Bookstruck

इस्लामी संस्कृति 39

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"दयाळु परमकृपाळू परमेश्वराच्या नांवाचा जयजयकार असो. या पृथ्वीवर वा त्या स्वर्गांत जें जें आहे तें तें सारें परमेश्वराची स्तुति करतें. सारें चराचर त्या प्रभूचें स्तोत्र गात आहे. तो परमेश्वर पवित्र आहे. अत्यन्त शक्तिमान् आहे. सर्वज्ञ आहे. तो एक आहे, अद्वितीय आहे. स्वत:ची सामक्षा दाखविण्यासाठीं अज्ञानी अरबांत त्यानें पैगंबर पैदा केला आहे. अरबांना धर्मग्रंथ व ज्ञान देण्यासाठीं, विशुध्द करण्यासाठीं त्यानें पैगंबर पाठविला आहे. अरब पूर्वीं अज्ञानांत होते. परंतु ईश्वराची दया सर्वांठायीं आहे. ती मुक्त आहे. इच्छा त्याची असेल तेथें तो आपली दया पाठवितो. ईश्वर परम दयाळु आहे. आणि त्या परमेश्वराचे चमत्कार या निसर्गांत सर्वत्र भरुन राहिले आहेत पहा, आसमंतांत पहा. हें आश्चर्यमय जगत् पहा. पहा हे चंद्र, सूर्य, तारे. अनंत निळया आकाशांत कसे नियमितपणे आपल्या गतीनें जात आहेत. या विश्वांतील व्यवस्था पहा, कायदा पहा, पध्दती पहा. सुकलेल्या धरित्रीला हिरवी गार करणा-या या पावसाच्या सरी बघा. कसे मोत्यासारखे हे जीवनदायी थेंब. आणि प्रचंड महासागरावर डौलानें जाणारीं तीं गलबते पहा. मानवांचा फायद्याचा असा माल नेतात आणतात. आणि ही खजुरानें लादलेलीं झाडें पहा. तीं ताडगोळयांनी भरलेलीं ताडाचीं झाडें पहा. अशी ही महान् सृष्टि त्या तुमच्या दगडाधोंडयांतील देवानें का निर्मिली ? त्या लांकडी मूर्तीनीं का   निर्मिली ? तुम्हांला चमत्कार हवे आहेत. जेथें पहाल तेथें चमत्कार ! सारी सृष्टि ईश्वराच्या सामक्षांनीं भरलेली आहे. हें शरीरच पहा. किती व्यवस्थित व सुंदर. आश्चर्यकारक गुंतागुंतीनें भरलेलें. परंतु कसें दिसतें. आणि दिवसरात्रीची ही अभंग शाश्वत जोडी पहा. जीवनमरणहि पहा. तुम्ही झोंपता व जागे होता हाहि चमत्कार नाहीं ? ईश्वरानें जें विपुल दिलें आहे तें जमवावें अशी तुम्हांला इच्छा होते. भरलेले मेघ आणणारे वारे, ईश्वराच्या करुणेचे जणुं ते अग्रदूत सृष्टींतील विविधतेमधील मेळ पहा, तींतील एकता पहा. मानवजातींतहि विविधता आहे व सदृशता, एकताहि आहे. फुलें, फळें, हे प्राण, मानव या सर्वांवरुन, या चराचर सृष्टीवरुन कोणी तरी एक सर्वश्रेष्ठ महान् परमेश्वर आहे असें नाहीं का दिसत?'

असें मुहंमद सांगत, विचारित. चमत्कारांवर भर न देतां ते बुध्दीवर भर देतात. विचाराला चालना देतात. भोळसरपणावर जोर देणारे ते नव्हते. प्रज्ञेचा डोळा त्यांना प्रिय होता. बुध्दीचा महिमा ते जाणत. पैगंबरांनाहि सारी सृष्टि ईश्वराचें अस्तित्व पुकारणारी असें वाटे. सर्वत्र ईश्वरी चमत्कार ! सारी सृष्टि परमेश्वराचा महिमा जणुं मुक्यानें गात आहे.

जिव्हा प्रत्येक पानांत । ध्वनि प्रत्येक निर्झरीं
सर्वत्र घुमते वाणी । वा-यावर धरेवरी
निरभ्र गगनीं आहे । महान् पूरामधें असे
सर्वत्र ईश्वरी वाणी । नावेक न विसांवते ॥

अद्वितीय केवळ एक अशा ईश्वराचा हा आचार्य सृष्टीचाहि आचार्य आहे. त्या एकेश्वराचा हा पैगंबर सृष्टीचाहि पैगंबर आहे. विश्वांत सर्वव्यापी नियम आहे, व्यवस्था आहे, ऋतसत्य आहे, एक चिच्छक्ति सर्वत्र भासत आहे, एक संकल्पशक्ति, नियामक, विश्वशासक, विश्वमार्गदर्शक अशी आहे, असें पैगंबर सांगत आहेत. आणि सर्वांत मोठा चमत्कार कोणता ? मुहंमद सांगतात 'निसर्गाचीं, सदसद्विवेकबुध्दीचीं, भविष्यासंबंधींची जीं दैवी सत्यें संस्फूर्त वाणीनें सांगितलीं गेलीं, ज्याचें हें कुराण बनलें, त्या कुराणाहून अधिक मोठा चमत्कार कोणता ?' मुहंमद विचारतात, 'अरे अश्रद्धावंतांनो ! तुमच्या या सामान्य भाषेंत जगांतील असें अद्वितीय पुस्तक प्रकट व्हावें, ज्यांतील लहानसा भागहि सोन्यानें मढवून ठेवलेल्या तुमच्या सर्व पद्यांना व गीतांना लाजवील, असें हें कुराण-त्या परमेश्वराच्या विश्वव्यापक करुणेची मंगल वार्ता देणारें, अहंकारी घमेंडनंदनांना, जुलमी जालिमांना धोक्याची सूचना देणारें, असें हें कुराण. त्याहून थोर चमत्कार कोणता ?'

« PreviousChapter ListNext »