Bookstruck

इस्लामी संस्कृति 69

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मक्कावाल्यांस त्रास दिला गेला नाहीं. परंतु त्यांच्या त्या मूर्तीनां त्रास झाला. जुने मूर्तिपूजक आपल्या मूर्तीचा भंग शांतपणें पहात होते. त्या सर्व मूर्ति मुहंमदांनीं स्वत:च्या हातांनीं फोडून टाकल्या ! प्रत्येक मूर्तीसमोर मुहंमद उभे रहात व म्हणत 'सत्य आलें आहे. असत्य नष्ट होत आहे.' असें म्हणत व मूर्ति फोडीत. अशा रीतीनें सर्व मूर्ति भंगून सारें जुनें धर्मकांड रद्द करुन जमलेल्या सर्वांना उद्देशून त्यांनीं भाषण केलें. कुराणांतील मानवांच्या ऐक्याचे मंत्र त्यांनीं प्रथम म्हटले. नंतर भाषण झालें. भाषणानंतर कुरेशांना त्यांनीं विचारिलें.

"मी तुमच्याशीं कसें वागावें असें तुम्हांस वाटतें ?'

"दयेनें व प्रेमानें. सहानुभूतीनें व अनुकंपेनें.' ते म्हणाले. आणि मुहंमदांस 'हे प्रेमळ व दयाळु भावा, हे प्रेमळ व मायाळू पुतण्या' अशा त्यांनीं हांका मारल्या. मुहंमदांस गहिंवर आला. ज्यांनीं द्वेषमत्सराची आग पाखडली तेच आज मुहंमदांस प्रेमानें संबोधित होते. पैगंबरांच्या डोळयांतून अश्रु आले व ते म्हणाले, 'जोसेफ आपल्या भावांस म्हणाला तसेंच मीहि म्हणतों. तुम्हांला मी नांवें ठेवित नाहीं. ईश्वर तुम्हांला क्षमा करील. तो अत्यंत दयाळु आहे. कृपासागर आहे. रहिमवाला मेहेरबान आहे.' (कुराण सुरा १२: ३१).

या क्षमेचा व दयेचा परिणाम अपरंपार झाला. भराभरा लोक येऊं लागले. नवधर्म घेते झाले. सफा टेंकडीवर मुहंमद बसत. जे येत त्यांच्याजवळून मागें मदिनावाल्यांजवळून आरंभी जशी शपथ घेतली होती तशी घेत.
"ईश्वर एक आहे, अद्वितीय आहे. त्याच्याशीं दुसरेंतिसरें मी मिसळणार नाहीं. व्यभिचार करणार नाहीं. बालहत्त्या करणार नाहीं. असत्य बोलणार नाहीं. स्त्रियांविषयीं अनुदान व असभ्य बोलणार नाहीं.'

पैगंबरांचें अंत:करण उचंबळून येत होतें. जीवनकार्य सफळ होत होतें. कुराणांत म्हटलें आहे, 'ईश्वराची मदत मिळेल. जय होईल. प्रभूच्या धर्मांत हजारों येऊं लागतील. त्या वेळेस ईश्वराची स्तुति कर. त्याची क्षमा माग. जे ईश्वराकडे वळतात. त्यांच्यावर त्याची करुणा वळते. त्याचें प्रेम वळतें.' आणि मुहंमद ईश्वराची स्तुति करित होते.

मुहंमदांचें जीवनकार्य पुरें होत होतें. त्यांनीं अरबस्थानांत सर्वत्र प्रचारक पाठविले. शांतीचे, सदिच्छेचे दूत पाठविले. ते सर्वांना सांगत, 'आत्मरक्षणार्थच शस्त्र उचलीत जा.' पूर्वीचा शत्रु खालिद बीन वलीद आतां इस्लामी धर्माचा कट्टा पुरस्कर्ता झाला होता. त्यानें कांहीं विरोधी बेदुइनांची कत्तल केली. मुहंमदांस हें कळलें तेव्हां त्यांना फार वाईट वाटलें. ते म्हणाले, 'प्रभो, खालिदनें केलें त्याचा दोष माझ्याकडे नाहीं हो. मी नव्हतें हो असें सांगितलें. मी निष्पाप, निरपराध आहें.' आणि त्यांनीं अलीला बनी जझीया जमातीकडे नुकसानभरपाई करण्यासाठीं एकदम पाठविलें. अलींनीं, किती मारले गेले होते त्याची नीट चौकशी केली व दियत-नुकसानभरपाई दिली. नुकसानभरपाई केल्यावरहि आणलेल्या पैशांतील कांहीं रक्कम शिल्लक राहिली. तीहि मृतांच्या आप्तेष्ट-मित्रांना त्यांनीं वांटून दिली. अलींनीं आपल्या सौम्य, स्निग्ध व उदार वर्तनानें सर्वांचीं हृदयें वश करुन घेतलीं. सारे प्रसन्न झाले. सर्वांचे आशीर्वाद व धन्यवाद घेऊन अली परत आले. मुहंमदांनीं त्यांचें कौतुक केलें.

कांहीं बेदुइन जमातींनीं मुहंमदांविरुध्द मोठी संघटना चालविली. परंतु मुहंमद सावध होते. मक्केच्या ईशान्येस हुनैन घळीजवळ लढायी झाली. बेदुइनांचा पराजय झाला. ज्या तायेफ शहरांतून नऊ वर्षांपूर्वी दगडधोंडे मारुन मुहंमदांस हांकलून देण्यांत आलें होतें त्या शहरांत शत्रु शिरले. परंतु शत्रूंचीं कुटूंबें मुहंमदांच्या हातीं होतीं. वेढा उठवून जेथें हीं कुटुंबें होतीं तेथें मुहंमद आले. नंतर पकडलेल्यांतील कांही कैदी म्हणाले, 'आमचीं बायकामाणसें मुलेंबाळें आम्हांला परत द्या.' मुहंमद आपल्या अनुयायांची मनोवृत्ति जाणत होते, अरब मनोवृत्ति जाणत होते. ते म्हणाले, 'विजयाचीं सारींच फळें आम्ही कशीं गमवायचीं ? कांही तरी तुम्ही दिलेंच पाहिजे.' ते कैदी म्हणाले, 'बरें तर.'

« PreviousChapter ListNext »