमदांस पहायला मिळे. सुंदर अरबी भाषा येथेच ते शिकले. जिचा कुराणांत पुढें अद्भुत प्रयोग झाला.

« PreviousChapter ListNext »