Bookstruck

इस्लामी संस्कृति 35

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"अनाथांचा त्राता, विधवांचा वाली, पोरक्या पोरांचा पिता, जो अलअमीन आहे, जो दिला शब्द मोडीत नाहीं, कर्तव्यच्युत होत नाहीं, त्याचा कां बरें हे छळ करतात ?'

त्यांनी जाहीर केलें कीं, हाशिम व मुत्तलिब यांचीं मुलें स्वत:च्या प्राणांनी मुहंमदांचें रक्षण करतील.

याच वेळेस यसरिब येथील एका प्रमुख गृहस्थानें मक्कावाल्यांस लिहिलें: 'यादवी नका करूं. नवीन मत ऐका. तुमच्यांतील एक सन्मान्य पुरुष नवधर्म देत आहे. त्याचा छळ नका करूं. मनुष्याचें हृदय एक परमेश्वरच वाचूं शकतो.'

या पत्राचा थोडा परिणाम झाला. प्रत्यक्ष छळण्याऐवजीं ते निंदेनें छळूं लागले. शिव्या द्याव्या. वाटेल तें अभद्र बोलावें. कुरेशांनीं मुहंमदांस काबा मंदिरांत प्रार्थनेची बंदी केली. मुहंमद प्रार्थनेसाठीं जेथें जात तेथें पाठोपाठ विरोधकहि येत. ते प्रार्थना करूं लागले म्हणजे हे शेणमार करीत. गांवांतील गुंडांना व वात्रट पोरांना मुहंमद व त्यांचे अनुयायी यांच्या पाठीस लावीत. मुहंमदांच्या एका चुलत्यांची पत्नी उम्मेजमील ती ह्या छळण्यांत पुढाकार घेई. ती मुहंमदांच्या प्रार्थनेच्या जागीं कांटे पसरुन ठेवी. या बाईला इस्लामी इतिहासांत 'हम्मालत उल-हतब' म्हणजे नरकाग्नीसाठीं मोळी नेणारी-असें नांव पडलें आहे. असा त्रास होई तरी मुहंमद शांतपणें कर्तव्य पार पाडीत होते. एकदां तर त्यांच्या प्राणांवरच पाळी आली होती. परंतु मुहंमदांच्या आत्मसंयमी सौम्य स्वभावामुळें ते दुष्ट शेवटीं माघारे गेले.

या छळानें नवधर्माचें सामर्थ्य वाढतच गेलें. हुतात्म्यांचें रक्त हेंच धर्माचें फोंफावणारें बीं. अबदुल मुत्तलिब यांचा सर्वांत धाकटा मुलगा हमजा हाहि मुहंमदांस मिळाला. मुहंमदांचा होत असलेला छळ, त्यांना मिळणारे शिव्याशाप, त्यांची होणारी निंदा, यामुळें तो त्यांना येऊन मिळाला. हमजा मोठा शूर होता. त्याच्या तरवारीची सर्वांना भीति वाटे. इस्लामसाठींच लढतांना तो पुढे मरण पावला !

मुहंमदांची प्रखर वाणी सुरुच होती. अधिक लोक मिळूं लागले. कुरेश घाबरुं लागले. मुहंमदांच्या नवधर्माची शिकवण लोकशाही स्वरुपाची होती. मुहंमदांच्या ईश्वरासमोर सारे सारखे होते. प्राचीन विशिष्ट भेद, ते श्रेष्ठकनिष्ठपणाचे प्रकार मुहंमद नष्ट करूं पहात होते. सनातनींस हें कसें सहन होणार ? ख-या देवाची पूजा सुरु झाली तर या प्रतिष्ठितांची पूजा कोण   करणार ? सारे कुरेश संघटित होऊं लागले. ज्यानें त्यानें आपल्या घराला जपावें. आपल्या घरांत हे नवीन धर्माचे जंतु येऊं देऊं नये असें ठरलें. ज्याच्या ज्यांच्या घरांत कोणी नवधर्मी होते त्यांना त्यांना त्यांच्या कुटुंबियांनीं तुरुंगांत टाकलें ! त्यांचीं उपासमार सुरु झाली. त्यांना काठयांनी बदडलें. रमधा टेंकडी व बथा ही जागा या छळासाठीं प्रसिध्द झाली ! जे पुरुष नवधर्म घेत त्यांना प्रखर उन्हांत तप्त वाळूंत उताणें निजवीत. उघडें करुन निजवीत. छातीवर दगड ठेवीत. पिण्यास पाणी देत नसत. 'मूर्तिपूजा मान नाहींतर मर' असें म्हणत. या छळामुळें कांहींजण तात्पुरतें कबूल करीत, परंतु पुन्हां मूर्तिपूजा त्याज्य मानीत. पुष्कळजण या असह्य छळांतहि टिकत. बिलाल अशांपैकीं होता ! बिलाल निग्रो गुलाम होता. त्यानें नवधर्म घेतला होता. त्याचा धनी उमय्या त्याला रोज बथा येथें नेई. मध्यान्ही सूर्य आला असे. तेथें सूर्याकडे तोंड करुन उघडा करुन पाठीवर त्याला निजवण्यांत येई. छातीवर दगड ठेवीत व त्याला म्हणत, 'नवीन धर्म, इस्लाम सोड नाहींतर मर !' त्या छातीवरच्या दगडावरहि हे शब्द लिहिलेले असत. बिलालचा जीव गुदमरे, तहानेनें तडफडे. परंतु तो तरीहि 'अहृदन अहृदन !' एक एक (ईश्वर एक आहे) असेंच म्हणे. या छळानें तो शेवटीं मरणोन्मुख झाला. अबू बकरनें त्याला त्याच्या धन्यापासून विकत घेतलें व मुक्त केलें ! गुलामांचा कुरेश छळ करीत, ज्या गुलामांनी नवधर्म स्वीकारला होता. त्या अबू बकरनें छळल्या जाणा-या अशा गुलामांना मुक्त केलें. कोणी कोणी छळामुळें जरी कचरले तरी मुहंमद त्यांच्यावर रागावत नसत. करुणेनें म्हणत, 'तुम्ही वाईट नका वाटून घेऊं. तुमचीं मनें   माझीं आहेत हें मला माहीत आहे.' कांहीं कांहींचा इतका छळ झाला कीं ते मेले ! यासर व त्याची पत्नी शमिया यांना छळून मारण्यांत आलें. त्यांचा मुलगा अम्मार याचाहि अत्यंत छळ झाला. मुहंमद हे छळ पहात होते. त्यांच्या हृदयाची कालवाकालव होत होती. या छळांत दोन मेले. कांहीं शरण गेले.

« PreviousChapter ListNext »