Bookstruck

इस्लामी संस्कृति 52

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्या गुहेच्या तोंडावर कोळयानें जाळें विणलें होतें ! पाठलाग करणारे म्हणाले, 'या गुहेंत नसणारच. गुहेंत शिरते तर ते जाळें कसें टिकतें !' आणि ते गेले. प्रभूची जणुं कृपा. त्या गुहेंत रोज अबुबकरांची मुलगी गुप्तपणें अन्न आणून देई. कुरेश पाठलाग करुन थकले, कंटाळले. तीन दिवसांनीं पाठलाग थांबला. तिस-या दिवशीं सायंकाळीं हे दोघे गुहेंतून बाहेर पडले. दोन उंट त्यांनी मिळविले. उंटावर बसून निघाले. रस्तोरस्ती बक्षिसाची लालूच असलेले मारेकरी दौडत होते. एकदां तर एक घोडेस्वार पाठीस लागला.

"संपलें सारें !' अबुबकर म्हणालें.
"भिऊ नकोस. ईश्वर राखील.' मुहंमद म्हणाले.

पाठलाग करणा-याचा घोडा उधळला. घोडेस्वार पडला. तो चकित  झाला. तो पैगंबरांजवळ आला व क्षमा मागता झाला. एका हाडाच्या तुकडयावर क्षमा लिहून अबुबकर यांनीं दिली. तो घोडेस्वार गेला. तीन दिवसांच्या प्रवासानंतर दोघे यसरिबच्या दक्षिणेस असलेल्या कुब्बा गांवीं येऊन पोंचले. यसरिबच्या मनो-यावरुन एक ज्यू पहात होता. त्याला हे दोघे दिसले. कुराणाच्या सहाव्या सु-यांमध्यें विसावी कविता आहे. तींत पुढील मजकूर   आहे :

"ज्यांना पूर्वी बायबल मिळालें, देवाचें पुस्तक मिळालें ते मुहंमदांस ओळखतात. ज्याप्रमाणें ते स्वत:चीं मुलेंबाळें ओळखतात.'

कुब्बा गांव फार रमणीय व समृध्द होता. लोक सुखी व सधन होते. खाऊन-पिऊन बरे होते. या गांवी मुहंमद व अबुबकर दोघांनी कांही दिवस मुक्काम केला. येथें अलीहि त्यांना येऊन मिळाले. मुहंमद गेल्यावर मागें अलींना बराच त्रास झाला. ते मक्केहून पायींच निघाले. दिवसा लपून रहात, रात्रभर चालत. शेवटी येऊन मिळाले. कुब्बाचा प्रमुख 'येथेच रहा' असे मुहंमदांस म्हणाला. परंतु मुहंमदांसमोर कर्तव्य होतें. ते यसरिबला जाण्यास निघाले. बरोबर कितीतरी अनुयायी होते.

त्या दिवशीं शुक्रवार होता. इ.स.६२२ जुलैची २ तारीख होती. त्या दिवशीं मुहंमदांनीं मक्का सोडली. या दिवसापासून मुहंमदी पंचांग सुरुं होतें. यालाच हिजरी सन ही संज्ञा आहे.

« PreviousChapter ListNext »