Bookstruck

इस्लामी संस्कृति 27

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बिन गाजावाजाचीं
पंधरा वर्षे

सातव्या शतकाच्या आरंभी आणखी एक गोष्ट झाली. एका अरबानें बायझंटाईन सत्तेकडून कांही लांच खाल्ली. हिजाझ प्रांत रोमन सत्तेखालीं देण्याचीं हा लांचखाऊ खटपट करीत होता. परंतु मुहंमदांनीं पुढाकार घेऊन हा बेत हाणून पाडला.

इ.स.६०५ मध्यें काबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचें काम कुरेशांनी योजिलें. परंतु आपसांत कांहीं तंटा निघाला. जीर्णोध्दार दूर राहून रक्तपात होणार असें दिसूं लागलें. परंतु मुहंमदांनीं तडजोड केली. काबाचा दगड कोणी उचलायचा याचा वाद होता ! मुहंमदांनी एक रुमाल आणला. सर्वांनीं टोकें धरुन उचला असें सांगितलें. अशा रीतीनें त्यांनीं समयसूचकतेनें व शहाणपणाने रक्तपात टाळला.

मुहंमद आतां सुखी होते. खदिजा श्रीमंत असल्यामुळें संसाराची विवंचना नव्हती. परंतु प्रेम करणारे चुलते अबु तालिब यांची गरिबी होती. त्यांचे उपकार मुहंमद कसे विसरतील ? त्या उपकारांचें थोडें व्हावें असें त्यांच्या मनांत आलें. चुलत्यांचा एक मुलगा अली त्यांनी आपल्या घरीं आणिला. त्याचे शिक्षण, संवर्धन, सारी जबाबदारी स्वत:वर घेतली. पुढें जेव्हां एकदां दुष्काळ आला तेव्हां दुस-या एका अब्बास नांवाच्या चुलत्यांस मुहंमद म्हणाले, 'अबु तालिबांचा एक मुलगा तुमच्याकडे घ्या. मीहि माझ्याकडे आणखी एक घेतों.' अब्बास यांनीं जाफरला घेतले. मुहंमदांनी अलीस स्वत:चा जणुं मुलगा मानलें. एक मुलगा अबु तालिबांजवळ राहिला. मुहंमदांचे सारे मुलगे मेले ! पुत्रप्रेम कोठें करावें त्यांनीं ? अलीच्या संवर्धनांत त्यांना पुत्रवात्सल्याचा आनंद मिळे. पुढें मुहंमदांनी आपली सर्वांत लहान कन्या फातिमा हिचें लग्न अलीजवळ केलें होतें. यामुळे प्रेमाचा व भक्तीचा संबंध अधिकच दृढावला. फातिमाचा जन्म इ.स.६०३ मध्यें झाला होता.

या सुमारास मक्केंतील एका जमातीनें हारिसाचा मुलगा झैद याला मक्केंत गुलाम करुन आणिलें. खदिजेच्या एका आत्यानें त्याला विकत घेतलें होतें. त्यानें त्या गुलामाची खदिजेस भेट दिली. खदिजा पैगंबरांस म्हणाली, 'ही मला मिळालेली भेट मी तुम्हांला देतें !' आणि मुहंमदांनी झैदला ताबडतोब मुक्त केलें.

ही दया त्या काळांत अपूर्व होतीं. झैदचें हृदय कृतज्ञतेनें ओथंबून गेलें. तोहि मुहंमदांस सोडून जाईना. ज्यानें मला स्वातंत्र्य दिले त्याला सोडून मी कसा जाऊं ? त्याचा बाप हारिसा त्याला नेण्यासाठीं आला. पित्यानें परोपरीनें आग्रह केला. परंतु झैद गेला नाही.

« PreviousChapter ListNext »