Bookstruck

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हिंदुस्तानात अनेक शास्त्रीय गायक, संगीतकार होऊन गेले त्यातील एक प्रसिद्ध गायक संगीतकार म्हणजे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर. राष्ट्रीय पातळीवर संगीत प्रसार करण्यासारखं मोठं काम त्यांनी यशस्वीपणे पार पडलं.

त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1872 मध्ये कुरंदवाड येथे झाला. त्यांचे संगीत ग्वाल्हेर घराण्याचे होते. ज्यांनी सर्वप्रथम उत्तर हिंदुस्थानी गायकी महाराष्ट्रात किंवा दख्खनमध्ये आणली ते पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचे ते शिष्य. त्यांचे वडील दिगंबर पंडित कीर्तनकार होते.

कधीही घडू नये असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला. दिवाळीच्या दिवसात अचानक एक फटाका चेहऱ्यासमोर फुटल्याने लहान वयातच त्यांचे डोळे अधू झाले. त्यांचे लिहिणे वाचणेही मुश्किल झाले होते. परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण घेण्यासाठी मिरज मध्ये बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे पाठवले. संगीत क्षेत्रात परिवर्तन घडल्याशिवाय संगीत विद्या आणि विद्यार्थी यांना चांगले दिवस येणार नाहीत याची त्यांना खात्री होती. यामुळे संगीत आणि संगीतकाराला समाजात योग्य ते स्थान मिळावे यासाठी 1896 साली मिरज गाव सोडून भारत दौरा करण्यास सुरुवात केली.

5 मे 1901 साली त्यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्याच्या अनेक शाखाही काढल्या. त्यावेळी गुरुकुलात राहून विद्या शिकणं हि संगीतविद्येची परंपरा होती. विद्यालयात दोन प्रकारचे विद्यार्थी होते. एक प्रकार म्हणजे विद्यार्थी नियमित वेळेत येऊन निघून जात व दुसरा प्रकार म्हणजे उपदेशवर्गात शिकणारे, त्यांचा दिनक्रम निश्चित केलेला होता. पं. यशवंतबुवा मिराशी, पं. विनायकबुवा पटवर्धन, पं. डी. व्हि. पलुस्कर (पुत्र) हे त्यांचे काही शिष्य.

पलुस्कारांनी संगीत विषयक जवळ जवळ 50 क्रमिक पुस्तके लिहिली. संगीत बालप्रकाश, संगीत बालबोध, महिला संगीत इ. ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. आणि त्याच प्रमाणे "संगीतमृत प्रवाह" नावाचे मासिक त्यांनी चालवले. वाद्यांची व्यवस्था नीट असावी यासाठी त्यांनी स्वतःचा वाद्यांचा कारखाना काढला. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना देखील वाद्यदुरुस्ती कशी करावी याबाबतचे शिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी स्वतंत्र अशा वसतिगृहाचीही सोय त्यांनी केली. हे सर्व स्वबळावर होण्यासाठी त्यांनी भारतभर अल्प मानधनामध्ये ठिकठिकाणी जलसे (महोत्सव) केले.

एवढे सर्व सांभाळत असून सुद्धा त्यांनी कधीही स्वतःच्या गायकीकडे दुर्लक्ष केले नाही. आवाजाला जडत्व येऊ नये यासाठी त्यांचे बरेच प्रयत्न चालू होते. त्यांचा आवाज बुलंद मात्र अत्यंत निर्मळ आणि गोड होता. अगदी तिन्ही सप्तकांत सहजपणे फिरणारा होता. त्यांनी स्वतंत्र अशी स्वरलेखन पद्धती तयार केली ; ती "पलुस्कर स्वरलेखन पद्धती" या नावाने परिचित आहे. हे त्यांचं संगीतासाठीचं सर्वात मोठा योगदान आहे. "रघुपती राघव राजाराम" हे भजन त्यांनी स्वतः गायले आणि लोकप्रियही केले. त्याच प्रमाणे त्यांनी भक्तीरसावर अनेक बंदिशीही रचल्या. आज जे आपलं राष्ट्रीय गीत म्हणून सर्वांना प्रचलित आहे ते 'वंदे मातरम' ते त्यांनीच कंपोज केले आहे आणि जाहीर सभा संपल्यानंतर ते म्हणण्याची प्रथा सुद्धा त्यांनी प्रथम सुरु केली, जी आजतागायत चालू आहे.

गाण्याविषयी समाजात अभिरुची निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याने गांधर्व महाविद्यालयाच्या संस्थेमार्फत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. जे काही नवं आणि चांगलं ऐकायला मिळेल त्याचा आपल्या गायकीत समावेश करता येईल का? यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. खोटं बोलणं, मान-अपमान हे त्यांना कधीही आवडलं नाही. तसेच संगीत प्रसार-प्रचारासाठी त्यांनी ब्रज, हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. ते एक उत्तम वक्ते सुद्धा होते. हि त्यांची काही वाखाणण्याजोगी वैशिष्ट्ये आहेत.

पलुस्कारांच्या कर्तृत्वाचा काळ अगदी 33-34 वर्षांचा जरी असला तरी त्यांचे कार्य मात्र फार मोठे होते. त्यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्याल्यामुळे अनेक पिढ्या संगीताशी जोडून राहू शकल्या.

21 ऑगस्ट 1931 या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते जरी नसले तरी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आजही उत्तमरित्या कार्यरत आहेत. आणि यापुढेही अशीच कामगिरी करतील याबद्दल काहीच शंका नाही.

- अनुश्री केळकर.

« PreviousChapter ListNext »