Bookstruck

इस्लामी संस्कृति 71

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

धर्मप्रसार

आतां हिजराचें नववें वर्ष सुरु झालें. जीं अनेक शिष्टमंडळें पैगंबरांना भेटायला आलीं, जे अनेक वकील भेटायला आले, त्यांसाठीं हें वर्ष प्रसिध्द आहे. अरबस्थानचा नवजन्म झाला होता. ढग गेले. धुकें गेलें. विचारांचा, नीतीचा, न्यायाचा, सध्दर्माचा नवसूर्य स्वच्छ प्रकाश देत होता. रानवटपणाची रात्र संपली. अज्ञान संपलें. नवयुग आलें. मक्का घेतल्यामुळें अरबस्थानांतील मूर्तिपूजेचा अन्त झाला. मनात, लात, उझ्झा वगैरे देवदेवतांची पूजा करणारे, मक्का पडल्यावर निराश झाले. मक्का शरण गेल्याची वार्ता सर्वत्र गेली. त्या गोष्टीचा मोठाच नैतिक परिणाम झाला. वाळवंटांतील बेदुइनांचीं शिष्टमंडळें येऊं लागलीं. या येणा-या पाहुण्यांची मदिनेंतील प्रमुख गृहस्थांकडे व्यवस्था करण्यांत येई. मुहंमद सर्वांना अत्यंत आदरानें वागवीत. आलेले जायला निघाले कीं, त्यांना भरपूर वाटखर्ची देत. कांहीं भेट देत. नजराणे देत. त्या त्या जातिजमातींच्या हक्कांचें रक्षण ज्यांत आहे असा करार होई. नवधर्म शिकविण्यासाठीं मुहंमद प्रचारक देत. मुहंमदांचें शहाणपण, सौजन्य, आतिथ्य वगैरे गुणांमुळें येणारा प्रसन्न होई. तो नवधर्म घेई एवढेंच नव्हे तर त्याचा प्रसारक बने.

एकदां पैगंबरांकडे एक गृहस्थ आला व म्हणाला,

"तुमच्यांतील अब्दुल मुत्तलिबाचा मुलगा कोण ?'

"मीच.' मुहंमद म्हणाले.

"कांहीं प्रश्न विचारुं ?'

"विचारा.'

"आम्हां लोकांत ईश्वरानें तुम्हांला पैगंबर म्हणून का पाठवलें आहे ?'

"हो. ईश्वरानें पाठवलें.'

"त्या एका ईश्वराचीच फक्त पूजा करा. त्या एका ईश्वराशीं दुसरें जोडूं नका. पूर्वजांच्या मूर्ति सोडा. असा तुम्ही उपदेश केला का ?'

"हो. अल्लानें असें सांगितलें आहे.'

यानंतर प्रार्थना, उपवास, यात्रा वगैरे सर्व गोष्टींविषयीं विचारल्यानंतर तो गृहस्थ म्हणाला, 'मीहि तुमच्या धर्माचा होतों. शपथेवर सांगतों कीं, एका अल्लाशिवाय कोणी देव नाहीं. मुहंमद त्याचा पैगंबर आहे. मी सारे नियम पाळीन. जें निषिध्द आहे तें टाळीन. जें तुम्ही सांगितलेंत त्यांतील कांहीं गाळणार नाहीं, कांहीं त्यांत नवीन घालणार नाहीं.'

अशा रीतीनें प्रबळ व सुसंघटित अरब राष्ट्र निर्माण होत होतें. परंतु या वेळेस एक बाहेरचें संकट आलें. एके काळीं अरबस्थान जिंकूं असें रोमन सम्राट म्हणत असत. आतां बायझंटाईन सम्राट पुन्हां तींच स्वप्नें खेळवूं लागले. पर्शियावर विजय मिळवून हिरॅक्लिअस नुकताच आला होता. मुहंमदांनीं वकील पाठविला होता. त्याचा खून झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठीं तीन हजार अरब फौज गेली. परंतु मांडलिक राजाचें कृत्य साम्राज्यसत्तेनें उचलून धरलें. मांडलिकाच्या सैन्यास मिळण्यासाठीं साम्राज्यसेनाहि आली. त्या लढाईंत मूठभर अरबांनी बायझंटाईन सैन्य पिटाळून लाविलें होतें. तो अपमान हिरॅक्लिअस विसरला नव्हता. अरबस्थानावर प्रचंड चढायी करण्यासाठीं मोठया सैन्याची जमवाजमव त्यानें चालविली होती. याच वेळेस हिजाज व नज्द भागांत मोठा दुष्काळ पडला. खजुरीचेंहि पीक नव्हतें. गुरेंढोरें मरत होतीं. अशा वेळेस घरेंदारें सोडून लढायीसाठीं जावयास लोक तयार नव्हते. लढायीला योग्य अशी वेळहि नव्हती. उन्हाळा फार कडक होता. प्रवासाचे कष्ट फार पडले असते. बायझंटाईन सैन्याविषयींहि अतिशयोक्तिपूर्ण गप्पा पसरल्या होत्या. पुष्कळांनीं आम्हांस नका नेऊं असें सांगितलें. जे अशक्त होते, अधिक दरिद्री होते, ज्यांनीं घरदार सोडून जाणें बरें नव्हतें त्यांचे अर्ज मंजूर करण्यांत आले. या लोकांना रडणारे 'अल-बक्काऊन' असें नांव पडलें आहे.

« PreviousChapter ListNext »