Bookstruck

इस्लामी संस्कृति 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुहंमद म्हणत, 'देवा, अहोरात्र मी माझ्या लोकांना सांगत आहें. टाहो फोडीत आहें. परंतु ते माझ्यापासून अधिकच दूर त्यामुळें जात आहेत. मी तुझा संदेश त्यांना सांगूं लागलों कीं ते कानांत बोटें घालतात. परंपरागत चुका चालू ठेवतात. अधर्म व अनाचार सुरु ठेवतात. ते तुझ्या धर्माला तुच्छ मानतात. प्रभो, नवधर्म घ्या म्हणून रात्रंदिवस त्यांना सांगतो; आणि त्यांना क्षमा कर म्हणून तुलाहि सदैव सांगतो.'

आणि मुहंमदांवर याच वेळेस अति महान् प्रहार झाला. दैवाचा दुष्ट घाव. अबु तालिब व शदिजा दोघे थोडया अंतरानें मरण पावलीं ! मुहंमदांना सोडून गेलीं, परलोकीं गेलीं. आतांपर्यंत मुहंमद व त्यांचे शत्रु यांच्यामध्यें वृध्द व सन्मान्य अबु तालिब हेच पहाडाप्रमाणें खडे होते. त्यांनींच या पोरक्या मुलाला पाळलें, पोसलें, प्रेम दिलें. त्यांनीं त्याला कधीं सोडलें नाहीं. आणि खदिजेचें मरण हा तर फारच दारुण आघात होता. ज्या वेळेस सर्वत्र शंका व संशय होते, मुहंमदाचाहि स्वत:वर विश्वास नव्हता, सर्वत्र अंधार व निराशा यांचें राज्य होते, अशा वेळेस तिच्या प्रेमानेंच मुहंमदास आधार दिला. त्यांच्या आशेची व सांत्वनाची ती देवता होती. मरेपर्यंत खदिजेची प्रेमळ आठवण मुहंमदास होती. अतिहळुवार प्रेमानें ते तिचा उल्लेख करीत.

या दोघांच्या मरणानें मुहंमद जसे उघडे पडले ! त्यांना खूप वाईट वाटलें. इस्लामी इतिहासांत हें शोकाचें वर्ष. सुतकी वर्ष म्हणून प्रसिध्द आहे. अबु तालिब मेल्यावर विरोधकांचा रस्ता मोकळा झाला. आतांपर्यंत ते थोडी मर्यादा पाळीत होते. अत:पर मर्यादा पाळण्याची जरुरच उरली नाहीं. त्यांनी हा इस्लामी धर्म-हा नवधर्म समूळ नष्ट करण्याचें ठरविलें.

« PreviousChapter ListNext »