Bookstruck

इस्लामी संस्कृति 59

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"हें तुमचें असत्, हा सैतान राहतो कोठें' असा एकानें एकदां पैगंबरास प्रश्न केला.

"तुमच्या हृदयांत, मनुष्याच्या हृदयांत.' मुहंमदांनी उत्तर दिलें. ख्रिस्ती धर्मात तो नरकाचा सम्राट् आहे. मुहंमद इतकें मूर्तत्व त्याला देत नाहींत. असतचे अमूर्त तत्त्व ते मानीत असें दिसतें.

त्या लढाईत शत्रुपक्षाकडचे जे पडले होते त्यांना एका मोठया खड्डयांत मूठमाती देण्यांत आली. स्वत: मुहंमद तेथें होते. एकेकाचें नांव घेऊन त्याला मूठमाती दिली जात होती. मुहंमद गंभीरपणें म्हणाले, 'अरे तुम्ही सारे माझेच जातभाई होतात. मी खोटें बोलतों असें तुम्ही म्हणत असाल. कांहीचा माझ्यावर विश्वास होता. तुम्ही मला घराला परागंदा केलेंत. परंतु दुस-यांनीं माझें स्वागत केलें. आणि आतां तुमची काय ही दशा झाली ? देवाची अवकृपा झाली कीं असें व्हावयाचेंच.'

ज्या दोन कैद्यांचा शिरच्छेद झाला त्यांतील एकाचें नांव ओकबा असें होतें. वधस्थळी नेले जात असतां ओकबानें विचारलें, 'माझ्या मुलांबाळांस कोण ?' त्या वेळेस मुहंमदांनीं 'नरकाग्नि' असें उत्तर दिलें, असें काहीं पाश्चिमात्य चरित्रकार म्हणतात व मुहंमद किती निर्दय होता तें रंगवतात. परंतु हा गैरसमज आहे. ओकबा ज्या जमातीचा होता ती जमात स्वत:ला बनी उन-नाद म्हणजे अग्नीचे वंशज असें म्हणत. या नांवावरुन ही दंतकथा शत्रूंनीं निर्मिली असावी. मुहंमदाला मुलें किती प्रिय वाटत हें ज्यांना माहीत आहे, विशेषत: अनाथ पोरक्या मुलांविषयीं व गतधवांविषयीं कुराणांत जे शेंकडों सहृदय उल्लेख आहेत ते ज्यांनां माहीत आहेत, ते वरील गोष्ट सत्य मानणार नाहींत.

'यतो धर्म स्ततो जय:' असें आपण म्हणत असतों. बद्रच्या लढाईनें तरी हें दाखविलें. आपली बाजू सत्याची आहे असें मुहंमदांच्या अनुयायांना नक्की वाटलें. या लढायीच्या वेळेस मुहंमदांची आवडती मुलगी रुकैय्या ही मरण पावली. अबिसिनियांतून परत आलेल्या उस्मानजवळ तिचा नुकताच विवाह लागला होता. पैगंबरास अश्रु गाळावयास वेळ नव्हता ! कुरेश कैद्यांना त्यांनीं मोकळें केलें. हे कैदी मक्केला माघारीं गेले. ते मुहंमदांची स्तुतीच गाऊं लागले. कुरेश पुढा-यांना हें आवडलें नाहीं. अबु सुफियान हा दोनशें लोक बरोबर घेऊन मारुं किंवा मरुं अशा निश्चयानें निघाला. विजेसारखा तो आला. आसपासचीं मदिनेवाल्यांचीं फळझाडें तोडूं लागला. बाहेर येणारे जाणारें मारुं लागला. मदिनेवाले बेसावध होते. परंतु तेहि सूड घ्यायला बाहेर पडले. तेव्हां अबु सुफियानचे लोक खाण्याच्या पिशव्या टाकून पळून गेले. पिठाच्या थैल्यांची लढाई म्हणून ही प्रसिध्द आहे. (सबीकांच्या पिशव्यांची लढाई : सबीक हा एक खाण्याचा पदार्थ आहे. अरब लोक हिरवे दाणे भाजतात. मग ते दळतात. त्यांत साखर वा खजूर मिसळून प्रवासांत खातात.) याच लढाईच्या वेळची ती सुंदर सहृदय सत्यकथा आहे. मुहंमद त्यांच्या तळापासून जरा दूर एकटेच एका झाडाखाली झोंपले होते. इतक्यांत कसल्या तरी आवाजानें ते जागे झाले. समोर पहातात तों दरथुर उभा. दरथुर हा शत्रुपक्षाचा होता. मोठा वीर होता.

"आतां तुला कोण वांचवील ?' तो मुहंमदांस म्हणाला.
"प्रभु' मुहंमद म्हणाले.
वाळवंटांतील तो बेदूइन हें शांत सश्रध्द उत्तर ऐकून चकित झाला ! त्याच्या हातांतील तरवार गळून पडली. ती एकदम मुहंमदांनीं उचलली.

"दरथुर आतां तुला रे कोण वांचवील ?' मुहंमदांनी विचारिलें.
"अरेरे, कोणी नाहीं वांचवायला !' तो म्हणाला.

"माझ्यापासून दयाळू होण्यास शीक.' त्याची तरवार परत करुन पैगंबर म्हणाले.
त्या अरब वीराचें हृदय विरघळलें. तो पुढें पैगंबरांचा अत्यंत निष्ठावंत अनुयायी झाला.

« PreviousChapter ListNext »