Bookstruck

जा, घना जा ! 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“येथे क्लब आहे, त्याच्यात जेवायला या. आणि माझी बादली घ्या. तिकडे हौद आहे. तेथे अंघोळीची व्यवस्था आहे.” एक तरुण म्हणाला.

“तुमचे नाव काय?” सखारामने विचारले.

“मला सारे घना म्हणतात. घनश्याम माझे नाव. तुमचे नाव?”

“सखाराम.”

“छान नाव ! सर्वांचा सखा होणारा राम, सर्वांचा मित्र होणारा राम. मला सखाराम नाव लहानपणापासून आवडते. तुम्ही दमून आला असाल. मी बादली आणून देतो. स्नान करुन विश्रांती घ्या. जेवायला अवकाश आहे. आज सुट्टी आहे.”

“आज कसली सुट्टी?”

“ही संस्था ज्यांच्या प्रेरणेमुळे स्थापण्यात आली त्यांची आज पुण्यतिथी.”

घना आपल्या खोलीत गेला. त्याने बादली आणून दिली. सखारामला त्याने संडास, हौद- सारे दाखविले.

“तुम्ही आता जा. मी सारे आटपून येतो. तुम्ही जणू जुने मित्रच भेटलात.” सखाराम मधुर हास्य करीत म्हणाला.

घना निघून गेला. सखाराम कितीतरी वेळ स्नान करीत होता. तो लांबून आला होता. दोन दिवसांत अंघोळ नव्हती. त्याने आपले कपडे धुतले आणि मग खोलीत आला. पिशवीतून दोरी काढून त्याने बांधली. तिच्यावर आपले कपडे त्याने वाळत टाकले. खोलीत एक टेबल होते. टेबलावर त्याने आपली दोन-चार पुस्तके ठेवली. एक तुकारामाची गाथा होती. उपनिषदांचे पुस्तक होते. रवीन्द्रनाथांची साधना आणि गीतांजली ही दोन पुस्तके होती. आश्रम भजनावली आणि गीता ही छोटी पुस्तके होती. श्रीरामकृष्ण परमहंसांची एक तसबीर होती. ती त्याने टेबलावर मध्यभागी ठेवली. नंतर तो बागेत गेला. त्याने दोन फुले आणून त्या तसबीरीला वाहिली. नंतर घोंगडी पसरून तिच्यावर तो पडला. थोड्या वेळाने त्याचा डोळा लागला.

घनाने येऊन पाहिले तो सखारामला झोप लागलेली. तो तेथील खुर्चीवर बसला. ती पुस्तके तो चाळीत होता. साधना वाचताच तो रमून गेला. इतक्यात जेवणाची घंटा झाली. सखारामला जाग आली.

« PreviousChapter ListNext »