Bookstruck

इस्लामी संस्कृति 81

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु ही एक अत्यंत प्रखर सत्याची गोष्ट सोडली तर जीवनांत मिळतें घेण्यासाठीं ते तयार असत. समाजांतील भांडणें कमी व्हावीं अशी त्यांना फार इच्छा असे. ज्यू व ख्रिश्चन यांच्याजवळ त्यांनीं पुन:पुन्हां मिळतें घेतलें. विशेषत: ज्यूंजवळ. परंतु या ज्यूंनीं पुन:पुन्हां विश्वासघात केला. नवीन शासनसत्तेचा विश्वासघात केला. म्हणून मुहंमदांस कठोर व्हावें लागलें. कुराणांतील बरेचसे उल्लेख हे विशेषत: ज्यूंना उद्देशून आहेत. त्या त्या विश्वासघातामुळें, सात्विक संतापानें ते आलेले आहेत. परंतु मुहंमद क्षमामूर्ति होते. ते स्वत:चा धर्म सक्तीनें लादूं इच्छित नसत. आईबापांनीं मुलांवरहि धर्माची सक्ति करुं नये म्हणत. आपण धर्माचा उपदेश करावा. फळ देणें ईश्वराहातीं. तो न्याय देईल. योग्य तें वाढवील. त्याची इच्छा असती तर सारे एका धर्माचे नाहीं का होणार ? प्रत्येक देशांत त्यानें ईश्वरी पुरुष निर्मिले, अपौरुषेय धर्मग्रंथ दिले. 'माझा धर्म मला, तुझा तुला, कशाला झगडा ?' असें म्हणावें. आपलीं मतें शांतपणें बुध्दिपूर्वक मांडावीं. सक्ति नको.' असें ते सांगत. पैगंबर सर्वांशीं सलोख्यानें राहूं इच्छित होते. पत्नी विधर्मी असली, ख्रिस्ती धर्माची असली तरी तिचा धर्म तिला पाळूं द्यावा, असें त्यांनीं सांगितलें आहे. ज्यूंचें प्रेम संपादण्यासाठीं ते नमाजाच्या वेळेस प्रथम जेरुसलेमकडे तोंड करीत. परंतु पुढें ज्यूंचें दुष्ट व खुनशी वर्तन पाहिल्यावर पैगंबर आपल्या राष्ट्रीय स्थानाकडे, काबाकडे तोंड करूं लागले. शुक्रवार हा मुख्य दिवस झाला. ज्यूंचे उपवास सोडून नवीन रमजानचे उपवास सुरु झाले. काबाकडे तोंड करणें, काबाची सर्वांनीं यात्रा करणें हीहि एक तडजोडच होती. जरी तेथील सर्व देवता भंगण्यांत आल्या, तरी तो एक पवित्र दगड प्रभूची आकाशांतून आलेली ती खूण त्यांनीं ठेवली ! काबाचें पावित्र्य ठेवलें, यांत कुरेशांजवळ थोडी तडजोड होती. तसेंच या करण्यांत मुहंमदांची मुत्सद्देगिरी व दूरदृष्टि दिसते. एका दिशेकडे सर्वांचें तोंड. एक पवित्र स्थान सर्वांच्या समोर. सर्व राष्ट्राचें यामुळें त्यांनीं महान् ऐक्य निर्मिलें. जगांतील सर्व मुस्लिमांचें ऐक्य केलें. ती थोर ऐक्यकारक गोष्ट होती.

मुहंमद केवळ क्षमामूर्ति होते. स्वत:वर अपकार करणा-यावर त्यांनीं उपकारच केले. विष पाजणा-यांसहि प्रेम दिलें. मारायला आलेल्यांस प्राणदान व दया शिकविली. आपल्या मुलीचा क्रूर खून करणा-यासहि क्षमा केली. स्टेटच्या गंभीर प्रसंगीं ते कठोर होत. परंतु वैयक्तिक जीवनांत कठोरता त्यांना माहित नव्हती. तें सर्वांशीं प्रेमळपणानें वागत. त्यांच्या प्रेमळ वर्तनाच्या शेंकडों गोष्टी आहेत. त्यांचें कोमल संस्कारी मन त्या गोष्टींतून प्रकट होतें.

अनस नांवाचा त्यांचा एक नोकर होता. त्याला कोणी बोललें तर त्यांना खपत नसे. तो अनस म्हणाला, 'पैगंबरांजवळ मी दहा वर्षे होतों. परंतु रागाचा ऊफ् असा शब्दहि ते कधीं मला बोलले नाहींत !' कुटुंबांतील मंडळींजवळहि ते अति प्रेमानें वागत. त्यांचे मुलगे सारे लहानपणींच मेले. त्यांना फार दु:ख वाटे. एक मुलगा त्यांच्या मांडीवरच मरण पावला. एका लोहाराची बायको या मुलाला दूध पाजी. तिच्या धुरानें भरलेल्या घरांत तें मरणोन्मुख बाळ मांडीवर घेऊन मुहंमद बसले होते. त्या बाळाच्या मरणानें मुहंमद रडले ! मदिनेंत स्वत:च्या आईच्या कबरीजवळ मुहंमद रडत. निधनापूर्वी मुहंमद आपल्या बरोबरचे जे साथीदार मित्र मेले त्यांच्या कबरींना एके रात्रीं भेटून आले, तेथें अश्रुसिंचन करते झाले. हृदयाची अशी हळुवारता त्यांच्याजवळ होती. म्हणून 'बायक्या', 'स्त्रीस्वभावाचा' असें त्यांना म्हणत.

मुलांचें त्यांना फार वेड. रस्त्यांत त्यांना थांबवीत. त्यांना प्रेमानें थापट मारीत, त्यांच्या मुखावरुन प्रेमानें हात फिरवीत, त्यांना गोष्टी सांगत. त्यांच्या बरोबर फिरत. जणुं देवदूतांबरोबर फिरणें ! पोरक्या मुलांविषयीं तर त्यांना अपार प्रेम वाटे. कारण ते स्वत: त्या मातृपितृविहीन स्थितींतून गेले होते.

« PreviousChapter ListNext »